उदय नि सरला पंढरपूरला आली. त्या संस्थेत दोघे गेली. व्यवस्थापकांची भेट झाली. परंतु आजोबांनी नातवाला नेले होते. विश्वासरावांचे पत्र व्यवस्थापकांनी सरलेच्या हाती दिले. तिने वाचले व उदयला वाचायला दिले.
“देवाची दया-” उदय म्हणाला.
“आता सुखाचे दिवस येणार. सरलेचे भाग्य फुलणार. हो ना उदय?”
“होय, दु:खानंतर येणारे सुख किती गोड वाटते, रसमय वाटते, नाही?”
त्यांनी संस्थेस शंभर रूपयांची देणगी दिली. शेटजींनी पैसे दिले होते. त्यातूनच त्यांनी ते पैसे दिले. व्यवस्थापकांना प्रणाम करून दोघे पुण्याला जायला निघाली.
“उदय, बाबा एकटे आहेत. सावत्र आईही गेली. तिचा बाळही गेला. बाबांना मी एकटी उरल्ये. ते बाळाला खेळवीत असतील. आपण एकदम जाऊ. किती आनंद ! उदय, किती आनंद ! या आनंदाला आपण पात्र आहोत का?”
“अद्याप का शंका आहे?”
दोघे अति आनंदात होती. एकमेकांकडे प्रेमाने पाहात होती. फार बोलवत नव्हते त्यांना. आणि पुणे आले. टांगा करून दोघे निघाली. दोघांची हृदये शत स्मृतींनी भरून आली होती. पहाटेची वेळ होती. टांगा दाराशी थांबला विश्वासराव फुलझाडांना पाणी घालीत होते. टांग्यातून दोघे उतरली. सामान फार नव्हतेच. टांगा गेला.
“बाबा, मी आल्ये पाणी घालायला. बाबा आम्हांला आशीर्वाद द्या.”
“सरले, आलीस बाळ? आणि उदयही आला? किती आनंदाचा दिवस ! चला वर. बाळ झोपला आहे. उठेलच आता. आजच अजून निजला आहे. आई येणार म्हणून की काय?”
सारी वर आली. सरला पाळण्याजवळ गेली. बाळ झोपला होता. माता बाळाकडे पाहात होती. आणि पिताही. तिच्याने राहवेना. तिने त्याला काढून घेतले. बाळ जागा झाला. तो आजोबांकडे जाऊ लागला. आजोबांनी घेतला.
“बाळ, ती बघ तुझी आई. तिच्याजवळ आता जा. ती खाऊ देईल. जा. प्रकाश, जा आईजवळ.”