मी आत्ताच तिला भेटून आलो आहे .यानंतर तिची गाठ पुन्हा केव्हा पडेल न पडेल सांगता येत नाही.गाठ पडू नये अशी इच्छा आहे .तिचे कारुण्याने भरलेले आत्ता बरसतील की नंतर बरसतील असे अश्रूंनी ओथंबलेली डोळे पाहावे लागावे असे मला वाटत नाही .क्वचित अशीही शक्यता आहे की ती आपल्या संसारात पूर्णपणे मग्न झालेली असेल .तसे असेल तर मला आनंदच होईल .ती माझी व्हावी असे मला जरी कितीही वाटत असले आणि आम्ही पूर्ण विचाराअंती दूर होण्याचा निर्णय घेतला असला, तरीही ती माझी झाली नाही ही बोच कुठे तरी आत राहणारच आहे.
तिचे लग्न दोन दिवसांनी आहे . तिच्या आई वडिलानी ठरवलेल्या मुलाशी ती लग्न करीत आहे .माझीही त्याला पूर्ण संमती आहे .मी जर तिला पळून जाऊ या असे म्हटले असते तर तिने त्याला कबुली नक्कीच दिली असती.परंतु तिच्या आई वडिलांना दुखवून तिला काय किंवा मला काय लग्न करायचे नाही. ज्यावेळेला आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो आणि आमच्या वारंवार भेटी होऊ लागल्या,वारंवार फेसबुकवर व फोनवर गप्पा होऊ लागल्या,तेव्हाच केव्हातरी बोलता बोलता आम्ही आपल्या आईवडिलांना दु:खी करून सुखी होऊ शकणार नाही या निर्णयाला आलो होतो .अाम्ही पळून जावून लग्न नक्की करू शकलो असतो.ती व मी पूर्णपणे स्वयंपूर्ण होतो.आम्हाला चांगली नोकरी होती .ती बावीस वर्षांची होती. मी पंचवीस वर्षांचा होतो. कायद्याची कोणतीच अडचण नव्हती .
आमच्या मनाची रचना अशी होती की वडील मंडळींना दुखवून आम्ही सुखी होऊ शकलो नसतो .आमच्या दोघांच्याही मनाला त्याची सतत बोच होत राहिली असती.एकत्र आलो, लग्न केले, तर सर्वांच्या संमतीनेच, अन्यथा नाही, हे आम्ही पहिल्यापासूनच ठरविले होते .तिने तिच्या आई वडिलांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला .परंतु ती त्यांचे मन वळवू शकली नाही .मीही त्यांना भेटण्यासाठी घरी गेलो होतो .त्यांनी माझ्याशी काहीही न बोलता मला जवळजवळ हाकलून लावले होते .सामाजिक जाती व्यवस्थेच्या उतरंडीच्या वरच्या पायरीवर ते होते. खालच्या पायरीवर मी होतो .आमची संस्कृती भिन्न आहे .आता शारीरिक आकर्षणाच्या भरामध्ये जरी आम्हाला सर्व काही योग्य वाटत असले तरी संस्कृती भिन्नतेमुळे अनेक समस्या निर्माण होतील .त्या सोडविता सोडविता आमची दमछाक होईल .आम्हाला केलेल्या कृत्याचा, लग्नाचा पश्चाताप होईल, असे त्यांचे ठाम मत होते.
कुणाला माहिती, कदाचित ते बरोबरही असतील . समस्या आम्हाला निर्माण झाली असती. आम्ही तिला तोंड दिले असते.आम्ही यशस्वी की अयशस्वी होऊ याचा विचार आम्ही केला असता .जे काही बरे वाईट भोगायला लागले असते ते आम्हाला भोगावे लागले असते .त्यांनी आमच्या प्रश्नात लुडबुडण्याचे कारण नव्हते, असे बऱ्याच मित्र मैत्रिणींचे
मत होते.आम्हीही एकदा पळून जावून लग्न करण्याच्या सीमारेषेपर्यंत आलो होतो .त्यांच्या मनाविरुद्ध केलेल्या लग्नामुळे, तिचे आईवडील दुःखी झाले हे तिला, तिच्या मनोरचनेमुळे सहन होणार नव्हते.ती सतत दुःखी असलेली, अंतर्यामी तिचे मन तिला खात असलेल्या अवस्थेत असलेली ती, मला पाहवणार नव्हती.मलाही तिच्या आई वडिलांना दुखवावे असे वाटत नव्हते .शेवटी बऱ्याच उलटसुलट विचारानंतर आम्ही दोघांनी लग्न न करण्याचा निर्णय घेतला .नेहमी प्रमाणे काहीजण बरोबर निर्णय असे म्हणतील.तर काहीजणं संपूर्ण चुकीचा निर्णय असेही म्हणतील. मतमतांतरे ही असायचीच .कोण चूक व कोण बरोबर हे कसे ठरविणार ?आपआपल्या जागी जो तो योग्यच असतो असो.
आज तिने मला आमच्या नेहमीच्या जागी नदीकाठी भेटायला बोलाविले होते .नदीकाठची बाग माणसांनी मुलांनी फुलली होती. समोर नदीचा प्रवाह वेगाने वाहत होता .आम्ही दोघेही काहीही न बोलता नदीकाठी बसलो होतो . एका मोठ्या झुडपाआड बसल्यामुळे आम्ही कुणालाही बहुधा दिसत नसावेत. आम्ही केवळ हातात हात गुंफले होते .स्पर्शातून सर्व विचार भावना परस्परांना कळत होत्या. प्रेमामध्ये केव्हातरी अशी एक वेळ येते की स्पर्श, नजर, तुम्हाला सर्व काही सांगून जाते.शेकडो शब्द, असंख्य वाक्ये, जे सांगू शकणार नाहीत ते केवळ स्पर्श नजर सांगून जाते.केव्हां केव्हांतर एकमेकांच्या भावना एकमेकांपर्यंत पोचण्यासाठी स्पर्शाचीही गरज नसते.रेडिओ ट्रान्समिशनप्रमाणे एकाचे विचार भावना दुसऱ्यापर्यंत पोहोचू शकतात. अश्या प्रकारच्या भावावस्थेत आम्ही दोघे होतो.जवळजवळ तासभर हातात हात गुंफलेल्या अवस्थेत आम्ही नि:शब्द बसलो होतो . प्रत्येक गोष्टीला तेव्हां तरी शेवट असतोच .तो शेवट आल्याचे आम्हा दोघांनाही जाणवले .हातात हात गुंफलेल्या अवस्थेत असेच समोरच्या नदीला स्वतःला अर्पण करावे असेही एकदा आम्हाला वाटले.तो भ्याडपणा ठरला असता . ते जीवनापासून पलायन ठरले असते . जीवन हे जगण्यासाठी आहे .मृत्यू यायचा तेव्हा येईल. या विचारावर आम्ही दोघेही ठाम होतो .शेवटी एकमेकांचे हात घट्ट दाबून नंतर राहवले नाही म्हणून घट्ट आलिंगनामध्ये काही मिनिटे राहून आम्ही एकमेकांचा कायमचा निरोप घेतला .
आज तीन चार महिने तिच्या लग्नाची गडबड चालली होती .मुलगी पहाणे, मुलीला दाखवणे, पसंत करणे, लग्न ठरविणे, मुहूर्त पाहणे, कार्यालय निश्चित करणे,दागदागिने, कापड खरेदी, पत्रिका, निमंत्रणे, इत्यादी इत्यादी,तिच्याकडे धूमधडाक्याने चालले होते. रोज निदान एक दिवसाआड ती मला फोन करीत होती .चार आठ दिवसांनी जमेल तसे आम्ही भेटत होतो .लोकांच्या नजरेत येऊ नये म्हणून आम्ही आमच्या भेटण्याच्या जागा सतत बदल होतो .काय करावे याबद्दल आमच्या फोनवर किंवा प्रत्यक्ष चर्चा चालू होत्या .शेवटी पूर्ण विचाराअंती आम्ही ,आई वडिलांच्या मताप्रमाणे वागण्याचे ठरविले.
गेले चार आठ दिवस तर तिच्याकडे पाहुण्या मंडळींची गर्दी उडाली होती.बंगल्यावर दिव्यांच्या माळा सोडल्या होत्या .बंगल्यासमोर छानपैकी मंडप घातला होता .लग्न अर्थातच कार्यालयामध्ये होणार होते .मला रोज कामावर जाताना व येताना त्या बंगल्यावरून जावे लागते.या सर्व तयारीकडे बघून छातीत एक लहानशी कळ निघे.छातीवर दाबून स्नायूंना मसाज करून मी ती कळ घालवीत असे.
ती त्या दिवशी मला भेटली नसती तर किती छान झाले असते.या सर्व मानसिक वेदनातून, चढउतारातून, दुःखातून, आम्हाला जावे लागले नसते.पण असाही विचार मनात येतो की तिच्या भेटीमुळे आनंदात घालविलेली, गेली दोन तीन वर्षे आम्हाला मिळाली असती का?मन किती विचित्र आहे. ते सुख चटकन विसरते.दुःखाला उराशी कवटाळून बसते.जीवन जगण्यासाठी आहे. उंचसखल, चढउतार, सुखदु:ख असणारच .गेली तीन वर्षे आम्ही हलक्या पिसासारखे होऊन हवेत विहरत होतो. ती भेटली नसती तर हे अवीट आनंदाचे अविस्मरणीय क्षण आम्हाला मिळाले असते का?
तिला एक वाईट खोड आहे .आपण तिला चांगलीही म्हणू शकतो . त्यामुळेच तर तिची व माझी भेट झाली .रस्त्याने चालताना रस्त्यात जर तिला काही आक्षेपार्ह वस्तू दिसली तर ती उचलून केराच्या कुंडीमध्ये टाकल्याशिवाय तिला चैन पडत नाही . त्या दिवशी तिला कुणीतरी टाकलेली केळ्याची साल रस्त्यात दिसली .ती पायाने रस्त्याच्या कडेला करण्याऐवजी तिने वाकून ती उचलली.पाठीमागून मी भरभर येत होतो .ती अकस्मात वाकल्यामुळे, थांबल्यामुळे, मी तिच्यावर येऊन धडकलो.मी तिच्यावर आपटल्यामुळे ती रस्त्यावर जोरात तोंडघशी पडली असती.मी प्रतिक्षिप्त क्रियेने तिला कमरेला पकडून सावरले .ती नागिणीसारखी सर्रदिशी वळली.एका परक्या मुलीच्या कमरेला भर रस्त्यात पकडले आहे हे लक्षात आल्यावर मीही चमकलो. तिला माझ्या डोळ्यात काय दिसले, चेहऱ्यावर काय भावना दिसल्या, कुणाला माहिती?मला मारण्याच्या बेतात असलेली ती ,चटकन स्वतःला सावरून सॉरी थँक्यू म्हणाली .ती अकस्मात वाकली. मी स्वतःला सावरू न शकल्यामुळे तिच्यावर आपटलो. ती रस्त्यावर आपटू नये म्हणून मी तिला चटकन पकडून मागे ओढले .हे सर्व तिच्या क्षणार्धात लक्षात आले.त्यावेळीच तिच्या डोळ्यांनी मला मोहिनी घातली. ती अजून उतरलेली नाही.
