(ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे .प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा.) 

सातवा मुखवटा पोलीस, गुप्तहेर खाते, यांना फार उपयोगी पडू शकला असता.

त्यांनी तो मुखवटा घातला की बस्स समोरील मनुष्य दरोडेखोर आहे, करचुकवेगिरी करतो,दहशतवादी आहे ,हेर आहे,नक्षलवादी आहे ,माओवादी आहे ,कि आणखी कुणी समाजाला घातक कृत्य करणारा आहे,  हे लगेच ओळखता आले असते.

त्याप्रमाणे चौकशी करून पुरावे गोळा करता आले असते.

समाजातील अशी कीड नष्ट करण्याला मदत झाली असती.

मुखवटे चोरीला गेल्यानंतर त्यांचे काय झाले,ते कां चोरले गेले,त्याचा परिणाम काय झाला,ते पाहणे मनोरंजक ठरणार होते.

मामाच्या वाडय़ावर  चोरी करण्यासाठी चोर आले होते .मामाचा भक्कम चिरेबंदी वाडा, खिडक्यांना गज आणि मजबूत झडपे पाहून त्यांचा चोरी करण्याचा उत्साह मावळला. घराभोवती फिरताना तळघरात हवा व प्रकाश येण्यासाठी ठेवलेल्या खिडक्या त्यांना दिसल्या.छोट्या खिडक्याना मध्ये एकच गज होता .तो गज कापला तर आपल्याला तळघरात उतरता येईल हे त्यांच्या लक्षात आले.तळघरातून घरात जाण्यासाठी वाट ही असणारच.त्या वाटेने आपण घरात जाऊ आणि चोरी करू असा विचार त्यानी केला असावा.  गजावर अॅसिड टाकून त्यांनी तो तोडला नंतर वाकवला.तळघरात आपल्याला घबाड मिळेल निदान काही ना काही मिळेल अशी त्यांची कल्पना होती.तळघरात अडगळीशिवाय काहीही नव्हते.तळघरातूनच वर घरात जाण्यासाठी जिना होता परंतु दरवाजा बंद होता.त्यांचा तो मार्ग बंद होता . त्यांना नक्षीदार पेटीत मुखवटे सापडले तेच ते घेऊन गेले .नक्षीदार पेटीसह मुखवटे चोरण्याचा त्यांचा विचार होता. पेटी थोडी आकाराने मोठी असल्यामुळे फटीतून बाहेर काढणे कठीण होते .शेवटी ते फक्त मुखवटे घेऊन गेले .

हे सर्व मामाला योगायोगानेच कळले .कारण महिनोन्महिने कुणीही तळघरात जात नसे .तळघरात महत्त्वाचे काहीही नसल्यामुळे जाण्याचे कारणही पडत नसे.तळघराच्या खिडक्या लहान, मध्ये एक गज त्यामुळे तिकडे सहसा लक्ष जात नसे. कोणत्या तरी कारणाने घराभोवती चक्कर मारीत असताना त्याला वाकवलेला गज दिसला .चोरीचा प्रयत्न झाला हे त्याच्या लक्षात आले .तळघरात जावून पाहता त्याला मुखवटय़ांची नक्षीदार पेटी खिडकीजवळ पडलेली आढळली .मुखवटे चोरीला गेलेले आढळले .तळघरात जाणारा भक्कम दरवाजा बंद असल्यामुळे चोर घरात येऊ शकले नव्हते.

फोनवर बोलता बोलता मामाने या सर्व गोष्टी सांगितल्या .मामा पुढे म्हणाला ज्यानी मुखवटे चोरले आहेत ते वापरले गेल्यास पुन्हा जाग्यावर परत येतील .प्रत्येक मुखवटा एकदाच वापरता येतो .ज्याने तो मुखवटा वापरला असेल तो रात्री झोपताना मुखवटा गळून पडतो आणि मुखवटा आपल्या मूळ जागेवर म्हणजे आमच्याकडे येतो.पुढे तो हेही म्हणाला, मुखवटे लहान मुलांनी म्हणजे चौदा वर्षांखालील मुलांनी वापरले तर त्याचा काहीही परिणाम होत नाही .मुले थोडावेळ वापरून खेळून तो फेकून देतात आणि मुखवटा परत जागेवर येतो. मोठ्या माणसांच्या चेहऱ्यावर मात्र मुखवटा चेहऱ्यात विरघळून जातो . त्यामुळे व्यक्तीने मुखवटा घातला आहे हे कुणाच्याही लक्षात येत नाही.मुखवट्यांचा परिणाम मात्र होतो .मुखवट्यांच्या परिणामामध्ये जरी फरक असला तरी प्रत्येक मुखवट्याचा परिणाम काय होतो ते मुखवटा पाहून लक्षात येत नाही .तो तो मुखवटा त्या  विकाराचा अतिरेक करतो. मामाशी पूर्वी बोलताना त्याने न सांगितलेली ही माहिती होती.

चोरांना मुखवट्यामध्ये रस नव्हता .रस्त्यावरील एका हातगाडीवरून खेळणी विकणाऱ्या फेरीवाल्याला त्यांनी ते मुखवटे दहा रुपयाला एक याप्रमाणे विकले .कुणीतरी कुतुहलाने किंवा मुलांसाठी मुखवटा विकत घेणार होता. आणि नंतर तो जो कुणी वापरेल त्याच्यावर त्या मुखवट्याप्रमाणे आणि वापरणाऱ्याच्या वयाप्रमाणे परिणाम होणार होता.

आता हा गाडीवाला खेळणी घ्या खेळणी घ्या आरोळीबरोबरच केव्हा केव्हा मुखवटे घ्या  मुखवटे अशीही आरोळी मारत होता .

१  *क्रोध*

त्याची आरोळी ऐकून एका घरातून त्याला बोलावण्यात आले.एक मध्यमवयीन गृहस्थ त्याच्या मुलासाठी कांहीतरी खेळणी घेणार होता.दुर्दैवाने त्याने एक मुखवटा निवडला .पंधरा रुपये देऊन त्याने तो खरेदी केला .

मुलाला मुखवटा देण्याअगोदर आपल्याला तो कसा दिसतो ते पाहावे असे त्याला वाटले. आरश्यासमोर उभे राहून त्याने तो चढवला.मुखवटा आपल्या शरीरात विरघळून जात आहे,नाहीसा होत आहे,असे त्याला दिसले.तो घाबरून गेला .मुखवटा खेचून काढण्याचा त्याने प्रयत्न केला.ते अर्थातच शक्य नव्हते . मुखवटा विरघळत असताना आपल्यात काहीतरी बदल होत आहे असे त्याच्या लक्षात आले .

मुखवट्याने त्याचा ताबा घेतला होता .तो मुखवटा क्रोध या विकाराचा होता.त्याच्या ब्लॉकच्या वरच्या ब्लॉकमध्ये जो राहात असे त्याने गॅलरीबाहेर एक कुंडी टांगली होती .त्या कुंडीत तुळस लावलेली होती .तुळशीला पाणी घातल्यावर ते खाली ठिपकत असे .वाऱ्याबरोबर ते खालच्या गॅलरीत येत असे.मातीमिश्रित पाण्यामुळे गॅलरी खराब होई.गॅलरीतील कपडेही खराब होत असे .गॅलरीत उभे राहिलेल्या माणसाच्या अंगावर घाण पाण्याचा स्प्रे उडत असे.गॅलरीत खुर्च्या टाकून बसता येत नसे . गॅलरी साफ करण्याचा त्रास तो निराळाच. एखादा अभ्यागत  गॅलरीत गेला त्याच वेळी घाण पाण्याचा स्प्रे उडाला तर त्याचे कपडे खराब होत असत.कुंडीखाली ताटली ठेवा,पाणी कमी घाला ,पाणी खाली पडू देऊ नका, इत्यादी सांगूनही त्याचा काही उपयोग झाला नव्हता .म्हटले तर  क्षुल्लक,म्हटले तर महत्त्वाच्या , मुद्द्यावरून दोघांमध्ये वारंवार भांडणे होत असत. गॅलरीचा वापर करता येत नसे. 

आज पुन्हा वरच्या ब्लॉकवाल्याने कुंडीमध्ये जास्त पाणी टाकले. घाण पाण्याचा शिडकावा झाला.क्रोधात ठिणगी पडली .क्रोध मुखवटेवाला वरती रागारागात गेला.त्याने बेल दाबली.दरवाजा उघडल्याबरोबर त्याने त्या माणसाच्या थोबाडीत सणसणीत ठेवून दिली.दोघांमध्ये हातापाई झाली.वरच्याचे डोके भिंतीवर जोरात आपटले गेले.खोक पडली. भळभळा रक्त वाहू लागले. तो बेशुद्धच  झाला.त्याला हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केले गेले.अंतर्गत रक्तस्रावामुळे त्याची परिस्थिती गंभीर झाली .पोलीस केस झाली .या क्रोधाला अटक करण्यात आली .

रात्री कोठडीत गार फरशीवर झोपताना बुरखा बाहेर निघून आला . बुरखा गळून पडल्याबरोबर बुरखा त्याच्या जागेवर ,मामाच्या तळघरात नक्षीदार पेटीत येवून स्थिरावला .

सुदैवाने तो मनुष्य शुद्धीवर आला. बरा झाला. दोन महिन्यांचा तुरुंगवास, वीस हजार रुपये दंड, शिवाय हॉस्पिटलचा संपूर्ण खर्च,वकिलाची फी, एवढा फटका या क्रोधाला बसला.नातेवाईकांत शेजार्‍यापाजार्‍यात नाचक्की झाली ती वेगळीच .नोकरी मात्र सुदैवाने टिकली.वस्तुत: या व्यक्तीचा दोष नव्हता त्याने मुखवटा परिधान केल्यामुळे हे सर्व झाले होते. 

२ *काम*

नारंग झपझप पावले टाकीत घरी चालला होता .हातगाडी ओलांडता ओलांडता त्याने हातगाडीवर विक्रीसाठी ठेवलेले मुखवटे बघितले .त्यातील एका मुखवट्याने त्याचे लक्ष वेधून घेतले .आपल्या मुलाला खेळायला देण्यासाठी तो मुखवटा घ्यावा असे त्याला वाटले .त्याने तो मुखवटा वीस रुपयांना घेतला .त्याने तो मुखवटा गंमत म्हणून सहज चढविला.तो मुखवटा आपल्या चेहऱ्यात नाहीसा होत आहे असा त्याला भास झाला .मुखवटा काढून बॅगेत ठेवावा म्हणून त्याने मुखवटा काढण्याचा  प्रयत्न केला .मुखवटा कुठे तोंडावर  हाताला लागत नव्हता.त्याचवेळी त्याच्या अंगातून एक शिरशिरी गेली असा त्याला भास झाला.तो पूर्वीचा सोज्वळ सालस गरीब पापभिरू नारंग राहिला नाही.त्याला स्वतःमध्ये  फरक पडलेला जाणवला. त्याचा स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला .तो हावरटपणे प्रत्येक स्त्रीकडे मग ती कोणत्याही वयाची असो पाहत होता . 

त्याने खरेदी केलेला काम मुखवटा होता .बसस्टॉपवर एक तेवीस चोवीस वर्षांची मुलगी उभी होती.नारंग बसस्टॉपवर जावून तिच्या शेजारी उभा राहिला.थोड्याच वेळात त्याचे चाळे सुरू झाले.तिला सहज स्पर्श झाल्यासारखे दाखवून धक्के मार,पेपर वाचनाच्या मिषाने  तिला उद्देशून काही अश्लील शब्द वापर ,असे प्रकार सुरू झाले.ती बिचारी त्याच्याकडे लक्ष नाही असे दाखवून दूर दूर राहण्याचा प्रयत्न करीत होती.आपले अंग चोरत होती.ती काही प्रतिक्रिया दाखवीत नाही असे पाहून नारंग जास्त जास्तच धीट होत होता .एवढ्यात बस आली.नारंगचे घर बसस्टॉपपासून उजवीकडच्या गल्लीत अर्ध्या किलोमीटरवर होते.तरीही तो तिच्या पाठोपाठ बसमध्ये चढला. बसमध्ये दोघांनाही बसायला एकाच बाकावर जागा मिळाली.मग काय विचारता काम विकाराने झपाटलेल्या नारंगच्या अगाध लीला चालू झाल्या.

थोड्याच वेळात त्या मुलीच्या सहनशक्तीची कमाल मर्यादा ओलांडली गेली .तिने उठून पायातील चप्पल काढून त्याला मारण्यास सुरुवात केली. पाठीमागच्या, शेजारच्या, बाकांवरील लोक,बसमध्ये उभे असलेले लोक नारंगचे चाळे पाहात होते.हां हां म्हणता सर्वांनी नारंगवर हात साफ करून घेतले. नारंगचा एक हात मोडला.डोळा सुजला .सर्वांगावर भरपूर मुका मार बसला . बस पोलिस स्टेशनवर घेण्यात आली .सर्वांग ठणकत असल्यामुळे त्याला धडपणे बसमधून खाली उतरता येत नव्हते. नारंगवर विनयभंगाचा, अत्याचाराचा, गुन्हा दाखल करण्यात आला.नारंगला पोलीस कस्टडीची हवा खावी लागली .त्याच्या घरचे, शेजारचे, नारंग तसा नाही असे सांगत होते.परंतु बसमधील उतारूनी तर वेगळाच जबाब दिला होता.

त्याच्या भावाने खटपट करून जामीन दिला .तो त्याच दिवशी पोलिस कस्टडीतून घरी आला .रात्री झोपताना त्याचा मुखवटा गळून पडला आणि मुखवटा आपल्या जागी म्हणजेच माझ्या मामाच्या तळघरात पोहोचला.दुसऱ्या दिवशी सकाळी पूर्वीचा गरीब नारंग जागा झाला होता .त्याच्या मानेवरील भूत निघून गेले होते .असे कां झाले ते कोणालाच कळले नाही .गरीब नारंगचा पूर्वेतिहास पाहून,त्याच्या शेजाऱ्यांच्या जबान्या  पाहून, कोर्टाने त्याला कोर्ट उठेपर्यंत शिक्षा व पाच हजार रुपये दंड ठोठावला .

*ज्या विकाराचा मुखवटा  जो धारण करीत होता त्याचा ताबा  तो विकार घेत होता.*

*मुखवट्यामुळे हे होत आहे याची जाणीव मुखवटा धारण करणाऱ्याला होत नव्हती.*

*आतापर्यंत फक्त दोन मुखवटे मामाच्या वाड्यात तळघरात नक्षीदार पेटीमध्ये जमा झाले होते .*

*अजून पांच मुखवटे हातगाडीवाल्याच्या हातगाडीवर सावजाची वाट पाहत होते.* 

*उरलेले  मुखवटे आणखी काय काय गोंधळ उडवणार होते, ते भविष्यकाळालाच माहीत.*

(क्रमशः)

३१/७/२०२०©प्रभाकर  पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel