“हे मृगाक्षी, हे हरिणाक्षी, आठ महिन्यानंतर तू खरेच माझी होशील का? मला मग कधी नाही म्हणणार नाहीस ना? माझे हसतमुखाने स्वागत करशील ना?”
“होय.”
“पाहा. रामाची शपथ घे.”
“रामाची शपथ.”
“तुझा रामावर भरवसा आहे?”
“तुमचा नसला तरी माझा आहे.”
“माझा नसता तर मी रामाची पूजा केली नसती. हे माझे हात पवित्र आहेत. रामाच्या अंगाला उटी लावणारे हे हात तुच्या अंगाला केशरी उटी लावतील. किती दिवस वाट पाहू? आठ महिने हे कसे शक्य आहे?”
“तुम्ही करू शकाल. तुम्ही येथल्या मंडळींस सांगा. रामाच्या पुजार्याचे कोण ऐकणार नाही.”
“बरे, एकदा हस. गोडशी हस.”
सरलेने स्मित केले.
“किती गोड हास्य ! आठ महिने, आणि हे हसणारे ओठ माझे होतील. खरे ना?”
“रामाची इच्छा.”
तो पुजारी गेला. सरला रडत बसली.
“प्रभो, या कुंटणखान्यातून मला सोडव रे. तुझ्याशिवाय कोण आहे या मुलीला?” असे हात जोडून ती म्हणत होती.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.