“शेटजी मी तुमची मुलगी आहे. का वेडेवाकडे बोलता? माझ्या मनात नाही हो काम. मी येथे संन्यासिनी आहे. मला येथे फसवून आणण्यात आले. मी रात्रंदिवस रडत आहे. तुम्हाला नाही दया येत? पाहा बरे माझ्या तोंडाकडे, पाहा माझ्या डोळयांकडे. आहे का तेथे विषयवासना? मी या पलंगावर नाही बसल्ये, जणू निखार्यांवर बसल्ये आहे. परंतु हे सामर्थ्य कोणी दिले ते आहे का माहीत? या मंचकावर आज मी बसल्ये, श्रध्देने व विश्वासाने बसल्ये. माझ्याकडे येणार्या शेटजींना मी परावृत्त करीन, पवित्र करीन, अशा निश्चयाने मी येथे बसल्ये. कोठून आला हा निश्चय? सांगू? ऐका. हा पहा शेला. किती सुंदर व नाजूक शेला ! परंतु हा कोठून आला माहीत आहे? हा रामाच्या अंगावरचा शेला. ते भटजी मघा आले व हा शेला देऊन गेले. म्हणाले, “रामरायाच्या अंगावर तो नाही शोभत. तुझ्या अंगावरच शोभेल.” शेटजी, तो भटजी रामरायाचा पुजारी आहे. दिवसा रामाची पूजा करतो आणि रात्री येथे येतो. कधी मला भीती घालतो, कधी गोड बोलतो. “रामरायाचे सारे अलंकार तुझ्या अंगावर घालीन” असे म्हणाला. काय हे पाप ! काय हा अधर्म ! शेटजी, परंतु हा शेला आला व मला धीर आला. जणू माझी अब्रू वाचवण्यासाठी या शेल्याच्या रूपाने प्रभूच आला असे वाटले. प्रभू मला तारणार, मुक्त करणार, अशी आशा वाटली. मी हा शेला अंगावर घेतला. माझा अणुरेणू जणू पवित्र होत होता. सारे अंग रोमांचित होत होते. थरारत होते. जणू सारे मालिन्य जळून जात होते. रामरायाच्या अंगावरचा शेला ! शेटजी पाहा, या शेल्याकडे पाहा. तुमची दृष्टी निवळेल. तुम्ही पवित्र व्हाल. घेता हातात? हा घ्या.”
असे म्हणून तिने तो शेला शेटजींच्या अंगावर टाकला शेटजींनी तो शेला नीट न्याहाळून पाहिला. त्यांनी क्षणभर डोळे मिटले. पुन्हा त्यांनी तो शेला नीट पाहिला.
“शेटजी पाहा, नीट पाहा. जरा अंगावर घ्या. तुमचे डोळे निवळत आहेत. तुमची चर्या बदलत आहे. वासना जळून विवेक तुमच्या जीवनात येत आहे. होय ना? पाहा. त्या शेल्याकडे नीट पाहा. रामरायाच्या अंगावरचा पवित्र शेला ! प्रभूच्या स्पर्शाने पुण्यवंत झालेला !”
“हा शेला रामभटजींनी आणून दिला?”
“हो. तुम्ही येण्यापूर्वी दिला आणून. मला म्हणाले, “ते शेटजी येतील तेव्हा अंगावर घेऊन बस. नुसती रंभा दिसशील.”
“हा शेला रामरायाला मीच आज दिला होता. सायंपूजेच्या वेळेस प्रभूच्या मूर्तीच्या अंगावर तो मी पाहिला होता. किती रमणीय दिसत होती प्रभुमूर्ती !”
शेटजी तुम्ही दिला होतात हा शेला? रामाला दिला होतात? प्रभूला अर्पिला होतात?”
“होय. शंकाच नाही. तोच हा शेला.”
“शेटजी, काय आहे हे सारे? तुम्ही रामाला शेला देता आणि पुन्हा या कुंटणखान्यात येता? तुम्ही सायंकाळी प्रभूची मूर्ती पाहून आलेत. या तुम्ही दिलेल्या शेल्यात नटलेली प्रभूची मूर्ती पाहून आलेत. आणि आता माझी ही माती पाहायला आलेत ! शेटजी हा धर्म की अधर्म? हा दंभ आहे. ही वंचना आहे. स्वत:ची व जगाची ! तुम्ही धार्मिक म्हणून मिरवत असाल, देवाचे भक्त म्हणून मिरवत असाल; परंतु तुमचे खरे स्वरूप किती ओंगळ आहे? घ्या. तो शेला जवळ घ्या. हृदयाशी धरा. हृदयातील खळमळ जळून जावो.”