( ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे .प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा )

उद्या या सर्वांचा छडा लावायचाच असेही अशोकने ठरविले .

दुसऱ्या दिवशी ऑफिसात आल्यावर त्याने तो खोका पुन्हा उघडला .

निरनिराळे तुकडे तो जुळवू लागला. त्याला आपण काल बघितलेले चित्र स्वप्न तर नव्हते ना याची खात्री करून घ्यायची होती.

तुकडे जोडल्यावर तो पाहतो तो ते चित्र बदललेले होते.कालचे चित्र आज नव्हते. आजचे चित्र त्याच्या ऑफिसमधील होते.

चित्रामध्ये काल तो इमारतीच्या दरवाज्याजवळ उभा होता .

चित्रामध्ये अाज तो त्याच्या ऑफिसमध्ये आलेला दिसत होता.?

तो काल पाठमोरा होता.आज तो पुढून दिसत होता. याचाच अर्थ रोज चित्र बदलत होते.

त्याने ऑफिसमध्ये चौकशी केली .चौकशी करता हा खोका कुणीही  विकत घेतला नव्हता किंवा तिथे आणला नव्हता.

एकच शक्यता होती खेळ खेळण्यासाठी आलेल्या कुणीतरी तो खोका तिथे आणून ठेवला होता किंवा तो खोका आपल्याआपण तेथे आला होता!  

काहीही असले तरी ते तेवढेच धोकादायक होते.ज्याप्रमाणे एखादा खोका आणू शकत होता त्याप्रमाणे तो खोका घेऊनही जाऊ शकत होता .त्याने सीसीटीव्ही  पाहिला.तो खोका आणून ठेवताना कुणीही  दिसत नव्हता.याचाच अर्थ तो खोका भारित होता .तो खोका धोकादायक होता. तो खोका आपणहून आला होता .विशेष म्हणजे सीसीटीव्हीमध्ये येताना तो खोका दिसला नव्हता . 

हा खोका कुठून आला ?

यातील तुकडे असे कसे काय बदलतात ? 

स्वतःसकट इमारतीचे  त्याच्या ऑफिसचे चित्र कसे काय तयार झाले?

सर्व गोष्टी त्याच्या कल्पनाशक्तीच्या बाहेर होत्या .

आणखी पुढे काय काय होणार होते?

त्या दिवशी घरी जाताना त्याने तो खोका आपल्याबरोबर घरी नेला.दुसऱ्या दिवशी ऑफिसला जाण्याअगोदर सकाळी त्याने त्या खोक्यातील तुकडे पुन्हा जुळवायला सुरुवात केली .त्याला  काल तयार केलेले चित्र आहे की बदलले आहे ते पाहायचे होते.तुकडे जोडल्यावर त्याच्या घराचा दिवाणखाना तयार झाला होता .त्या दिवाणखान्यात बसून तो ते चित्र जुळवीत होता.हे कूटकोडे अमानवी होते. भारित होते. पाशवी होते .झपाटलेले होते. 

अशोक प्रयोगशील होता.त्याने जुळविलेले चित्र न विस्कटता तसेच ठेवले.जुळविलेले चित्र आपणहून बदलते कि काय ते त्याला पाहायचे होते .संध्याकाळी घरी आल्यावर त्याने चित्र बघितले .चित्र तसेच होते .त्याने ते चित्र रात्रभर तसेच जुळलेले ठेवले.सकाळी उठल्यावर तो बघतो तो काय ते चित्र जुळलेल्या अवस्थेतच बदललेले होते.

आज ते चित्र पुढीलप्रमाणे होते.त्या चित्रात एक अनोळखी माणूस त्यांचे लोखंडी गोदरेजचे कपाट उघडत होता .म्हणजेच तो माणूस घरात चोरी करीत होता.याचाच अर्थ सोडवलेले कोडे, चित्र, तसेच ठेवले तर रात्री ते आपणहून बदलत होते . त्या कोड्यामध्ये त्या खोक्यांमध्ये त्या जुळवलेल्या चित्रांमध्ये, रात्री अमानवी शक्ती बदल घडवून आणीत होती . अशोकने ते सर्व तुकडे त्या खोक्यात भरले.खोके कपाटात ठेवून दिले.मामला गंभीर होत होता .तो खोका, ते कोडे धोकादायक वाटू लागले होते. 

त्या दिवशी रात्री त्यांना त्यांच्या एका मित्राकडे त्याच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त जायचे होते .रात्री आठलाच सर्व गेले .जेवून खाऊन, गप्पाटप्पा होऊन, रात्री बाराला परत आले.ते दरवाजा उघडून आत आल्यावर पाहतात तो सर्व सामान विस्कटलेले होते. त्यांचे गोदरेजचे लोखंडी कपाटही कुणीतरी डुप्लिकेट चावी लावून उघडले होते.कपाटाचे दरवाजे सताड उघडे होते .दागिने व रोख रक्कम यांची चोरी झाली होती .

याचा अर्थ सरळ सरळ असा होता.ते कोडे भविष्य सूचक होते.त्या कोड्यातील तुकडे असे बदलत असत की त्यातून भविष्य सूचित होत असे.किंवा असेही असू शकते .ते कोडे जसे बदले त्याप्रमाणे घटना घडवून आणल्या जात असत.ते कोडे भविष्य सूचक होते किंवा भविष्य निर्माण करणारे व त्याची अंमलबजावणी करणारे  होते !   

ते कोडे जर भविष्य सूचक असेल तर काळजी घेता येणे शक्य होते.अर्थात काळजी घेऊनही घटना घडायच्या तशा घडल्या नसत्याच असे नाही. 

जर ते अमानवी  कोडे दुसऱ्या प्रकारचे असेल तर ते फारच धोकादायक होते.वाईट दुःखद घटना ते तयार करीत होते व नंतर त्याची अंमलबजावणी करीत होते.वाईट घटना निर्मिती व त्याची अंमलबजावणी हा पहिलाच अनुभव होता .नेहमीच त्या कोड्याने तसे केले असते असे नाही.चांगल्या आनंददायी घटनाही चित्रित केल्या असत्या आणि त्याची अंमलबजावणीही केली असती .जास्त अनुभव घेतल्याशिवाय ते अमानवी कोडे कोणत्या प्रकारचे आहे त्याचा उलगडा झाला नसता.    

पहिला प्रकार :कोडे भविष्य सूचक आहे .केवळ वाईट घटनांची,दु:खद घटनांची  सूचना करते.त्याचप्रमाणे चांगल्या सुखद घटनांची सूचना करते. दोन्ही प्रकारच्या घटना चित्रित करते .

दुसरा प्रकार :फक्त वाईट दु:खद घटना चित्रित करते आणि त्याची अंमलबजावणीही करते.

जर कोडे पहिल्या प्रकारातील असेल तर धोका कोणताच नव्हता.आपल्याला फक्त भविष्यकाळातील सूचना मिळाल्या असत्या .

जर ते कोडे अमानवी असेल,वाईट शक्तींनी भारलेले असेल,पिशाच्च बाधित असेल,दुसर्‍या प्रकारचे असेल तर ही गोष्ट फारच भयानक होती.ते कोडे शक्य तितक्या लवकर नष्ट करणे हिताचे होते.

काही काळ अनुभव घेतल्याशिवाय उलगडा होणार नव्हता .जो काही अनुभव यायचा असेल तो ऑफिसात येउदे घरी नको असा विचार करून अशोक ते कोड्याचे खोके ऑफिसात,म्हणजेच तथाकथित अॅकेडेमीमध्ये घेऊन आला.

त्याने ते कोड्याचे विस्कटलेले तुकडे आपल्या ऑफिसमधली टेबलावर तसेच  ठेवून दिले .आठ दिवस त्याने त्या तुकडय़ाना हातही लावला नाही. सर्वत्र आलबेल होती.ऑफिसात रहाटगाडगे व्यवस्थित फिरत होते.दहाव्या दिवशी त्याने ते तुकडे पुन्हा जुळवायचे ठरविले .तुकडे जुळवल्यावर पुढील चित्र निर्माण झाले.खेळाच्या जागी जिथे टेबले मांडलेली होती, त्या जागी हॉलमध्ये आग लागल्याचे चित्र तयार झाले होते .अशोकने रागारागाने ते तुकडे इतस्ततः फेकून दिले.नंतर स्वतःच ते सर्व गोळा करून खोक्यात ठेवले .

दुसऱ्याच दिवशी त्याच्या खेळण्याच्या जागी आग लागली. ऑफिसमध्ये फायर एक्स्टिंगविशरस्  ठेवलेले होते.आग विझविण्याच्या यंत्रणेचा वापर करण्यात आला. आग आटोक्यात आली .विशेष नुकसान झाले नाही .

यातून एक गोष्ट स्पष्ट झाली होती.रात्रीत कोडे बदलत होते.परंतु कुणीतरी ते जुळविल्याशिवाय,  चित्र तयार केल्याशिवाय त्यांमध्ये शक्ती येत नव्हती.अर्थात याचीही खात्री देता येत नव्हती .तुकडे जुळविल्याशिवायही ते कोडे सामर्थ्यसंपन्न असू शकत होते.   

आता हे कोडे धोकादायक वाटू लागले होते.उद्या एखाद्याचा खून होत आहे, खून झाला आहे, मृत्यू झाला आहे, इत्यादी चित्रे तयार होतील आणि प्रत्यक्षात त्या घटना घडतील.ते जुनाट खोके,ते जुनाट कोडे, कोण्यात्याही प्रकारचे,भविष्य सूचक किंवा भविष्य निर्माण करणारे असो,धोकादायक होते .पहिल्या प्रकारचे ~भविष्य सूचक~ असेल याची कोणतीही खात्री देता येत नव्हती .दुसर्‍या प्रकारचे असल्यास,~भविष्य निर्माण करून त्याची अंमलबजावणी करणारे~असल्यास ती गोष्ट फारच धोकादायक होती .धोकाच धोका होता.  

शक्य तितक्या लवकर ते कोडे दूर करणे,त्या कोड्यापासून मुक्ती मिळविणे आवश्यक होते.अशोक विचार करीत होता .कोडे फेकून देणे हा एक मार्ग होता .परंतु जसे ते कोडे आपले आपण आपल्या येथे आले त्याप्रमाणे ते पुन्हा येणार नाही याची कोणतीही खात्री नव्हती.जरी ते दुसऱ्याकडे गेले असते तरीही ते धोकादायक होते.

*ते कोडे नष्ट करणे हाच एक उत्तम उपाय होता .*   

तोच उपाय करण्याचे अशोकने ठरविले .वाहत्या प्रवाहात फेकून देणे ,जमिनीत पुरणे , त्यातील तुकडे तोडून तोडून त्याचे चूर्ण करणे,हे उपाय खात्रीलायक वाटत नव्हते .ते कोडे पुन्हा पूर्वरूप धारण करणार नाही याची खात्री नव्हती .

शेवटी अशोकच्या  मताने एक जालीम उपाय त्याने योजला.  त्या कोड्यासहीत खोक्यावर पेट्रोल ओतून त्याने त्याला आग लावली .सुदैवाने तुकडे लाकडाचे होते .कोडे भस्मसात झाले.त्या राखेतून फिनिक्स पक्षाप्रमाणे पुन्हा कोडे निर्माण होणार नाही याची अशोकला खात्री वाटत नव्हती.त्याने ती राख एका लोखंडी बाटलीत भरली .त्या बाटलीला सील केले .ती बाटली समुद्रात खोलवर फेकून दिली .

नंतर ते कोडे किंवा तसेच दुसरे एखादे कोडे त्याच्याकडे अजून आलेले नाही.बाटली समुद्रतळाला कुठेतरी सुखरूप आहे . 

कोणाच्यातरी हाती केव्हातरी जर ती बाटली लागली.त्याला ती बाटली उघडण्याची दुर्बुद्धी झाली.तर त्यातून वर म्हटल्याप्रमाणे फिनिक्स पक्षाप्रमाणे ते कोडे आकार घेणार नाही व पुन्हा गोंधळ उडवणार नाही असे सांगता येत नाही.

*तुम्ही एवढेच करू शकता .जर अशी एखादी बाटली,पेटी ,खोका , तुमच्या हाती लागला,तर कुतूहलापोटी किंवा धनलाभाच्या अाशेने उघडण्याच्या फंदात पडू नका.*

*असे करणे आपल्या हाताने आपल्या पायावर धोंडा पाडून घेण्यासारखे होईल .*

*चूड दाखवून सैतानाला घरात घेतल्यासारखे होईल.*

*पुन्हा ती बाटली समुद्रात फेकून द्या किंवा खोलवर जमिनीत गाडून टाका*

(समाप्त)

१३/९/२०२०©प्रभाकर  पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel