मुख्याध्यापक पुढे म्हणाले ,मी असे का म्हणतो ते लक्षपूर्वक ऐका .हा सांगाडा बोगद्यात खाणकाम सुरू असताना सापडला.कित्येक वर्षांपूर्वी कदाचित शतकांपूर्वी हा मनुष्य जिवंत किंवा मृत गाडला गेला असला पाहिजे .त्याची हाडे शरीराचे विघटन होऊन सुटी होणे आवश्यक होते .

ही हाडे सुटी सापडणे स्वाभाविक होते. हा सांगाडा  सलग कसा?याचे उत्तर कुणी देऊ शकेल का ? 

कुणीही याला माझ्या  ऑफिसमध्ये न आणता हा इथे आला कसा ?याचा कुणी विचार केला आहे का ? मी चौकशी केली.  सांगाड्याला येथे घेऊन आलो असे सांगणारा कुणीही मला भेटला नाही. 

सरपंचांनी ठेकेदाराला   हा सांगडा घेऊन जाऊ का? एवढेच  विचारले होते.सरपंचांच्या म्हणण्यानुसार तिथून त्यांच्या ऑफिसमध्ये याला कुणीही नेला नाही. 

हा आपल्या पायानी किंवा आकाश मार्गे सरपंचांच्या ऑफिसमध्ये गेला असे मला वाटते. मानवी किंवा अद्भुत शक्ती शिवाय हे शक्य आहे काय ? 

सरपंचांनी म्हादबाला याला मुख्याध्यापकांच्या ऑफिसमध्ये पोचव एवढेच सांगितले होते .याला कुणीही माझ्या ऑफिसमध्ये घेऊन आले नाही तरीही हा इथे आला कसा ?

माझ्या ऑफिसच्या सर्व खिडक्या काळजीपूर्वक नीट बंद झाल्या आहेत ना हे मी ऑफिस बंद करताना पाहिले होते असे असताना ऑफिसची खिडकी उघडली कशी? अमाननवी शक्तीशिवाय हे शक्य आहे काय? 

बंद ऑफिसमध्ये दिवा कुणी लावला ?तुम्हा सर्वांना मला भास होत आहेत असे वाटत आहे हे तुमच्या चेहऱ्यावर मला दिसत आहे .मला रात्री कदाचित स्वप्न पडले असावे असेही तुम्हाला वाटत असावे .आणखीही तुमच्या मनात काय काय आले असेल ते मी ओळखतो .मी ऑफिस बाहेर बेशुद्ध पडलेला असताना मला गावातील मनोहरने पाहिले आहे .मी शाळेजवळून जात होतो याचा हा सज्जड पुरावा आहे .

कदाचित मला भास झाला असेल असे मान्य केले तरी मी आत्ता विचारलेल्या  प्रश्नांची उत्तरे तुम्ही कशी देणार ?

तुमच्यापैकी कुणीही याला आपल्या घरी घेऊन जावे आणि अनुभव घ्यावा एवढेच माझे पुन्हा म्हणणे आहे .दिवसा हा  अचेतन  वाटतो .परंतु रात्री हा सजीव होतो असे माझे म्हणणे आहे .आणि नंतर तो कुठेही जात असावा .कदाचित काहीही करीत असावा .उत्खननातून बाहेर आल्यामुळे जमिनीखाली गाडलेल्या पाशवी शक्ती मोकळ्या झाल्या आहेत असे मला वाटते.शक्य तेवढ्या लवकर याला पुन्हा जमिनीत गाडावे हाच उत्तम उपाय आहे .वाटल्यास तुम्ही याला साखळदंडाने जखडबंद करून ठेवा .त्याच्या मनात असल्यास हा रात्री कुठेही जाईल तेव्हाच तुम्हाला माझ्या म्हणण्याची सत्यता पटेल .

त्या सांगाडय़ाला मजबूत साखळदंडाने बांधून ठेवण्यात आले .साखळदंड भिंतीतील एका हुकाला अडकवून त्याला कुलूप लावण्यात आले .

दुसर्‍या  दिवशी सांगाडा तिथून गायब झालेला होता.

मुख्याध्यापकाची ज्या शिक्षकाने  चेष्टा केली होती त्या शिक्षकाचे तोंड कावरेबावरे  झाले.

त्या रात्री गावातील  अनेक जणांच्या घराचे दरवाजे कुणीतरी जोरजोराने ठोकत होते.दरवाजा उघडण्याची कुणाचीही हिंमत नव्हती .सांगाडय़ामुळे सर्वत्र दहशतीचे साम्राज्य पसरले होते .त्या रात्री एकजण दारू पिवून रस्त्याने जात होता .त्याच्या पुढ्यात तो सांगाडा अकस्मात आला .त्याचा त्याने गळा दाबून खून केला . ही गोष्ट एकाने आपल्या घराच्या खिडकीतून पाहिली.त्याप्रमाणे त्याने पोलिसांना माहिती दिली .सांगाडा रस्त्यात निश्चेष्ट पडलेला आढळला .

जरी एकाचा गळा दाबून खून झाला असला तरी सांगाड्याच्या विरुद्ध एफआयआर  लिहिता येत नव्हता. त्याला अटकही करता येत नव्हती. त्याच्या विरुद्ध काहीही कायदेशीर इलाज होऊ शकत नव्हता.

या सर्वांवर एका तरुण शिक्षकांचा मुळीच विश्वास नव्हता .हे सर्व थोतांड आहे. हा केवळ मानसिक कमकुवतपणा आहे.ही अंधश्रद्धा आहे असे तो बडबडत होता. असे आहे तर तू हा सांगाडा तुझ्या घरी घेऊन जा आणि रात्र त्याच्याबरोबर काढून दाखव .असे आव्हान एकाने त्या शिक्षकाला दिले     

त्याचे हे अाव्हान त्या तरुण शिक्षकाने स्वीकारले.मी याला घरी घेऊन जातो असे तो म्हणाला .हे बोलत असताना तो उभा करून ठेवलेल्या सांगाड्याकडे पहात होता. सांगाडा  गालातल्या गालात हसत आहे असा त्या शिक्षकाला भास झाला.आपण हे आव्हान  उगीचच स्वीकारले असे त्याला वाटू लागले.

तो तरुण शिक्षक सांगाड्याला घेऊन त्या दिवशी घरी गेला. रात्री काय झाले माहीत नाही . तो शिक्षक एकटाच रहात होता .सकाळी सूर्य बराच वरती आला तरी त्याचा दरवाजा उघडा दिसेना.ठोठावून सुद्धा कुणीही दरवाजा उघडेना .शेवटी पोलिसांना कळविण्यात आले .पोलिस आले . दरवाजा फोडण्यात आला .कुणीतरी गळा दाबून त्या शिक्षकाला ठार मारले होते .आणि तो सांगाडा खोलीतून गायब होता .खोलीला आतून कडी लावलेली आहे तर मग सांगडा बाहेर गेलाच कसा ? शिक्षकाचा गळा दाबून खून कुणी केला ?

पोलिसांनी बरीच चौकशी केली .काहीही उलगडा होऊ शकला नाही.

हा भानामतीचा प्रकार आहे .सांगाडा झपाटलेला आहे. सांगाड्यात काहीतरी वाईट शक्ती आहेत असा समज सर्वत्र पसरला . सांगाड्याने आतापर्यंत दोन खून केले होते. सांगाड्याचा तपास सर्वांनी सुरू केला .शेवटी तो सांगाडा गावाबाहेरच्या एका शेतावरील ओसाड झोपडीत सापडला . झोपडीत एका वाशाला टांगलेल्या अवस्थेत,  फाशी दिलेल्या अवस्थेत तो सांगाडा होता. या सर्व गोष्टी अनाकलनीय होत्या .त्यांचे कुठलेही स्पष्टीकरण देता येत नव्हते.

सांगाड्याला हात लावायला कुणीही धजत नव्हते.सांगाड्यात अमानवी शक्ती आहे याबद्दल सर्वांची पूर्ण खात्री पटली होती.

सर्वानुमताने या झोपडीला आग लावून द्यावी म्हणजे सांगाडाही त्यात भस्मसात होईल असे ठरले.झोपडीच्या मालकाची परवानगी घेण्यात आली .सरपंचातर्फे त्याला नुकसान भरपाई देण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले . झोपडीला आग लावण्यात आली . झोपडी जळून खाक झाली .तरीही सांगाडा अर्धवट जळलेल्या अवस्थेत राहिला. लांबून पाहताना सांगाड्याची हाडे एखाद्या जळत्या  लाकडासारखी लाल लाल दिसत होती .उद्या अग्नी शांत झाल्यावर ही हाडे अापण जमिनीत खोल पुरून टाकू असा विचार सर्वांनी केला .सर्वजण घरी परतले .

दुसऱ्या दिवशी तिथे येतात तो अर्धवट जळालेला सांगाडा गायब होता .सर्वांना धडकी भरली .गावावर अनिष्ट आपत्ती ओढवली आहे याबद्दल सर्वांचे एकमत झाले .सांगाड्याचा तपास पुन्हा सुरू झाला.

सांगाडा शेवटी मातीच्या ढिगाऱ्यावर, जिथे कालव्यासाठी बोगदा खणत होते तिथे सापडला.सांगाडा मुळीच जळलेला नव्हता.जसा सुरुवातीला होता तसाच तो होता .सर्वजण आश्चर्यचकित झाले . त्या दिवशी रात्री सांगाड्याने बोगदा खणण्याच्या

साहित्याची बरीच नासधूस केली .बोगदा खणण्याचे काम त्यामुळे थांबले . 

दिवसा सांगाडा निश्चेष्ट असतानाच त्याचे काहीतरी करणे शक्य होते.काय करावे ते कुणालाच कळेना. शेवटी एका मांत्रिकाचा सल्ला घेण्यात आला .मांत्रिकाने सांगितले. या इसमाचा गळफास देऊन खून करण्यात आला होता .नंतर खुनी इसमाने  त्याला जमिनीत खोलवर गाडून टाकले.जमिनीत फार खोलवर हा असल्यामुळे तो जमिनीच्या बाहेर येऊ शकत नव्हता.बोगदा खणताना हा बाहेर आला .तो आता त्याचा खून करणाऱ्या इसमाचा शोध घेत आहे .याच्यापासून धोका आहे.रागाने तो वेडापिसा झाला आहे.रात्री हा जागृत होतो. मध्यरात्रीच्या आसपास त्याच्या शक्ती अफाट असतात. कुणालाही खुनी म्हणून तो ठार मारण्याचा संभव आहे . शिक्षक व दारुड्या दोघानाही बहुधा त्याने तशाच संशयाने मारले असावे.सुदैवाने मुख्याध्यापक वाचले .कदाचित त्याने त्यांचीही तशीच अवस्था केली असती .

मांत्रिकाला यावर उपाय विचारण्यात आला .मांत्रिकाने याला पंचवीस फुटापेक्षा जास्त खोल खड्ड्यात पुरून टाका म्हणजे  तो काहीही करू शकणार नाही असे सांगितले.डोंगरावर एक पडकी विहीर होती .त्यामध्ये त्या सांगाड्याला टाकून त्यावर माती लोटण्यात आली.संपूर्ण विहीर माती व दगडानी भरून टाकण्यात आली. 

जोपर्यंत याला कुणीही बाहेर काढणार नाही तोपर्यंत हा काहीही करू शकणार नाही असे मांत्रिकाने सांगितले.कदाचित काही वर्षांनी तो पुढच्या गतीला जाईल असेही मांत्रिक म्हणाला .   

तूर्त तरी गावावरचे  संकट टळले आहे.सांगाडा पुन्हा बाहेर आला तर काय होईल ते मात्र सांगता येत नाही.कारण तो आता चांगलाच रागावलेला असणार !! 

(समाप्त)

४/१२/२०१९©प्रभाकर  पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel