( ही कथा काल्पनिक आहे.हे सांगण्याची आवश्यकता नाही.कथेत लिहिले आहे तसे काही असेलच असे नाही. नसेलच असेही नाही .)

आम्हा सर्वांना वातावरण भारल्यासारखे वाटले.

आमच्याशिवाय खोलीत आणखी कुणीतरी आहे अशी जाणीव झाली .

पुस्तिकेत लिहिल्याप्रमाणे सर्वत्र दैवी सुगंध पसरला .

ज्योत स्वतःभोवती एखाद्या नर्तकी सारखी गिरक्या घेऊ लागली .

आम्ही पहिला प्रश्न विचारण्यासाठी तयार झालो.

आम्ही पार्वती खोर्‍यात  ट्रेकिंगसाठी जाऊन आलो होतो .दुसऱ्या दिवशी आम्हाला रोहतांग पासला जायचे होते.

रोहतांग पासला आम्ही उद्या जाणार आहोत.सर्व काही ठीकठाक होईल  ना ?

असे आम्ही विचारले . 

प्रश्न विचारल्यावर ज्योत स्वतःभोवती गरगर फिरण्याची थांबली.एखाद्या माणसांप्रमाणे डावीकडे व उजवीकडे ज्योत डोलू लागली .

~जा परंतु एकाला धोका आहे अशी अक्षरे प्रकाशमान झाली. ~   

आम्ही लगेच पुढचा प्रश्न विचारला.

कोणाला धोका आहे ?

~  मला माहित आहे परंतू सांगता येणार नाही~ 

असे शब्द प्रकाशमान झाले.

आम्ही त्या दिवशीचा खेळ थांबविला .सर्वानी जाताना पूर्ण काळजी घ्यायची असे ठरविले . ज्या एकाला धोका आहे तो मी तर नव्हे ना? असे प्रत्येकाला वाटत होते .

जातांना प्रवास व्यवस्थित झाला .आम्ही तिथे बर्फावर मनमुराद खेळलो .

आमच्यापैकी सर्वजण आदल्या दिवशी फळ्याने काय भविष्य सांगितले ते विसरले होते.बर्फ कडक असल्यामुळे पाय सारखे घसरत होते .त्यावरती उभे राहणे आणि चालणे म्हणजे एक कसरत होती .

खेळता खेळता प्रथमेश बर्फावरून घसरला . 

प्रथमेशला उठता येईना .आम्ही त्याला  खाकेत हात घालून उभा केला.पडताना त्याचा डावा हात अंगाखाली आला होता आणि तो मोडला होता .वेदनांनी प्रथमेश ओरडत होता .अाम्हा सर्वांना फर्स्ट एडची थोडीबहुत माहिती असल्यामुळे आम्ही लगेच त्याचा हात व्यवस्थित रुमालात बांधून त्यांच्या गळ्यात अडकविला .

रोहतांग पास वरून परत येताना सर्वच जरा गंभीर होते.तो बोर्ड तो फळा म्हणजे केवळ फसवणूक नव्हती.फळा खरेच भविष्य वर्तवू शकत होता.

दुसऱ्या दिवशी डॉक्टरकडे जाऊन प्रथमेशच्या हाताला प्लास्टर टाकण्यात आले.       आता मनाली फिरून झाली होती . दुसऱ्या दिवशी आम्ही बसमधून दिल्लीला जाणार होतो .तिथून लगेच कनेक्टिंग ट्रेन होती .राजधानी एक्स्प्रेसने आम्ही मुंबईला परत येणार होतो .

रात्री एकाने अकस्मात टूम काढली . त्या फळ्याला अापण प्रवास कसा काय होईल ते विचारू या .रात्री आम्ही सर्वजण प्रथमेशच्या खोलीत जमलो .खिडक्या दरवाजे शटर्स बंद करणे,दिवे मालवणे, इत्यादी सर्व गोष्टी केल्या.फळा उलगडून चांदीच्या नाण्यांवर तुपात भिजवलेली फुलवात ठेवून ती पेटवली.अज्ञात शक्तीची प्रार्थना केली .आज आम्ही सर्वच जरा जास्त गंभीर व भावूक झालो होतो .

दैवी सुवास खोलीत पसरला .

ज्योत स्वतःभोवती गरगर फिरू लागली. 

प्रवास कसा होईल? असा प्रश्न विचारला .

ज्योत गरगर फिरण्याची थांबली. ती डोलू लागली. पुढील अक्षरे प्रकाशमान झाली .

~प्रवास व्यवस्थित होईल फक्त तुम्ही उशिरा मुंबईला पोचाल.~

सर्वानी सुस्कारा सोडला .त्याचा एकच आवाज बंद खोलीत घुमला .याचाच अर्थ सर्वानी प्रश्न विचारल्यावर श्वास रोखून धरले होते .

आमचा प्रवास व्यवस्थित झाला .आम्ही सर्व मुंबईला सुखरूप पोहोचलो .कोटा येथे दोन गाड्यांची टक्कर झाली होती .त्यामुळे तिथे मदत कार्य सुरू होते .रस्ता  बंद होता.कोटावरून आमची गाडी पुढे जाऊ शकत नव्हती.

दुसऱ्या  मार्गाने राजधानी एक्स्प्रेस वळविण्यात आली .आम्ही जवळजवळ दहा तास उशीरा मुंबईला पोहोचलो .

अाम्हा सर्वांचा त्या भारलेल्या,झपाटलेल्या  फळ्यावर विश्वास बसला होता .

तो फळा माझ्याकडे माळ्यावर घडी करून आम्ही जपून ठेवून दिला होता .तेवढीच गरज पडल्याशिवाय त्याचा वापर करायचा नाही असे आम्ही ठरविले होते .

आपल्याला भविष्याबद्दल नेहमीच उत्सुकता असते .त्यामुळेच ज्योतिषी व तत्सम इतर यांचा धंदा छान चालतो .

बऱ्याच वर्तमानपत्रात राशीवार भविष्य सांगितलेले असते .

तेच भविष्य थोडा फेरफार करून निरनिराळ्या राशीपुढे रोज आजचे भविष्य म्हणून लिहिले जाते तो भाग वेगळा .

दूरदर्शनवरही बऱ्याच चॅनेल्सवर भविष्यासाठी एक खास स्लॉट ठेवलेला असतो.

भविष्य सांगणारी अॅपही आहेत .

रस्त्यावरच्या पोपट,मैना, घेऊन बसलेल्या कुडमुड्या ज्योतिषापासून ज्योतिषाचार्यापर्यंत सर्वांचा धंदा उत्कृष्ट चाललेला असतो .

कुणाला ना कुणाला काहीतरी प्रश्न पडणारच .सर्वजण तो प्रश्न विचारण्यासाठी जमणार.वेळेचा अपव्यय आणि त्याचबरोबर भविष्य जाणून घेण्याचे गंभीर व्यसन .

आम्ही भविष्य वाचणाऱ्या, पाहणाऱ्या, ज्योतिषांकडे जाणाऱ्या, लोकांना हसत होतो .आणि आता आम्ही बरोबर तेच करणार होतो .

त्या फळ्याचा वापर शक्यतो करायचा नाही असे आम्ही जाणीवपूर्वक ठरविले होते .

अशीच एक दोन वर्षे गेली .फळा माळ्यावर आहे हे सुद्धा आम्ही जवळजवळ विसरून गेलो .

आमचा मित्र रविंद्र यांच्या वडिलांना ब्रेन स्ट्रोक झाला.ते कोमामध्ये गेले.त्यांना आयसीयूमध्ये दाखल केले होते .व्हेंटिलेटरवर ठेवले होते .डॉक्टरी उपाय चालू होते .सुमारे दहा दिवसांनी डॉक्टरनी सांगितले .काका (रवींद्रचे वडील) केव्हा शुद्धीवर येतील  ते सांगता येणार नाही.एखादावेळ शुद्धीवर येणारच नाहीत.त्यांची सपोर्ट सिस्टीम काढली तर लगेच प्राणोत्क्रमण होईल .सपोर्ट सिस्टीम ठेवली तर किती काळ ते तसेच रहातील ते सांगता येणार नाही.जरी शुद्धीवर आले तरी ते अंथरुणाला खिळलेले राहतील त्यांना कदाचित पॅरालिसिस होईल . ते ब्रेन डेड झाले आहेत असेही डॉक्टर सांगत नव्हते.

त्यांच्या घरचे सर्व तणावाखाली होते .अपंग अवस्थेत आयुष्य घालविणे त्याच्या वडिलांना पसंत पडले नसते .यदा कदाचित ते शुद्धीवर आले तर मला तुम्ही जिवंत का ठेवले म्हणून त्यांनी नक्कीच आरडा ओरडा केला असता .त्यांच्या घरात बरीच चर्चा झाली.काय निर्णय घ्यावा ते कुणालाच समजत नव्हते .

आणि आम्हाला त्या फळ्याची आठवण झाली .सपोर्ट सिस्टीम काढावी की काढू नये ते त्या बोर्डला विचारावे असे आम्ही ठरविले .रवींद्रच्या घरच्यांना त्या फळ्याबद्दल माहिती होतीच .फळा जे भविष्य सांगेल त्याप्रमाणे करावे असे आम्ही ठरविले.रवींद्रच्या घरच्यांचे तेच मत होते .किंबहुना रवींद्रच्या आईला फळ्याची आठवण झाली होती.तिनेच त्याला विचारून अंतिम निर्णय घ्यावा असे सुचविले होते .

मी माळ्यावरील फळा काढला. साफसूफ करून फळा घेऊन मी रवींद्रच्या घरी पोचलो .रवींद्रकडे एका खोलीत आम्ही सर्व जमलो.फळ्याला प्रश्न विचारण्याअगोदर कराव्या लागणाऱ्या सर्व गोष्टी आम्ही व्यवस्थित केल्या .दैवी सुगंध खोलीत पसरला. ज्योत गरगर फिरू लागली.आम्ही रवींद्रच्या आईलाच प्रश्न विचारण्यास सांगितले .

सपोर्ट सिस्टीम काढावी कि न काढावी? असा प्रश्न तिने विचारला.

"काढू नये असे उत्तर आले ."(ती अक्षरे प्रकाशमान झाली )

रवींद्रच्या आईने पुढचा प्रश्न विचारला .

ते शुद्धीवर केव्हा येतील ?

उत्तर आले" एक महिन्यानंतर "

त्यांना पक्षाघात होईल का? पुढचा प्रश्न आईनी विचारला.

"नाही"उत्तर आले.

सपोर्ट सिस्टीम काढली गेली नाही .

एक महिन्यानंतर रवींद्रचे वडील शुद्धीवर आले .

त्यांना पक्षाघात झाला नाही .ते आता व्यवस्थित हिंडू फिरू लागले आहेत .

तो फळा खरेच जादूचा होता. झपाटलेला होता. भारलेला  होता.

विचारलेल्या प्रश्नांची त्याने दिलेली उत्तरे प्रत्यक्षात खरी ठरली .

विशिष्ट अक्षरे प्रकाशमान  कशी होत असत हे गूढ आहे .

मनोभावे प्रार्थना केल्यावर कोणती शक्ती खोलीमध्ये अवतीर्ण होत असे ते त्या शक्तीलाच माहिती.

जर भविष्यातील सर्व घटना अगोदरच आखीव रेखीव असतील .तर आपण भविष्य कशाला पाहायचे ?

जे जे जेव्हा जेव्हा घडणार आहे ते ते तेव्हा तेव्हा घडणारच.

जर रवींद्रचे वडील शुद्धीवर येणार हिंडणार फिरणार हे ठरलेले असेल तर त्या फळ्याशिवायही रवींद्रच्या कुटुंबीयांनी  महिनाभर वाट पाहूया शुद्धीवर आले नाहीत तर सपोर्ट सिस्टीम काढा असे डॉक्टरांना सांगू असा निर्णय घेतला असता !!

*भविष्याचा नाद एकूण वाइटच.*

*असा विचार करून आम्ही सर्वसंमतीने एक दिवस तो बोर्ड रॉकेल ओतून पेटवून दिला !!!*

यावर एखादा वाचक म्हणेल कि, 

*फळा मिळणे, त्याला तुम्ही प्रश्न विचारणे, त्याने सत्य उत्तरे देणे ,तुम्ही वर उल्लेख केलेला विचार करून तो जाळून टाकणे, हे सर्व पूर्वनियोजित होते .*

*भविष्य वाचणे,भविष्य ऐकणे, भविष्य पाहणे, ज्योतिषाचार्याकडे जाणे हेही सर्व पूर्वनियोजितच असते.त्याला कोणाचाच इलाज नाही.*

* मी त्याच्या मताशी पूर्णपणे सहमत आहे .*

(समाप्त)

४/२/२०२०©प्रभाकर  पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel