“रमा, मरताना तरी कोणाचे वाईट नको चिंतूस. आपली पापे आपणाला छळीत आहेत. सरलेचा काय दोष? जगात का मरण नाही? सगळयांकडे का सरला आहे? आणि सरला आज आठ महिने घरात नाही. तरी मरण आलेच ना? बाळाला सरलेचा हात लागू नये म्हणून आपण जपत होतो. तरी मृत्यूचा हात आलाच ! आपण मूर्ख आहोत. सरलेला उगीच बोललो. उगीच तिचे हृदय आपण दुखवले. तिला छळले. तिला रडवले. तिच्याजवळ प्रेमाचा शब्द कधी बोललो नाही. सरलेच्या आईला काय बरे वाटत असेल? आणि तुझी दोन मुले गेली. जणू सरला त्यांना घ्यायला नाही म्हणून गेली. सरला असती तर तुझी बाळे जाती ना.”

“सरलेच्या पाठची तिची भावंडे का गेली? तिची आई का मेली?”

“त्यात सरलेचा काय दोष? कोणाच्या माथी मारायचाच असेल, तर तो माझ्या माथी मी का नये लादू? मीच करंटा, अभागी, असे मी का म्हणू नये? खरे ना? सरलेला नको नावे ठेवूस. कोठे असेल ती? तिने का खरेच जीव दिला असेल? तिच्या उदयनेही का जीव दिला असेल? अरेरे ! त्या सार्‍या हत्त्या आपल्या शिरावर आहेत.”

“असे चोरटे संबंध ठेवायला काही वाटले नाही त्यांना?”

“अग, सरला तरी माणूसच ना? मीच तिचे पुन्हा नको होते का लग्न लावायला? आणि कोणा तरूणाचे तिच्यावर प्रेम बसले व तिचे त्याच्यावर बसले तर त्यांचे हात एकमेकांच्या हातात देणे हे माझे नव्हते का कर्तव्य?”

“त्यांनी तसे सांगायला नको होते का?”

“सरला भ्यायली. आपले तिच्यावर प्रेम नव्हते. ती कसे सांगणार? तिने सांगितले नाही याचाही आपल्यालाच दोष. आपण प्रेमाने तिच्याजवळ वागलो असतो तर तिने सारे सांगितले असते. परंतु बिचारी निमूटपणे घरातून गेली. कोठे गेली?”

“पाणी द्या मला. घशाला कोरड लागली आहे.”

“देतो हां.”

विश्वासरावांनी पाणी दिले. रमाबाई डोळे मिटून पडून होत्या. असे दिवस जात होते. आणि अखेरचा दिवस आला. तिसरे प्रहरापासूनच रमाबाईचे जरा अधिक दिसत होते. त्या विश्वासरावांकडे बघत व डोळे मिटीत. शेवटी त्यांचा हात हातात घेऊन म्हणाल्या,

“भेटेल हो तुमची सरला. सारी सुखरूप आहेत. ती पहा मला दिसत आहेत. सरला, तिचा बाळ, उदय, सारी दिसत आहेत ! ती येथे परत येतील. घर गजबजेल, रडू नका. सरलेला सांगा की, मी तिची क्षमा मागितली आहे. हो, खरेच येईल सरला !”

“परंतु तू, तुझा बाळ जिवंत असता आली असती तर?”

“या सार्‍या मरणांनीच देव तुम्हाला-मला शिकवू इच्छीत आहे. आपले डोळे उघडायला या सर्व मरणांची जणू जरूर होती.”

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel