कुरुक्षेत्रावर पांचवा दिवस उजाडला. दोन्हीकडील सैन्ये सुसज्ज होऊन रणांगणावर पोहोचलीं, आज कौरव सैन्य मकरव्यूहांत सज्ज झाले व पांडव सैन्य श्वेनव्यूहांत उभे झाले. आघाडीला भीम उभा होता. भीष्माने जणूं पांडव सेनेचा नाश करण्याचा निर्धार केला होता. भीष्माचा उत्साह पाहून दुर्योधनाचा आनंद व उत्साह उफळू लागला.
तो द्रोणाचार्यांना म्हणाला, “गुरुवर जो पर्यंत आपण व पितामह आहांत तो पर्यंत आम्हांला देवादिकांचे सुद्धा भय नाही."
द्रोणहि युद्ध करू लागला. सात्यकीने जेव्हां द्रोणाचा आवेश पाहिला तेव्हा तो हि त्याच्यावर धावून गेला. दोघांचे युद्ध सुरू झाले. या त्यांच्या झटापटींत सात्यकीचे दोन्ही गुडघे फुटले.
सात्यकीला वाचविण्यासाठी भीम त्याच्या मदतीला धावला. म्हणून द्रोण त्याच्याशी लढू लागले. त्याच्या मदतीला अभिमन्यु, उपपांडव वगैरे धावून आले. द्रोणाला एकटा पाहून भीष्म त्याच्या मदतीला आले. त्याच वेळी युद्ध करीत करीत शिखंडी तेथे येऊन पोहोचली. आपल्या नियमाप्रमाणे भीष्म शिखंडीला वगळून बाण सोडू लागला. द्रोण मात्र शिखंडीशी लढू लागली. ही संधि साधून सात्यकी तेथून निघून गेला. दोन्हीं सैन्यांत निकराचे युद्ध झाले. पांडव सैन्यांतील बरेच योद्धे भीष्माच्या बाणाला बळी पडले. कित्येक जखमी झाले. रक्ताची नदी वाहूं लागली.
एवढच काय तर आज युद्धाला सुरवातीपासूनच जोर चढला होता. अशा ह्या गडबडीत भीष्माने एक तीक्ष्ण बाण सात्यकीवर सोडला. त्यामुळे तो घायाळ झाला. दुसऱ्या एका बाणाने भीष्माने सात्यकीच्या सारथ्यास मारले. तो कोलमडून रथातून खाली पडला. त्याबरोबर स्थाचे घोडे बिथरले आणि वाट फुटेल तिकडे ते पळू लागले. हे पाहून पांडव सैन्य घाबरले. याच वेळी दुसरीकडे अश्वत्थामा आणि अर्जुन यांचे युद्ध सुरू होते.
त्यांत अर्जुनाच्या बाणवृष्टीमुळे अश्वत्थामा रक्तबंबाळ झाला होता. तरीसुद्धा तो पाय रोवून नेटानें युद्ध करीत होता. त्याचें तें अवसान आणि रूप पाहून कृष्णार्जुनांना क्षणभर वाटले की आपल्या समोर प्रत्यक्ष रुद्रच उभा आहे. त्याच्या उत्साहाने कौरवांना मात्र खूप आनंद झाला. याच वेळी एका बाजूला लक्ष्मण व अभिमन्यूचे द्वंद्व सुरु झाले. लक्ष्मणाने आपल्या पराक्रमाने सर्वांना चकित करून सोडले. परंतु बिचाऱ्याच्या रथाचे घोडे व सारथी मरून गेले. तरी हि पण तो तसाच युद्ध करू लागला.
अभिमन्यूसुद्धा काही कच्चा वीर नव्हता. जेव्हां साध्या बाण वृष्टीने काही भागत नाही असें दिसलें तेव्हां लक्ष्मणाने शक्ति सोडण्यास सुरवात केली. पण अभिमन्यूने त्या सर्व बाणांना छाटून टाकले. एवढ्यांत तेथे कृप आला व लक्ष्मणाला आपल्या रथांत घालून घेऊन गेला. संध्याकाळच्या सुमारास सात्यकीचा जोर फार वाढला होता. तो शेते कापल्या प्रमाणे कौरव सेना कापीत चालला होता. त्याचे हे काम पाहून दुर्योधनानें आपलें रथांचे सैन्य त्याचे पारिपत्य करण्यास पाठविलें, सात्यकीला अवसान चढले होते. त्याने त्यांचा हि नाश करण्यास प्रारंभ केला. भूरिश्रवाने पाहिले की सात्यकीचा नाश केल्याशिवाय भागणार नाही. म्हणून तो नव्या दमाने त्याच्यावर चालून गेला.सात्यकीचे सैन्य भूरिश्रवापुढे टिकाव धरूं शकले नाही. ते रणांगण सोडून पळून गेले.
त्या नंतर सात्यकीचा पुत्र चित्रवर्मा भूरिश्रवाला म्हणाला, "तू आमच्यापैकी एकेकाशी युद्ध करतोस का सर्वाशी एकदम युद्ध करतोस!"
भूरिश्रवा उत्तम योद्धा असल्याने त्याने सर्वांशी एकदम युद्ध करण्याचेच ठरविले. सात्यकीच्या मुलांना वाटले की आपण सर्वांनी त्याच्यावर एकदम बाण सोडले तर त्याचा पराभव होईल. म्हणून त्यांनी एकदम भूरिश्रवावर बाण सोडण्यास सुरवात केली. पण भूरिश्रवापुढे त्यांचे काही चालले नाही. त्याने त्या सर्वांचे बाण मध्येच अडविले आणि मग एक एक करून त्यांना धारातीर्थी निजविलें.
पुत्रांचा नाश झालेला पाहून सात्यकीला संताप आला. त्याने भूरिश्रवाशी घनघोर युद्ध सुरू केले. दोघांनी एकमेकांचे धनुष्य तोडले, रथ मोडले, घोडे मारले व शेवटी ते तलवार घेऊन आपसांत लढू लागले. भीमानें सात्यकीला चटकन आपल्या रथांत बसविलें. ते पाहून दुर्योधनाने भूरिश्रवाला आपल्या रथांत बसविले, पण हा वेळपर्यंत संध्याकाळ होऊन गेल्यामुळे युद्ध बंद करावे लागले.
त्या रात्री काही विशेष असे घडले नाही. दुसऱ्या दिवशी दोन्ही पक्षांची सैन्य सुसज्ज होऊन सूर्योदयाचे सुमारास रणांगणावर येऊन दाखल झाली. त्या दिवशी पांडव सैन्य मकरव्यूहांत उभे केले होते आणि कौरव सेना क्रौंच व्यूहांत रचली होती. युद्धाच्या सुरवातीला द्रोण व भीम यांची गांठ पडली. द्रोणाने भीमाच्या मर्मस्थळावर बाण मारण्यास आरंभ केला. अर्थातच भीमाला याचा राग आला. त्याने क्रुद्ध होऊन द्रोणाच्या सारथ्याला एका बाणासरशी खाली पाडले.
बिचारा सारथी गतप्राण होऊन रथाखाली पडला. स्थांत दुसरे कोणी हि नसल्याने द्रोणाला स्वतःच आपले सारथ्य करावे लागले. त्याचे युद्ध हि चालले होते. भीम आवेशाने लढत होता. त्यानें आपली नजर आतां कौरव बंधूकडे वळविली. त्या सर्वांना एकत्र पाहून भीमाला भीष्माची आठवण देखील झाली नाही. तो निधड्या छातीनें कौरवांच्या घोळक्यांत शिरला. कौरवांना वाटले, बरा सांपडला आहे. त्याला जिवंत पकडावे म्हणून दुःशासन, दुर्विपह, दुस्सह, दुर्मद, जय, जयसेन, विकर्ण, चित्रसेन, सुदर्शन, सुवर्मा, चारुचित्र, दुष्कर्ण वगैरेंनी त्याच्या भोवती गराडा घातला तरी सुद्धा भीम जरासुद्धा भ्याला नाही. त्याला कळले की ते त्याला पकडणार आहेत. म्हणून तो त्यांच्यावर हल्ला करूं लागला.
भीम आवेशानें कोठे तरी लढत रोश्याचे पाहून धृष्टद्युम्न द्रोणाचार्यांना सोडून भीमाच्या रथाजवळ आला. पण पाहतो तर काय? रथांत कोणी नव्हते. तो घाबरला आणि त्याच्या सारथ्याला विचारले की भीम कोठे आहे??
“मला थोडा वेळ येथेच थांबण्यास सांगून ते कौरवांना मारण्याच्या इराद्याने त्यांच्या सैन्यांत घुसले आहेत." विशोकानें सांगितले.
भीमाशिवाय सर्व व्यर्थ आहे. असा विचार करून तो पुढे गेला. थोड्या अंतरावर त्याला भीम दिसला. तो आपल्या गदेने हत्तींचा संहार करीत होता, रथ मोडत होता, मोठमोठ्याने गर्जना करून कौरवांना आव्हान करीत होता. सर्व जण हा हा कार करीत होते आणि त्याच्यावर बाण सोडीत होते. त्यामुळे त्याला पुष्कळ बाण लागले होते. धृष्टद्युम्नाने तेथे जातांच त्याला आपल्या रथात बसवून घेतले, त्याच्या शरिरातील बाण काढले आणि त्याला कडकडून मिठी मारली. या दोघांना पाहून दुर्योधनानें त्यांच्यावर बाण सोडण्यास सुरवात केली. कौरवाना एके ठिकाणी असलेले पाहून धृष्टदयुम्नने त्यांच्यावर सम्मोहन शक्तीचा प्रयोग केला आणि त्या सर्वांना मूच्छित करून राकलें, द्रोण द्रुपदाशी लढत होता. त्याला जेव्हां समजले की सर्व कौरव मूञ्छित झाले आहेत तेव्हां तो ते युद्ध सोडून कौरव जेथे पडले होते तेथे आला.
गुरुवर्य द्रोणांनी आपल्या प्रज्ञास्त्राने सर्वांची मूर्छा दूर केली. थोड्याच वेळांत सर्व कौरव पुन्हां शुद्धीवर आले. लागलीच ते सर्व भीमावर तुटून पडले. दुर्योधन तर इतका तापला होता की त्याने काही विचार न करतां भीमाशी भयंकर युद्ध आरंभिलें, दुपार झाली होती. सूर्य डोक्यावर चढून पश्चिमेकडे झुकू लागला होता. सकाळपासून युद्ध करीत असल्याने भीम अगदी थकून गेला होता. तरी युद्ध थांबण्याची लक्षणे न दिसल्याने युधिष्ठिराने अभिमन्यु, धृष्टकेतु, कैकेय वगैरेंच्या बरोबर बारा योध्यांना भीमाच्या मदतीस पाठवून दिले. एवढी मदत येत असलेली पाहून कौरव रणांगणावरून पळून गेले.
त्यानंतर भीम पण परतला, परंतु त्याला वाईट वाटले. कारण त्या दिवशी संधि मिळून सुद्धा एक हि कौरव त्याच्या हातून मारला गेला नाही. दुपारपासून संध्याकाळपर्यंत दोन्ही सैन्यांत फार मोठे युद्ध झाले. भीमानें आपल्या पराक्रमाने सर्व शत्रु वीरांना 'दे माय धरणी ठाय' करून सोडले. इकडे भीष्म पितामह पांडव सेनेचा संहार करण्यांत गुंतले होते. तर तिकडे अर्जुन कौरवसेनेला नामशेष करण्याच्या प्रयत्नांत होता.
सूर्यास्त होता होतां पुन्हा भीम व दुर्योधनांचें जुंपले. दोघे हि झुंजार वीर हत्तीप्रमाणे एकमेकांवर तुटून पडले. भीमाने आपल्या प्रखर बाणांनी दुर्योधनाच्या सारथ्यास मारले. घोडे मारले. रथ मोडला ह्या झटापटींत दुर्योधन बाण लागून जखमी झाला. कृपाने हे पाहिले व ताबडतोब आपल्या रथात त्याला बसवून घेतले, दुर्योधन जातांच सैन्धव भीमावर तुटून पडला, जवळच असलेले अभिमन्यु, कैकेय आदि वीर त्याच्याशी युद्धास पुढे झाले. यावेळी दुर्योधनाचा भाऊ विकर्ण अमिमन्यूच्या बाणांनी मारला गेला.
श्रुतवर्माने दुर्मुखाला मारले, नकुल पुत्र शतानिकाने दुष्कर्णाला मारले, याप्रमाणे कित्येक कौरव राजकुमार मारले जाऊन त्या दिवसाचे युद्ध संपलें. सूर्यास्त होतांच सर्व सैनिक आपापल्या शिबिरांत गेले. प्रत्येकजण आपापला पराक्रम वर्णन करून सांगत होता आणि रणांगणांत पाहिलेल्या पराक्रमाची मुक्त कंठाने प्रशंसा करीत होता.
आज दुर्योधन जखमी झाल्यामुळे फार दुःखी होता. तो भीष्माकडे गेला आणि म्हणाला,
"पितामह..! पहा हे पांडव आपला सर्वात कठीण आणि अभेद्य म्हणून ठरलेले व्यूह सुद्धा सहज भेदून जात आहेत. आज तर भीमानें भगदी उच्छाद मांडला होता. केवढी जखम झाली आहे मला. मला वाटते आज आपले बरेच वीर त्याच्या गदा प्रहाराला बळी पडले आहेत. एवढेच नव्हे तर आज आम्ही रणभूमीवरच मूच्छित होऊन पडलों हो तो. तेव्हापासून माझें मन अगदी अस्वस्थ झाले आहे. आतां पांडवांच्यावर विजय मिळविणे केवळ आपल्या हातांत आहे."
दुर्योधनाला विशेष दुःखी झालेला पाहून पितामह भीष्म म्हणाले, "राजा, तुला जय मिळावा म्हणून मीच काय पण आपल्याकडील द्रोण, अश्वत्थामा शल्य आदि वीर प्राणपणाने लढत आहेत. यांत आतां जय कोणाचा होईल, त्यांचा की आपला हे मात्र सांगतां येत नाही. कारण पांडव वीर आहेत. त्यांना जिंकणे कठीण आहे."
नंतर दुर्योधनाला शांत झोप यावी आणि चांगली विश्रांति मिळावी म्हणून "विशल्यकरणी" नांवाची एक वनस्पती देऊन त्याला त्याच्या शिबिरांत पाठवून दिले.