“बाळंतपणात?”
“बाळंतपणात म्हणून विचारतोस. हरामखोरा, लफंग्या, किडया ! बाळंतपण म्हणून विचारतोस? किती दिवस मिठया मारीत होता? तुला ठार करावे वाटते नीचा !”
“नीच तुम्ही आहात. घरात बालविधवा मुलगी होती. तिचा पहिला पती आठ-दहा दिवसांत मेला. प्रथमपतीची ना ओळखदेखही. आणि अशा भग्नहृदय मुलीला तुम्ही घरात रडत ठेवलेत ! का नाही तिचा पुनर्विवाह केलात? एका अक्षराने तरी तिला कधी विचारलेत? तुम्ही स्वत:चा पुन्हा विवाह केलात? तुम्हाला लाज नाही वाटली? तुम्ही थेरडे असून भोग भोगू इच्छिता आणि त्या बालविधवेला संन्यास देऊ पाहता? तिला तुम्ही छळलेत. तिला विषवल्ली म्हणत असा. झाडांसही पाणी घालू देत नसा. बाळाला हात लावू देत नसा. तिच्या हृदयाला घरे पाडलीत. तिच्या हृदयाची चाळण केलीत. ती रोज रडे. निराशेने डोके फोडू बघे. तुम्ही तिचे जन्मदाते. एका शब्दाने कधीतरी तिची विचारपूस केलीत का? दिवाळीत ती येथे एकटी. तुम्ही खुशाल सासुरवाडीत जाता, चैन करता. कोण तुम्ही? सैतान की राक्षस? पाषाणहृदयी पिता !”
“अशा तुमच्या मुलीला मी आशा दिली. तिला प्रेम दिले. तिला माझा आधार वाटला. तिच्या जीवनात आनंद आला. पोळून गेलेले तिचे हृदय, त्याला जरा शांती मिळाली. होय, आम्ही एकत्र रमलो. आम्ही एकमेकांची आहोत. विश्वव्यापी सत्याला स्मरून आम्ही एकमेकांची झालो, आणि जगातील कायद्याच्या दृष्टीनेही एकमेकांची होणार होतो. मी तिला फसवणार नव्हतो. क्षणभर फुलातील मध चाखून उडून जाणारा भुंगा मी नाही. आमचे प्रेम निष्ठावंत आहे. अभंग आहे. सांगा, सरला कोठे आहे. सांगा, कसाबाची करणी केलीत की काय ते सांगा. कोठे आहे सरला? कोठे आहे तिचे बाळ? बोला !”
“सरला जगातून गेली.”
“खरेच?”
“हो. ती तुमच्याइतकी बेशरम नव्हती. तिने चिठ्ठी लिहून ठेवली की मी जगातून जाते. जीव देते. पापी माणसाने कशाला जगावे? विषवल्लीने कशाला जगावे? असे तिच्या चिठ्ठीत होते. परंतु तिचे असले पाप होते हे नव्हते मला माहीत. तिला मी विषवल्ली म्हणत असे. तिच्या पाठची मुले वाचली नाहीत. शेवटी तिची आई मेली. तिचे लग्न केले तर लगेच पती मेला. मी पुन्हा लग्न केले. नवीन बाळ झाला तो मेला. माझी खात्री झाली की सरला विषवल्ली आहे. जाईल तेथे मरण नेईल.”
“परंतु तुम्ही जिवंत आहात. तुमच्या नवीन पत्नी जिवंत आहेत. ही सृष्टी जिवंत आहे. सरलेचे पाप सर्वांना मारीत असेल, तर तुमची पुण्याई का नाही आड घातलीत? तुम्हीही पापशिरोमणी दिसता ! अरेरे ! एकूण माझी सरला गेली तर? खरेच का तिने चिठ्ठी लिहून ठेवली?”
“खोटे कशाला सांगू ! आणि आता तुम्हीही मराल. सरला विषवल्ली होती हे तुमच्याही अनुभवास येईल. तुम्हाला आता जगवणार नाही. मरा. जा अशी काळी तोंडे लौकर मातीत मिसळतील तेवढे चांगले. तुम्हाला धर्म नाही, मर्यादा नाही, संयम नाही, विवेक नाही. हिंदुस्थानात पाप वाढत आहे, म्हणून ही गुलामगिरी जात नाही.”