नंतर आमची वेळोवेळी ठिकठिकाणी गाठ पडत गेली . रस्ता ,मॉल ,बाग, सिनेमागृह, किराणा दुकान, मंगल कार्यालय,नदीकाठ, नदीमध्ये बोटिंग करताना,इत्यादी इत्यादी .प्रथम आम्ही एकमेकांकडे बघून ओळखीचे स्मित करीत होतो .स्मिताचे रुपांतर हाय हॅलो मध्ये झाले . नंतर आम्ही बरोबर फिरायला केव्हा लागलो, गप्पा मारायला केव्हा लागलो, नाटकसिनेमाला बरोबर जायला केव्हा लागलो ते आठवत नाही. परंतु या सर्व पायऱ्या आम्ही बहुधा तीन चार महिन्यांमध्ये ओलांडल्या असाव्यात अशी कल्पना आहे .
तोंड ओळख,मैत्री , घट्ट मैत्री, एकमेकांना आवडू लागणे, त्या दृष्टीने परस्परांना पसंत करणे ,विवाहाच्या आणाभाका घेणे ,सामाजिक अंतराची जाणीव होणे ,आई वडिलांचा विरोध होईल याची जाणीव होणे ,आई वडिलांना दुखवून लग्न न करण्याचा निर्णय घेणे , आई वडिलांची संमती मिळवण्याचा प्रयत्न करणे ,त्यामध्ये यश न येणे ,तिला घरातून मला भेटण्याची बंदी होणे ,चोरून मारून परस्परांना भेटणे, ते शक्य झाले नाही तर फोनवर बोलणे, अश्या असंख्य पायऱ्या ओलांडत ओलांडत आमचा दोघांचा प्रवास चालू होता.
आता आम्ही दोघे निर्णायक वळणावर येऊन पोहोचलो होतो .पुढील प्रवास समांतर हातात हात घालून न करता ,भिन्न वाटांनी होणार होता .पूर्ण विचारांती आम्ही तसाच निर्णय घेतला होता .
आता मी तिच्या घरासमोर मोटारसायकलीवर थांबलो होतो.ती बाहेर येऊन मला अलविदा करणार होती .ती बाहेर आली .माझ्यापासून काही हाताच्या अंतरावर ती उभी होती .रस्त्यावर रहदारी चाललीच होती .कुणाचेही आमच्याकडे लक्ष नव्हते. तिने माझ्याकडे पाहून हात हलविला . दिव्यांच्या प्रकाशात ती मला स्पष्ट दिसत होती .तिच्या चेहऱ्यावर हास्य होते. परंतु तिचे डोळे आक्रंदत होते .तिचे डोळे फार बोलके होते .प्रेम राग करुणा दु:ख चिंता काळजी आनंद सर्व भावना त्यामध्ये स्पष्टपणे उमटत असत .तिच्या प्रेमामध्ये पडण्याच्या अनेक कारणामध्ये डोळे हे कारण प्रमुख होते . मला वाईट वाटू नये म्हणून तिने हास्याचा मुखवटा चढवला होता .तिने मुखवटा चढविला आहे हे मला माहित आहे हे तिलाही माहीत होते.
आता आमच्या वाटा भिन्न असणार आहेत. तिचे तर लग्न दोन दिवसांनी होणार आहे.तिचा नवरा एनआरआय आहे. लग्न होऊन ती परदेशात जाईल.ती पूर्ण सुखात असावी अशी माझी देवाजवळ प्रार्थना आहे .
मी लग्न करीन की नाही मला माहीत नाही .आत डोकावून पाहिल्यास हो आणि नाही अशी दोन्ही उत्तरे येतात . येणारा भविष्यकाळ काय ते ठरवील.
*आमचा प्रेमभंग झालेला नाही .*
*आमचा विवाह होऊ शकत नाही .*
*त्याला कुणाचाच इलाज नाही .*
*आम्ही परस्परांचे हित सुख कल्याणच नेहमी परमेश्वराजवळ मागत राहू .*
* आमच्या मनात कोणाबद्दलही कडवटपणा नाही .*
*आम्हा दोघांचा तो स्वभावच नाही .*
*आपल्या प्रिय व्यक्तीबरोबर आपण विवाह करू शकत नाही म्हणजे जगाचा अंत झाला असे नाही*
२२/१२/२०१९©प्रभाकर पटवर्धन