(ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे .प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा.)
मनोवैज्ञानिक मनाचे दोन भाग करतात .अंतर्मन व बहिर्मन.हिमनगाचे जसे लहान टोक समुद्राच्या पृष्ठभागावर दिसते परंतु प्रत्यक्षात फार मोठा भाग समुद्राच्या पृष्ठभागाखाली असतो, त्याचप्रमाणे बहिर्मन हे एक लहान टोक आहे .अंतर्मन विश्वव्यापी आहे असेही काही जण म्हणतात.भूत भविष्य सर्व काही त्यात असते .काही कारणाने अकस्मात अंतर्मनातील काही अंश बहिर्मनात प्रगट होतो.मनुष्याला भविष्याबद्दल संकेत मिळतात .हे संकेत कशा स्वरूपात असतील ते सांगता येत नाही.ते संकेत खरे ठरतात .कारण ते संकेत अंतर्मनातून नकळत बहिर्मनात डोकावलेले असतात.असे म्हणतात की योगी अंतर्मनात योग बळावर डोकावून पाहू शकतो.त्यामुळेच अंतर्ज्ञानाने योगी अनेक गोष्टी जाणू शकतो .
मला जे निरनिराळे अनुभव आले ते काही कारणाने अंतर्मनातील कांही अंश मला नकळत बहिर्मनात आल्यामुळे आले असावे.भविष्याची सूचना त्यातून मिळाली असावी,असे आपण त्यानंतर ज्या काही घटना घडल्या त्यावरून म्हणू शकतो .अर्थात त्यावेळी मला ते भविष्य सूचक आहेत असे लक्षात आले नव्हते.लक्षात येऊनही मी फार काही करू शकलो असतो असे नाही .
मी सुरुवातीपासूनच सुरुवात करतो .
आपल्याला शहरात फिरत असताना बऱ्याच वेळा एखादा चेहरा ओळखीचा वाटतो .त्या दिवशी असेच झाले .मी महात्मा गांधी रोडने चालत जात होतो. दूरवरून माझा जिवश्चकंठश्च मित्र मधुकर येत होता.मधुकर दिल्लीला असतो.तो नाशिकला यायचा असता तर त्याने मला फोन करून तसे कळविले असते .कदाचित अकस्मात त्याला यावे लागले असेल. माझा फोन एंगेज्ड मिळाला असेल.नंतर फोन करण्याचे गडबडीत राहुन गेले असेल.एकदा नाशिकला आल्यावर घरी जाऊन सरप्राइज द्यावे असाही विचार त्याने केला असेल.असे विचार माझ्या मनात येत होते.प्रत्यक्ष भेट झाल्यावर काय ते कळलेच असते..
गर्दीमुळे मला तो नीट दिसत नव्हता .मध्येच त्याचा चेहरा अर्धवट दिसे, मध्येच पूर्ण दिसे लगेचच गर्दीत नाहीसा होई.नंतरतर गर्दीत तो दिसत नाहीसा झाला. मी घरी तो येईल म्हणून त्याची वाट पाहात राहिलो. माझ्या घरीही तो आला नाही.त्याला फोन केला तोही लागला नाही.
रात्री पुन्हा फोन केल्यावर तो दिल्लीलाच आहे असे कळले.म्हणजे मला मधुकर दिसला तो भासच होता.मधुकरशी थोडे बहुत साम्य असणारी ती व्यक्ती असावी.
चार आठ दिवसांनी मला मधुकर पुन्हा एकदा मॉलमध्ये दिसला .मॉलमध्ये मी एका सरकत्या जिन्याने वरच्या मजल्यावर जात होतो .तो दुसऱ्या सरकत्या जिन्याने खालच्या मजल्यावर येत होता.त्याला जोरात हाक मारली. त्याला बहुधा ऐकू गेली नसावी. नाहीतर तो मला भेटला असता. माझ्या मागे जिन्यावर गर्दी असल्यामुळे मला मागे उतरूनही जाता आले नाही .मी दुसऱ्या जिन्याने खाली उतरलो आणि त्याचा शोध घेतला .मला तो भेटलाच नाही .मी पुन्हा फोन केला तो दिल्लीलाच होता.तो नाशिकला आलाच नव्हता.तुला असे कसे भास होतात .तू भ्रमिष्ट झाला आहेस का? म्हणून त्याने माझी थोडीबहुत थट्टा मस्करीही केली.
तिसऱ्यांदा मला तो नाशिकरोड रेल्वे स्टेशनवर दिसला.कुणाला तरी निरोप द्यायला मी गेलो होतो.मुंबईला जाणाऱ्या रेल्वेमध्ये तो चढताना मला दिसला.या वेळी मी दिल्लीला फोन केला नाही .परंतु रात्री त्याचाच दिल्लीहून फोन आला.
मी फिरण्यासाठी गोल्फक्लबवर गेलो होतो.एका बाकावर मी त्याला पाठमोरा बसलेला बघितला.मी जाऊन त्याच्या पाठीवर थाप मारणार होतो .बरे झाले मी थाप मारली नाही.मी त्याला मधुकर म्हणून हाक मारली.मी ज्याला मधुकर समजत होतो त्याने मागे वळूनही पाहिले नाही.मी पुढे जावून वळून पाहिले तो ती व्यक्ती मधुकर नव्हती .
माझी दृष्टी सतेज आहे .दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला मी मधुकर म्हणून समजणार नाही .तरीही मी फसत होतो.असे कां होत होते ते माझे मलाच कळत नव्हते .
बहुधा मला मधुकरला भेटण्याची तीव्र इच्छा असावी .अशी तीव्र इच्छा एकाएकी कां निर्माण झाली ते कळण्याला मार्ग नाही.
मी मधुकरला तुला भेटायला येत आहे म्हणून फोन केला.विमानाने दिल्लीला पोचलो.चार दिवस त्याच्याकडे राहिलो.मनमुराद गप्पा मारल्या .रात्र संपली तरी आमच्या गप्पा संपत नव्हत्या .चार दिवस त्याने रजा काढली होती.त्याला मनमुराद भेटून मी नाशिकला परत आलो .
जवळजवळ चार महिन्यांनी मला पुन्हा भास होऊ लागले.
गर्दीत मला मधुकर वसंता म्हणून हाक मारीत आहे असे वाटत असे .मी मागे वळून पाही .मला कुणीही हाक मारलेली नसे.मला स्पष्टपणे मधुकरचा आवाज ऐकू येत असे.
एकदा बाजारातून जात असताना ,एकदा सिनेमाथिएटरमध्ये मागच्या खुर्चीवरून,एकदा शेजारून जाणार्या बसमधून, माझ्या नावाने मधुकरने मारलेली हाक स्पष्टपणे ऐकू आली .एकदा तर मी दिवाणखान्यात पेपर वाचीत असताना गॅलरीखालून रस्त्यावरून वसंता अशी स्पष्ट हाक मला ऐकू आली .मी हातात पेपर घेऊन तसाच गॅलरीत गेलो.रस्त्यावर कुणीही नव्हते.माझ्या शेजारी पत्नी काहीतरी काम करीत बसली होती .तिने मला गॅलरीत कां गेलो असे विचारले.तिला कारण सांगितल्यावर ती म्हणाली, मला तर काहीही ऐकू आले नाही. मधुकर भावोजी आले तर ते वरतीच येतील घालून कशाला हाक मारतील?
असे भास कां होत आहेत तेच मला कळेना .
नंतर मधुकर माझ्या स्वप्नात येऊ लागला. आम्ही दोघे शाळेत जात आहोत,आम्ही मैदानावर खेळत आहोत ,आम्ही शाळेला दांडी मारून सिनेमाला गेलो आहोत ,आम्ही कॉलेजात गॅदरिंगमध्ये दंगामस्ती करीत आहोत,अशा प्रकारची स्वप्ने दर दोन चार दिवसांनी पडू लागली .थोडक्यात आम्ही दोघांनी लहानपणी एकत्र केलेली मजा पुन्हा स्वप्नात उपभोगत होतो .
काही जणांना खूप स्वप्ने पडतात .मी त्यातला नाही .मला स्वप्ने क्वचितच पडतात .जास्त शास्त्रीय बोलायचे झाल्यास स्वप्ने पडतात परंतु ती लक्षात राहात नाहीत .
काही असो मला मधुकरबद्दल स्वप्ने पडत होती एवढे मात्र खरे .मधुकर दिसल्याचा भास होणे ,मधुकर हाका मारीत आहे असे भास होणे ,मधुकर बद्दल स्वप्ने पडणे ,या सर्वांची मला काळजी वाटू लागली .मी डॉक्टरांना भेटण्यासाठी गेलो .
डॉक्टरांना सर्व गोष्टी खुलासेवार सांगितल्या .मला केव्हापासून असे भास आहेत तेही स्पष्ट केले.प्रथम मधुकर समोरून येत आहे असे भास होत असत.नंतर तो पाठीमागून हाका मारत आहे असे भास होत. एकदा तर तो पाठमोरा बसलेला दिसला .प्रत्यक्षात दुसराच कुणीतरी होता. मधुकर माझा लहानपणापासूनच परमस्नेही आहे.त्याच्या खूप आठवणी येऊ लागल्या.तो मला हाका मारीत आहे इत्यादी भास होऊ लागले.एक दोनदा मला तो स्वप्नातही दिसला. मी त्याला भेटायला दिल्लीला गेलो.
हे सर्व ऐकल्यावर डॉक्टर म्हणाले,मी तुम्हाला म्हणून प्रांजळपणे सांगत आहे .अंतर्मन हा एक तळ नसलेला, सीमा नसलेला असा विशाल समुद्र आहे.आम्हा मनोवैज्ञानिकानाही अजून बऱ्याच गोष्टी समजलेल्या नाहीत.मधुकरबद्दलचे प्रेम तुमच्या मनात लहानपणापासून खोलवर रुजलेले आहे. त्याला काही होईल की काय अशी भिती तुमच्या मनात आहे .तो सुरक्षित असावा असे तुम्हाला वाटते .या भावनेचा अविष्कार म्हणून तो तुम्हाला समोरून आल्याचा भास होतो.तो तुम्हाला हाका मारत आहे असे वाटते .याहून मला जास्त काही सांगता येत नाही. मी तुम्हाला काही गोळ्या लिहून देतो.तुमच्या मनातील काळजी कमी करायला मदत होईल .ते बोलता बोलता आणखी एक महत्त्वाचे वाक्य बोलले.~या पाठीमागे काही सूचनाही असू शकते. ~ त्या वाक्याचा अर्थ मला तेव्हा कळला नाही . परंतु त्याचा अर्थ आता पूर्णपणे लक्षात येत आहे.
डॉक्टरांचे औषध सुरू करून एक महिना झाला होता.गेल्या महिन्याभरात मला स्वप्न पडले नव्हते कोणतेही भास झाले नव्हते .मी बरा झालो असे मला वाटू लागले होते . मधुकरबद्दल काळजी करण्याचे कारण नाही ही गोष्ट मला आता पटली होती.नेहमीप्रमाणे चार आठ दिवसांनी त्याचा फोन मला येत होता किंवा मी त्याला फोन करीत होतो .
त्या दिवशी रात्री मी गाढ झोपेत होतो .कुणीतरी बेल वाजविली .गाढ झोपेतून मीच प्रथम जागा झालो .आणखीही कुणी जागे झाले असले तरी उठायला तयार नव्हते.आळसामुळे दुसरा कोणीतरी उठेल आणि दरवाजा उघडेल असा विचार प्रत्येक जण करीत असावा .
पुन्हा एकदा बेल वाजली .मी उठून दरवाजा उघडला .दारात मधुकर उभा होता.त्याला पाहून मी आश्चर्यचकित झालो .फोन नाही काही नाही आता फ्लाइट येण्याची वेळही नाही तू अकस्मात कां आलास ,केव्हा आलास म्हणून मी त्याला विचारले .तो म्हणाला किं तुला भेटण्यासाठी आलो होतो .मला घाईने यावे लागले .माझ्याजवळ जास्त वेळ नाही.तू कसा आहेस ? एकदम तंदुरुस्त तुला दिसत नाही का?म्हणून मी प्रतिप्रश्न केला.
एवढ्यात तो उठला.अरे चहा नाश्ता केल्याशिवाय कसा निघालास ? मी त्याला विचारले. तो म्हणाला मला जास्त वेळ नाही. मला लगेच गेले पाहिज। मी तुला भेटण्यासाठी केवळ आलो होतो.तो फार घाईत असला पाहिजे .तो लगेच उठला आणि चालू लागला.त्याला जाताना पाठमोरा पाहिला तोच शेवटचा .
एवढय़ात माझ्या मोबाइलची रिंग वाजली .फोन दिल्लीहून होता .मधुकरचा मुलगा बोलत होता. काल रात्री बाबांच्या छातीत अकस्मात दुखू लागले . त्यांना लगेच हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केले .आज पहाटे चार वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे प्राणोत्क्रमण झाले .
*पहाटे चार वाजताच मधुकरने बेल वाजवली होती.*
*मला भेटण्यासाठी केवळ तो आला होता .*
*मला जास्त वेळ नाही असेही तो म्हणाला होता.*
*खरेच त्याच्याजवळ जास्त वेळ नव्हता.*
४/७/२०२०©प्रभाकर पटवर्धन