“तुमच्या निराशेतही मला आशा दिसत आहे. तुम्ही का आहात निराश? सरला नाही का भेटली? पाखरू का दुसर्‍या कोठल्या वेलीवर बसले? दुसर्‍या कोठल्या श्रीमंती पिंजर्‍यात अडकले?”

“सरला एकाच वेलीवर खेळू पाहात होती. तिचे प्रेम मी किती वर्ण? मित्रा, सरला गेली ! हे जग सोडून गेली !”

“कोणी सांगितले?”

“तिच्या प्रत्यक्ष बापाने. तो का खोटे सांगेल?”

“मग आता तुम्ही काय करणार?”

“या जगाचा रामराम घेणार !”

“तुम्ही का मरणार?”

“हो.”

“हा वेडेपणा आहे. जगात एकच सत्यता नाही. अनेक सत्यता आहेत. तुमच्या सरलेचे तुमच्यावरील प्रेम ही त्यांतील एक सत्यता.”

“ती एक सत्यता नाही. तीच एकमात्र सत्यता. ती नष्ट झाल्यावर जगात काय राहिले? त्या प्रेमामुळे सार्‍या सृष्टीत राम वाटत होता. त्या प्रेमामुळे सारी सृष्टी अर्थमय वाटत होती. परंतु आज सारे नि:सार वाटत आहे ! शून्य वाटत आहे !”

“उदय, आजूबाजूचा समाज आहे. या समाजात तुम्ही जगलेत. समाजाचे ऋण नाही का? शेतकर्‍यांनी धान्य पिकविले. विणकरांनी वस्त्र विणले. अनेकांच्या उद्योगांमुळे आपण जगतो. आपले जीवन म्हणजे कोटयवधी लोकांच्या श्रमांचे फळ. आपले जीवन केवळ आपले नाही. ते समाजाचे आहे. एखादा दु:खी मनुष्य रस्त्यात भेटला तर तुम्ही त्याचे अश्रू पुसायला नाही जाणार? एखाद्याच्या पायात काटा बोचला तर तो काढायला नाही जाणार? माझी प्रिया मेली. आता जगाचे काय? असे का म्हणणार? प्रियेचे अश्रू पुसणे हे जसे कर्तव्य, तितकेच किंबहुना अधिक जगाचे अश्रू पुसणे हे आहे. आपल्या प्रेमाने शेवटी आपण मोठया दृष्टीचे झाले पाहिजे. लहान मूर्तीची भक्ती करून भक्त विश्वाचा उपासक बनतो. त्याप्रमाणे आपल्या व्यक्तिविषयक प्रेमानेही आपणांस व्यक्तीच्या अतीत शेवटी नेले पाहिजे. व्यक्तिगत प्रेमाला विश्वप्रेमाची फुले लागली पाहिजेत. एका व्यक्तीवर प्रेम करून पुढे समाज, राष्ट्र, सारे जग यांवर प्रेम करायला आपण शिकले पाहिजे.”

“निराश होऊन मरू नका. तुमच्या सरलेच्या प्रेमाचा सुगंध हृदयात सदैव ठेवा आणि जगाची सेवा करा. सरला तुमच्या हृदयात नाही का? तिच्या प्रेमस्मृती नाहीत का? तो सुगंध अमर आहे. ती तुमची भावनांगी सरला, प्रेमस्वरूप सरला मरणातीत आहे. ती कोठे जाईल? ती सदैव तुमच्या हृदयात आहे. आणि हृदयात नसेल, तर बाहेर असून तरी काय उपयोग?”


आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel