“बंधूंनो, माझ्या भगिनींनो ! हा शेला माझ्याजवळ कसा आला माहीत आहे? ते पाहा वेदमूर्ती रामभटजी तेथे बसले आहेत. प्रभू रामरायाचे पुजारी म्हणून ते प्रसिध्द आहेत. परंतु ते केवळ रामाचे पुजारी नाहीत; ते कामाचेही पुजारी आहेत ! ते रोज राममंदिरात जातात, त्याप्रमाणेच विलासमंदिरातही जातात. रामाचे पाय धुतात नि वारांगनांचे पाय धरतात ! रामाचे अलंकार, रामाची वस्त्रेभूषणे ते वेश्यांच्या चरणी अर्पण करतात. ते नेहमीप्रमाणे काल त्या कुंटणखान्यात आले व म्हणाले, “हा घ्या शेला. आता नाही म्हणू नका. का दु:ख भोगता? आम्हांला सुख द्या व तुम्हीही सुखी व्हा. लक्षाधीश शेटजींना तुमच्याकडे आणीन; आणि नंतर आम्हा भटजींचीही भूक दूर करा.” आज सहा-सात महिने हे पुजारी माझ्याकडे येत आहेत. काल मला त्यांनी धमकीही दिली. परंतु रामरायाच्या शेल्याने मला अपार धैर्य आले. मी त्या कुंटणखान्यातून मुक्त होऊन आल्ये आहे. केवळ रामभटजीच असे आहेत असे नाही. येथे जमलेल्या सनातनी बंधूंतील कितीतरी तेथे येत. मला दुरून बघत. माझे तेथे प्रदर्शन मांडण्यात आले होते. माझी जाहिरात केली जात होती. आणि एक दिवस मी मोहाला बळी पडेन, निमूटपणे त्यांच्या स्वाधीन होईन, विलासात रमेन असे त्यांना वाटत होते. मुंबई-कलकत्यापर्यंत माझी कीर्ती त्यांनी पसरवली. हे भोगातुर किडे माझ्या शरीरावर तुटून पडण्यासाठी टपलेले होते. परंतु आज मी सुटून आल्ये आहे. रामरायाने वाचविले. रामभटजींचे उपकार आहेत. जो शेला माझा अध:पात व्हावा म्हणून त्यांनी दिला, तो तारकच ठरला. त्यांचे उपकार ! आणि मी त्यांना कशाला नावे ठेवू? येथे जमलेल्यांपैकी किती निर्दोष आहेत? मला या सभेत येऊ देत नव्हते. वेश्येला म्हणे सभेत येण्याचा अधिकार नाही. आणि वेश्यांचे पाय चाटणार्‍यांना अधिकार आहे का? बाजारबसवीला येथे म्हणे अधिकार नाही. मी बाजारबसवी नाही. तुम्ही मात्र बाजारबसवे आहात. धर्माचा तुम्ही बाजार मांडला आहे. कोण येथे असा आहे, की ज्याने परस्त्रीकडे कधी पाहिले नसेल? कुंटणखान्यातील खिडक्यांकडे पाहिले नसेल? जो निर्दोष असेल त्याने मला दगड मारावे. परंतु जो निर्दोष असतो तो तर निरहंकारी असतो. तो पतितांचा तिरस्कार न करता त्यांच्यावर करूणा करतो. त्यांना सन्मार्गावर आणतो. तुम्ही येथे धार्मिक म्हणून जमले आहात. आहे का काही धर्मता? आपली अंत:करण शोधा. तेथे कामक्रोध भरलेले आहेत. तेथे दंभ आहे, गर्व आहे. टिळे-माळा, गंधे, भस्मे, जानवी म्हणजे का     धर्म? पागोटी म्हणजे का धर्म? दर्भ म्हणजे का धर्म? धर्म म्हणजे उदार होणे, सत्याला अनुसरणे, पवित्र होण्यासाठी धडपडणे. ती धडपड आहे का तुमच्याजवळ? ज्वाला ज्याप्रमाणे तडफडत धडपडत वर जाऊ पाहतात, त्याप्रमाणे ज्याची आत्मज्योती परज्योतीला मिळण्यासाठी धडपडत आहे, त्याच्याजवळ धर्म आहे असे समजावे. तुमच्याजळ आहे का असा धर्म? तुम्ही स्वत:ला सनातनी म्हणविता. सनातन म्हणजे शाश्वत टिकणारे. शाश्वत काय टिकते? सत्य, न्याय, प्रेम यांना शाश्वतता आहे. ज्या चालीरिती सत्याकडे नेतात, उदारतेकडे नेतात, प्रेमाकडे नेतात, सर्वांच्या सर्वांगीण विकासाकडे नेतात त्या चालीरीती ठेवाव्या. बाकीच्या दूर कराव्या. सत्याचे दर्शन हळूहळू होते. जसजसे आपण वर जातो तसतसे अधिक दिसू लागते. आणि नवीन चालीरीती आपण आणतो. नवीन दिसलेल्या सत्त्याला अनुरूप अशा नवीन चालीरीती. सत्याचे नवनवे दर्शन आणि त्यामुळे आचारविचारांतही नवनवे बदल; अशाने प्रगती होते.

“तुम्ही विद्वान आहात. सुज्ञ आहात. तुम्ही शास्त्रे वाचली असतील. परंतु मनुष्याचे हृदय समजण्याचे शास्त्र तुमच्याजवळ नाही. शाब्दिक शास्त्रे फोल आहेत. तुम्ही शब्दपूजक आहात. धर्माचा आत्मा कोठे आहे तुमच्याजवळ? प्रभू रामचंद्र निळया सागराप्रमाणे, निळया आकाशाप्रकाणे अनंत आहेत. ते सर्वव्यापी आहेत.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel