“शेटजी, तुम्ही तेथे जा आणि थोडया वेळाने मीही येईन. मला तुम्ही तेथे येऊ द्या. मी तेथे बोलेन. तुमच्या आधी बोलेन. तुम्ही परवानगी द्या. आणि मागून तुम्ही बोला. सांगा की राममंदिरात जायला आपणच लायक नाही. लायक कोणी असलेच तर ते अस्पृश्य आहेत. आणि परिषद संपवा.”

“तू म्हणतेस तसेच करावे. अत:पर माझ्या आयुष्याला निराळे वळण लागो. खरा धर्म जीवनात येवो. सरले, तू आता जरा झोप, तुला एक स्वतंत्र खोली देतो. तू आता माझी धर्मकन्या आहेस. निश्चिंत राहा. सारे चांगले होईल.”

“शेटजी, मी येथेच जरा बसते.”

“परंतु तुझी व्यवस्था करून ठेवतो. झोप आली म्हणजे तुझ्या खोलीत जा. चल, तुला दाखवून ठेवतो.”

सरला आपली खोली पाहून आली. आणि त्या गच्चीत ती बसली. सभोवती सारे शांत होते. वरती तारे होते. तिने प्रभूचे आभार मानले. तिचे डोळे भरून आले. तो शेला तिच्याजवळ होता. तो शेला ती मस्तकी धरी, हृदयाशी धरी. मुक्ती देणारा शेला ! नरकातून बाहेर काढणारा शेला ! रामरायाच्या अंगावरचा शेला !

“आणि आता बाळ आणीन, त्याला वाढवीन, उदय, तू रे कोठे आहेस? खरेच का तू या जगाला सोडून गेलास? का असशील कोठे? का मधूनमधून हृदयात आशा बोलते? तू का नकळत माझा सांभाळ करीत आहेस? तू का सर्वांना प्रेरणा देत आहेस? उदय, आता तू येऊन भेट. म्हणजे सारे मंगल होईल. मग सरलेचे भाग्य खरेच खुलेल. ती अभागिनी नाही राहणार, विषवल्ली नाही राहणार. देवा, दे रे माझा उदय ! माझे शील राखलेस, माझे सौभाग्य नाही का राखणार?”

असे ती मनात म्हणत होती. शेवटी ती उठली व अंथरुणावर येऊन पडली. परंतु भावना इतक्या उसळल्या होत्या की झोप लागणे शक्य नव्हते. सकाळच्या सभेत काय सांगायचे याचा ती विचार करीत होती. तिला जणू शत जिव्हा फुटल्या होत्या. तिच्या प्रतिभेला पंख फुटले होते. अंथरूणात पडल्या पडल्या ती व्याख्यान देत होती. परंतु ते सारे सकाळी आठवेल का? आणि एकाएकी पुन्हा तिला बाळ आठवला. “तो मोठा झाला असेल. रांगू लागला असेल. चालूही लागला असेल. परंतु कोण शिकवील त्याला चालायला? कोण धरील त्याचे बोट? आणि आई, बाबा असे म्हणायला कोण    शिकवील? कोणी केले असेल त्याचे उष्टावण? त्याला कधीच अन्न द्यायला लागले असतील. तेथे दूध किती कोण पुरवणार? आता भेटेल माझे बाळ. आईला ओळखील का तरी? त्याला पाहताच पुन्हा दूध येईल का? पाजीन का मी त्याला?” अशा विचारात ती रमली. पहाटे तिचा डोळा लागला आणि गोड स्वप्न पडले- “उदय, जवळ येऊन उभा आहे. हळूच येऊन पाठीमागून डोळे झाकीत आहे.” सुंदर स्वप्न. ती जागी झाली. पहाटेची स्वप्ने खरी होतात ना? तिने आजूबाजूस पाहिले. कोठे आहे उदय? तिकडे सूर्योदय होण्याची वेळ होत आली होती, शेटजी उठले होते. ते सरलेकडे आले.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel