(ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे .जिवंत किंवा मृत व्यक्तीशी याचा संबंध नाही तसे आढळल्यास तो योगायोग समजावा )
सकाळचे साडेनऊ वाजले होते.मुख्य बाजारपेठेतील दुकाने हळूहळू एकेक उघडत होती.राजेश यांचा मॉल बाजारपेठेच्या मध्यभागी होता .संपूर्ण मॉल त्यांतील वस्तूंसह खासगी वैयक्तिक मालकीचा होता .बऱ्याच वेळा जागा निरनिराळ्या दुकानदारांना भाड्याने दिलेली असते. तशी स्थिती येथे नव्हती. मॉल चार मजली भव्य होता . तळमजल्यावर राजेशची एक ऑफिसवजा केबिन होती.त्यामध्ये सोफा कम बेड सोफा खुर्च्या टेबल ज्याला सीसीटीव्हीची कनेक्शन्स जोडलेली आहेत असा एक मोठा स्क्रीन लॅपटॉप इत्यादी गोष्टी होत्या .इंटर कॉम कनेक्शन तर होतेच.इथे बसून राजेश मॉलमध्ये कुठे काय चालले आहे ते पाहू शकत असे. त्याचप्रमाणे कामगारांचे नियंत्रणही करू शकत असे .राजेश कामगारांना पगार इतरांपेक्षा जास्त देत असे .त्याचबरोबर कामही भरपूर करून घेत असे.त्याची शिस्त कडक होती. त्यामुळे काहीवेळा माणसे दुखावली जात.
राजेश बरोबर साडेआठ वाजता मॉलमध्ये येत असे.आल्यावर तो बर्याच वेळा मॉलशी संबंधित कामे करीत असे .मेल चेक करणे, मेल पाठविणे,नवीन ऑर्डर्स पाठविणे, स्टॉक चेक करणे,अजूनपर्यंत पाठविलेल्या परंतु पूर्ण न झालेल्या ऑर्डर्सचा पाठपुरावा करणे, इत्यादी कामे चालत. याशिवाय मॅनेजर या व इतर कामांसाठी होताच .मॉल उघडल्यावर तो शटर्स पुन्हा लावून घेत असे आणि शांतपणे आपले काम करीत बसे. केव्हा केव्हा तो नुसता आरामही करीत असे .हल्ली तो लवकर थकत असे आणि त्याला विश्रांतीची गरज भासे.आजही तो साडेआठ वाजता मॉलमध्ये आला होता.
नोकरानी बरोबर साडेनऊ वाजता दुकानात हजर राहिलेच पाहिजे असा त्याचा दंडक होता .रजा अगोदरच मान्य करून घेतली पाहिजे .तसेच विशेष कारण असल्याशिवाय आयत्या वेळी रजा मिळणार नाही असाही दंडक होता .गैरहजर राहण्याचे कारण न पटल्यास तो सरळ बिनपगारी रजा करीत असे.त्याच्या रोखठोक व कडक बोलण्यामुळे बऱ्याच वेळा माणसे दुखावली जात.मॅनेजर व गुरखा धरून एकूण पंचवीस कामगार मस्टरवर होते. साडेनऊला पाच मिनिटे कमी असतानाच एकेक कामगार मॉलजवळ येऊ लागला .मॉलची कुलुपे नेहमीप्रमाणे काढलेली होती . म्हणजे मालक आलेले होते.शटर वर करून कामगार मॉलमध्ये बरोबर साडेनऊ वाजता शिरले.
मालकांच्या केबिनचा दरवाजा उघडा होता .आल्याबरोबर प्रत्येकाने मस्टरवर सही केलीच पाहिजे असा दंडक होता.मॅनेजर मस्टर आणण्यासाठी केबिनमध्ये गेला. आतील दृश्य बघून त्याने एकच किंकाळी फोडली .घाबरून सर्वजण केबिनमध्ये गेले .आतील दृश्य भयानक होते .पंख्याला मालकांचा देह एका दोरीने लटकलेला होता .त्यांची जीभ बाहेर आलेली होती .त्यांच्याकडे पाहूनच ते मेलेले आहेत हे लक्षात येत होते .कामगारांचा दुकानात एकच कालवा झाला .
आरडाओरडा ऐकून आजूबाजूचे दुकानदार व रस्त्यावरील काही मंडळी मॉलमध्ये एकदम शिरली. कुणीतरी मालकांच्या घरी फोन लावला.एकाने पोलिस स्टेशनला फोन केला .जवळजवळ एकाच वेळी मालकांचा मुलगा मनोहर व पोलिसांची व्हॅन मॉलसमोर आली .
पोलिसांनी लगेच परिस्थितीचा ताबा घेतला .बघ्यांना बाहेर पिटाळण्यात आले .नोकराना एका बाजूला स्वस्थ बसण्यास सांगण्यात आले.कुणीही कुठेही हात लावू नये असे बजावण्यात आले.अॅम्ब्युलन्स व डॉक्टर बोलाविण्यात आले.पोलिसांनी आपले काम हातमोजे घालून सुरू केले.
पोलीस प्रमुखाने शामरावांना फोन केला .बरेच दिवसांनी शामरावांनी रजा काढली होती.ते घरीच होते .आज युवराजांबरोबर कुठेतरी लंचला जायचा त्यांचा प्लॅन होता.फोन येताच गेली आजची सुट्टी गेली तेल लावत असे मनात म्हणत त्यांनी युवराजांना आज लंचला जाण्याला जमणार नाही म्हणून फोन केला .युवराजांनी कारण विचारता त्यांनी एका दुकानात दुकानदाराने गळफास घेतला आहे मला तिकडे जायचे आहे म्हणून सांगितले .त्यांनी दुकानदाराचे नाव विचारता राजेशमॉलचा मालक म्हणून सांगितले .राजेश युवराजांचा क्लायंट होता तेव्हा त्यांनी मीही तिथे येत आहे म्हणून सांगितले .अवश्य या तुमची आम्हाला मदतच होईल म्हणून शामरावानी सांगितले .
युवराजांनी संदेशलाही तिथे बोलावून घेतले.मॉलमध्ये पोचताच शामरावानी चौकशीची सूत्रे स्वतःकडे घेतली.चौकशी चालू असताना युवराज शेजारी बसून शांतपणे ऐकत होते .चौकशीतून पुढील हकिकत कळली .
मॉल राजेशचे वडिल प्रथमेश यांचा होता.प्रथमेशला दोन मुलगे राजेश व दिनेश . दिनेशने दहा वर्षांपूर्वी वडिलांपासून स्वतंत्र धंदा करण्यासाठी पंचवीस लाख रुपये घेतले होते. त्या बदल्यात त्याने मॉलवरील त्याचा हक्क सोडून दिला होता .त्यावेळी वडिलांनी एक अट घातली होती. जर पाच वर्षांत दिनेशने पंचवीस लाख रुपये परत आणून दिले तर मॉलमध्ये त्याचा अर्धा हक्क राहील.नाही तर मॉल संपूर्णपणे राजेशचा होईल. दीड वर्षानंतर वडिलांचा मृत्यू झाला . कायद्यानुसार व मृत्यूपत्रानुसार पाहिले तर राजेशच्या आईकडे मॉलची संपूर्ण मालकी आली होती .परंतू राजेश सर्व कारभार मालक या नात्याने पाहात असे .दिनेशचा धंदा स्वतंत्र होता. मॉलमध्ये दिनेशचा आता काहीही हक्क उरला नव्हता.
*मॉलवरील हक्क सोडून दिल्याचे कागद सेफमध्ये होते का? आणि ते चोरण्यासाठी दिनेश आला होता का?*
*आणि ते करीत असताना राजेशचा खून झाला का?*
*राजेशचा मृत्यू झाला तर आईनंतर दिनेश मॉलचा मालक होणार होता का ?*
(क्रमशः)
१४/६/२०१९©प्रभाकर पटवर्धन