“पर्वतीच्या पायरीवर पाय सरकून पडल्ये असे ती म्हणाली होती.”

“तिला जीवन असह्य झाले होते. ती निराश होती. मी दुर्दैवी आहे, विषवल्ली मला म्हणतात, असे ती सांगे. मला तिची करूणा आली. ती मधून मधून भेटत असे. आमचे परस्परांवर प्रेम जडले.”

“अस्से. कितपत प्रेम जडले?”

“ते शब्दांनी कसे सांगू? ते वर्णिता येणार नाही. आम्ही एकमेकांची झालो होतो.”

“काही प्रत्यक्ष संबंध?”

“तुम्ही सरलेचे वडील आहात. मी कशाला लपवू ! आम्ही जणू पतिपत्नी झालो होतो. आम्ही लौकरच रजिस्टर पध्दतीने विवाहबध्द होणार होतो. परंतु माझी आई आजारी असल्याची तार आली. मी गेलो. आईचे प्राण गेले होते. आईचा मी एकुलता मुलगा. मला धक्का बसला. मी बेशुध्द होऊन पडलो. जवळ जवळ दोन महिने माझी स्मृती गेली होती. परंतु एके दिवशी मामांनी माझी ट्रंक फोडली. त्यात सरलेचा व माझा फोटो होता. त्यांनी तो माझ्यासमोर आणला. मला एकदम स्मृती आली. मी एकदम येथे धावून आलो. सरलेसाठी आलो. तिचा होण्यासाठी आलो. नवा संसार मांडण्यासाठी आलो. परंतु ती कोठे आहे?”

“तुम्हांला हे सारे सांगायला लाज नाही वाटत?”

“मी पाप केले आहे असे मला वाटत नाही. मी तिला फसवले नाही. मी तिला माझे प्रेम दिले आहे. फसवायचे असते तर मी धावून आलो नसतो. स्वच्छपणे तुम्हांस सांगितले नसते. पाप भित्रे असते.”

“बेशरम, पाजी !”

“जरा जपून बोला. राग नका करू.”

“म्हणे राग नका करू. प्रत्यक्ष माझ्या मुलीवर हात टाकतोस ! व्यभिचार करतोस ! नीच ! जारकर्म करणार्‍या, पाप्या, दुष्टा !”

“अभद्र बोलू नका. मी व्यभिचार केला नाही. अत्याचार केला नाही. जेथे अन्योन्य प्रेम असते तेथे व्यभिचार होत नाही. व्यभिचार तेथे, जेथे प्रेम नसते. तुमची सारी मंगल लग्ने व्यभिचार असू शकतील, जर तेथे अन्योन्य प्रेम नसेल. मी जार नाही. तुमच्या मुलीचा मी प्रेमळ पती आहे. ती माझी पत्नी आहे. सरलेचे काय केलेत सांगा?”

“तिची काय स्थिती होती माहीत आहे?”

“माहीत आहे म्हणूनच मी विचारीत आहे. तिची स्थिती माहीत होती म्हणूनच स्मृती येताच मी धावून आलो; अशक्त होतो तरी आलो. स्त्रीहृदयाची वंचना करणारा मी नाही. सांगा कोठे आहे सरला? काय केलेत तिचे?”

“सरला मेली.”

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to रामाचा शेला


चिमणरावांचे चर्हाट
नलदमयंती
सुधा मुर्ती यांची पुस्तके
श्यामची आई
गावांतल्या गजाली
सापळा
झोंबडी पूल
अजरामर कथा
गांवाकडच्या गोष्टी
लोकभ्रमाच्या दंतकथा
गोड शेवट
अश्वमेध- एक काल्पनिक रम्यकथा
खुनाची वेळ
कथा: निर्णय
पैलतीराच्या गोष्टी