“नुसते दर्शनच? स्पर्शन नाही का?”

“क्षणिक स्पर्शासाठी जाल, परंतु कायमचे मुकाल. जरा सबुरीने घ्या. माझी तर इच्छा आहे की, हे रत्न खास तुमच्यासाठी राखायचे. सौंदर्यांची राणी आहे. परंतु थोडे दिवस जाऊ देत. मधून मधून येत जा, बघत जा. भूक वाढू दे. शेवटी ती तुमची होईल.”

“आज रात्री पाहू तरी. आणि पूजा ठरली हो. मी दिवे लागता मंदिरात येतो. आधी रामरायाची पूजा. मागून ती पूजा.”

“ठीक. जयगोपाळ.”

रामभटजी निघून गेले. गब्बूशेटांचे जेवणखाण झाले. तांबूलभक्षण झाले. मऊमऊ गादीवर ते पहुडले. सुखाचा विचार करीत ते झोपी गेले. सायंकाळ केव्हा होते, रात्र केव्हा येते, या विचारात गुंग असता डोळे केव्हा मिटले ते त्यांना समजले नाही.
तिसरे प्रहरी त्यांना जाग आली. काही खानपान करून मोटारीत बसून ते फिरायला गेले. दिल्ली-आग्रा रोडने गेले. त्या घनदाट उंच वटवृक्षांच्या गर्द छायेतून ती काळीसावळी मोटार मध्यम वेगाने जात होती. वाटेत मोटार थांबली. ते उतरले. आणि पायांनीच रस्त्याच्या बाजूच्या शेतातून जरा हिंडले. शेवटी एका ठिकाणी बसले.

सायंकाळ होत आली होती. अपरंपार रंग आकाशात भरले होते. क्षणाक्षणाला ते रंग बदलत होते. शेटजी सौंदर्याकडे पाहात होते. परंतु ते सौंदर्य क्षणात संपले. फारच दाट ढग एकदम आले. अगदी काळे ढग. सायंप्रकाशाच्या साधनाने स्वत: सुंदर होण्याऐवजी त्या ढगांनी तो सायंप्रकाशच संपूर्णपणे आच्छादून टाकला. परंतु त्या दाट ढगांतूनही ते पाहा सौंदर्य प्रकट होत आहे. ते पाहा किरण ! जणू किरणांचे उलटे कारंजे उडत आहे असे वाटते. प्रकाशाच्या झारीतून किरण वरून कोणी खाली उडवीत आहे असे वाटते. सुंदर दृश्य ! आणि आता तर अजिबात गेले ढग. अहाहा ! काय अपूर्व शोभा आणि तीत कसे गांभीर्यही आहे ! लाल रंगात थोडी कृष्णछटाही आहे. शेटजी, या सौंदर्याचा समजतो अर्थ? तुम्ही कोणत्या सौंदर्याचे उपासक आहात? परंतु सौंदर्यातील अर्थ पाहणार्‍यास ते समजत नसते.  सौंदर्य केवळ अनुभवायचे असते.

शेटजी उठले. गार वारा सुटला होता. तो का त्यांना झोंबत होता? असा मोकळा स्वच्छ वारा त्यांना कसा सहन होणार? विजेच्या पंख्याच्या वार्‍याची त्यांना सवय ! हा पहाडी वारा त्यांना कसा मानवणार? उठा शेटजी. मोटारीत बसा. सार्‍या काचा लावून घ्या. वारा लागून आजारी पडाल हो. मुंबईत जाऊन पडा आजारी. आज येथे रामरायाच्या नगरीत तरी नका पडू आजारी.

शेटजी मोटारीत बसले. ते घरी आले. थोडावेळ विश्रांती घेऊन भोजन करुन ते मंदिरात जायला निघाले. आज पूजेचा अपूर्व थाट व्हायचा होता. ते मंदिरात आले. रामरायाची मूर्ती किती सुंदर दिसत होती ! पिवळया शेवंतीचे ते हार कसे शोभत होते ! आरती सुरू झाली. हजारो भक्त येत-जात होते. कोणी हात जोडून उभे होते. त्या आरतीत सामील होत होते. “रामा हो रामा” असे म्हणून प्रणाम करून लोक जात होते. कोणी हळूच स्वत:चे कान ओढून घेत होते, हळूच थोबाडीत मारून घेत होते; पावन होत होते. आपण चुकत आहोत, हातून पापे होत आहेत, याची जाणीव होणे हे काय कमी आहे? एक तरी जागा अशी आहे की जेथे आपण जातो व स्वत:चे स्वरूप उघड करतो व क्षमा मागून घेतो. मंदिरांतून घाण असेल, पुजारी व्यभिचारी असतील; परंतु ती प्रभूची मूर्ती हजारोंच्या जीवनात थोडी शांती आणीत असेल यात शंका नाही. एक क्षण का होईना, सुसंस्कार, पवित्र भावना यांची प्राप्ती होत असेल तर त्यांची का किंमत नाही?

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel