(ही गोष्ट काल्पनिक आहे कुठेही साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा.) 

मी सुरुवातीला प्रार्थनागृहातील दोन रिकाम्या आसनांबद्दल लिहिले आहे .त्यातील डाव्या बाजूच्या एका रिकाम्या आसनाबद्दल लिहावे असे मनात आहे . 

नित्यानंद हे पूर्वाश्रमीचे मधुकर जोशी .कोकणात चिपळूण जवळील एका खेड्यात त्यांचा जन्म झाला .घरची थोडीबहुत शेती होती परंतु त्यात उदरनिर्वाह होण्याची काहीच शक्यता नव्हती .शिक्षण घेणे आणि नंतर नोकरी करणे याशिवाय त्या काळात दुसरा काही मार्ग डोळ्यासमोर नव्हता.

खेडेगावांत शाळा फक्त सातवीपर्यंत होती.पुढच्या शिक्षणासाठी मधुकर मुंबईला आला.मुंबईत कोकणातील प्रत्येक माणसाचा  कुणी ना कुणी नातेवाईक असतोच .गिरगांवातील एका नातेवाईकाकडे त्याने आपली पथारी टाकली .चाळीत त्या नातेवाइकाच्या दोन खोल्या होत्या .त्या काळात स्वयंपूर्ण ब्लॉक ही संकल्पनाच नव्हती .स्नानगृह स्वच्छतागृह समाईक असे.अश्या  समाईक न्हाणीघरात स्नान करावे .गॅलरीमध्ये येणाऱ्या जाणाऱ्यांना वाट ठेवून  रात्री  सतरंजी टाकून झोपावे . शाळेत जावे.गॅलरीतील दिव्याखाली किंवा रस्त्यावरील दिव्याखाली अभ्यास करावा .असा त्याचा दिनक्रम सुरू झाला .

हा काळ  साधारण एकोणीसशे चाळीसचा होता .दुसरे महायुद्ध सुरू झाले होते .मुंबईवर बॉम्ब पडेल अशा भीतीने बऱ्याच लोकांनी आपली बायकामुले गावाला पाठवून दिली होती .त्या काळात गरीब ब्राह्मण मुलांना, शिक्षण घेत असताना उदरनिर्वाहासाठी दोन मार्ग उपलब्ध होते .माधुकरी मागून उपजीविका करणे किंवा वारावर जेवणे.बऱ्याच वाचकाना माधुकरी व वार ही संकल्पना कदाचित लक्षात येणार नाही .(माधुकरी :मुंज झालेला मुलगा सोवळे नेसून एक झोळी बरोबर घेऊन घरोघर भिक्षा मागत असे. त्याच्याजवळ दोन भांडी असत . एका भांड्यात ओली भिक्षा आमटी वरण कढी ताक इत्यादी घेतले जाई. दुसर्‍या  भांड्यात भात पोळी भाकरी यासारखी कोरडी भिक्षा घेतली जाई.फक्त दुपारी माधुकरी भिक्षा मागत असे .त्यातील काही भाग खावून उरलेला संध्याकाळसाठी ठेवला जाई.तो आंबल्यामुळे खराब झाल्यास संध्याकाळी उपास पडे.ताजे किंवा शिळे पदार्थ माधुकरी मध्ये मिळत असत .ज्यांच्या आश्रयाने हा मुलगा राहात असे त्यांच्याकडे क्वचित केव्हातरी  त्याला रात्रीचे जेवण दिले जाई.असे माधुकरी त्या काळात शहरातून सहज सर्वत्र आढळत .)

(वार पध्दती:आपल्या ओळखीमध्ये किंवा ओळखीबाहेरही आठवडय़ातून एखादा दिवस किंवा एखादी वेळ सकाळ संध्याकाळ वारकऱ्याला जेवायला दिले जाई.सामान्यत: यजमानाबरोबरच तो जेवायला बसत असे.अश्या  प्रकारे सात दिवस सात जणांकडे आणि एकच वेळ काही जणांनी दिली असल्यास त्याहून जास्त जणांकडे जेवायला जावे लागत असे .प्रत्येकाच्या जेवणाच्या वेळा सांभाळाव्या लागत .जेवणही भिन्न  प्रकारचे असे.जास्त तिखट, कमी तिखट, गोड, केवळ भात,  केवळ भाकरी पोळी इ. )

माधुकर्‍याशी तुलना करता  वारकरी हा चांगलाच खाता पिता  व सुस्थितीत  असे. 

मधुकर, वारावर जेवत होता .नातेवाईकाच्या आश्रयाने राहत होता . मुळातच हुषार असल्यामुळे असे सर्व हाल असूनही त्याने आपला पहिला नंबर कधीही सोडला नाही .मॅट्रिक झाल्यावर( त्याकाळी मॅट्रिकची परीक्षा होती ती मुंबई विद्यापीठाकडून घेतली जाई.)मधुकर कॉलेजात जाऊ लागला .त्याचवेळी मधुकरने चले जाव चळवळीमध्ये भाग घेतला .एक वर्षाची शिक्षा भोगूनही तो आला .

आता मधुकर वारावर जेवत नव्हता .पुस्तक छपाई करणाऱ्या छापखान्यात त्याला नोकरी लागली होती .कच्ची छपाई केलेली  मुद्रिते तपासून ती दुरुस्त करण्याची (प्रूफ रिडिंग )ही नोकरी होती.दिवसा कॉलेज, आणि उरलेल्या वेळात संध्याकाळी मुद्रिते तपासणे, असे त्याचे रूटीन होते .

जेव्हा कॉलेजला सुटी असे त्यावेळी तो मिळेल ती इतर  कामे करीत असे .अशा प्रकारे त्याचा चरितार्थ व शिक्षण चालले होते .

तात्यासाहेब नागपूरकर नावाचे एक मोठे लेखक त्या काळात होते .कथा कादंबरी या प्रमाणेच विचारपरिप्लुत विद्वज्जड लिखाणही ते करीत असत. जुन्या बखरी मिळवून त्यांचे इतिहास संशोधनही चाललेले असे.त्यांच्या पुस्तकांची छपाई जेथे मधुकर मुद्रिते तपासात असे त्या कारखान्यात केली जात असे .तात्यासाहेब काही कामानिमित्त छापखान्यात आले असताना त्यांच्या नजरेस मधुकर पडला.मधुकरचे हस्ताक्षर त्यांना अतिशय आवडले.त्यांचे हस्ताक्षर विशेष चांगले नव्हते .त्यांनी लिहिलेले पुन्हा सुवाच्य अक्षरात लिहिण्याची गरज असे.त्यांनी मधुकरला तू माझ्याकडे काम करशील  का म्हणून विचारले .सकाळी दोन तास तात्यासाहेबांकडे जावून पुनर्लेखन  करावे असे त्यांनी सुचविले .त्यांनी या कामासाठी देऊ केलेला मोबदला आकर्षक होता .मधुकरने लगेच ते काम स्वीकारले .

तात्यासाहेब नागपूरकर म्हणजे एक श्रीमंत खानदानी असामी होती .त्यांची वडिलोपार्जित इस्टेट भरपूर होती. त्यांना उदरनिर्वाहासाठी काहीही काम करण्याची गरज नव्हती. कथा कादंबऱ्यामुळेही त्यांना बऱ्यापैकी उत्पन्न मिळत असे.

तात्यासाहेबांचा बंगला मोठा होता . दिवाणखान्यात व इतरत्रही पसरलेले गालिचे,निवडक  तैलचित्रे ,जगातून गोळा केलेल्या शोभिवंत वस्तू ,घरात काम करणारे नोकर चाकर,नेहमी असणारा पाहुण्यांचा राबता, मुंबईतील उच्चभ्रू लोकांकडे असणारी त्यांची ये जा , या सर्वातून त्यांची श्रीमंती, त्यांचा खानदानीपणा,त्यांची चोखंदळ वृत्ती, त्यांची कलासक्ती , दिसत असे .

मधुकर  रोज नियमितपणे पुनर्लेखनासाठी तात्यासाहेबांकडे जात असे.  नम्रपणा, मनमिळावू वृत्ती, संभाषण कला, यामुळे मधुकर त्यांच्या घरातीलच एक सदस्य झाला .वहिनीसाहेब, तात्यासाहेबांच्या पत्नी,यांचा तो लाडका होता .दुर्दैवाने तात्यासाहेबांना मूलबाळ नव्हते.वहिनीसाहेब मधुकरला मुलाप्रमाणे समजत असत. वागवतही असत.

* त्यांची भाची शोभना त्यांच्याकडे शिक्षणासाठी राहात असे.*

गोरापान, मध्यम उंची, धारदार नाक, किंचित अंतर्मुख असे तेजस्वी डोळे,बुद्धिमत्तेने उजळलेला चेहरा ,यामुळे मधुकर कुणाच्याही नजरेत भरत असे .त्याची कुणावरही छाप पडत असे .

मधुकर व शोभना यांची तात्या साहेबांकडे रोजच गाठ पडत असे. मधुकरला चहा देणे, तो जेवायला असेल त्या वेळी जेवायला वाढणे,यामुळे त्यांचे संभाषण रोजच होत असे.मधुकरचे संस्कृत चांगले होते.शोधनाचे संस्कृत कच्चे होते .तात्यासाहेबांनी शोभनाच्या संस्कृतसाठी मधुकरची शिकवणी लावली.

हळूहळू मधुकर व शोभना यांना परस्पराशिवाय करमत नाही  अशी परिस्थिती निर्माण झाली .कुणीही केव्हाही मर्यादांचे उल्लंघन केले नाही.चौपाटी, मलबार हिल, किंवा अन्यत्र भेटण्याची शक्यता असूनही ,दोघे कधीही बाहेर भेटली नाहीत .

तात्यासाहेबांना व वहिनीसाहेबांना आपले नाते मान्य आहे, मान्य होईल, असे दोघांनाही वाटत होते .मधुकर केवळ गरिबी सोडली तर कुठेही कमी नव्हता .

ती दोघे विवाह करू इच्छितात हे  शेवटी मधुकर व शोभना यांनी तात्यासाहेब व वहिनीसाहेब यांच्या कानावर घातले.वहिनीसाहेबांना हे नाते मान्य होते . भाचीला त्या मुलीसारखे समजत असत.तर मधुकरला मुलासारखे समजत असत.

शोभनाचे वडील,   वहिनीसाहेबांचे बंधू भाऊसाहेब, यांच्या कानावर ही गोष्ट घालण्यात आली. भाऊसाहेबांच्या खानदानाच्या कल्पना कठोर कडक होत्या .मधुकरची गरिबी या नात्याच्या आड आली . त्यांनी या नात्याला मान्यता दिली नाही .तात्यासाहेब भाऊसाहेबांइतके पुराणमतवादी नसले तरी त्यांनाही हा नातेसंबंध विशेष पसंत नव्हता .

मधुकरला व शोभनाला वडील माणसांना दुखवून,त्यांच्या मनाविरुद्ध , काहीही करावे असे वाटत नव्हते.वडील माणसांचा आशीर्वाद असला तरच आपण विवाह करु अन्यथा नाही असे दोघांनीही ठरविले होते .

लग्न मोडले. त्याचा खोलवर परिणाम मधुकरवर झाला.तो आजारी पडला .आपल्या गावी परत आला .आजारातून पूर्ण बरा झाल्यानंतर त्याने संन्यास घ्यायचे ठरविले .त्यांच्या नात्यातील एका ज्ञानमार्गी संतांकडून त्याने ज्ञानमार्गाची  दीक्षा घेतली . करतल भिक्षा तरुतल वास अशी काही वर्षे काढली.

नंतर त्याने मधुकर या नावाचा त्याग करून नित्यानंद हे नाव धारण केले .विधिपूर्वक सन्यास त्यांनी घेतला नाही .सन्यास आतून पाहिजे, बाह्य वस्त्रांवर व विधींवर अवलंबून नाही, असे त्यांचे ठाम मत होते .बाह्य अवडंबराला त्यांनी कधीच महत्त्व दिले नाही .अंतर्मुखता, आतूनच सर्व गोष्टींचा त्याग याला महत्त्व आहे .असे ते नेहमी सांगत असत .

वर सांगितल्याप्रमाणे करतल भिक्षा व तरुतल वास असे जीवन स्वामी नित्यानंद  व्यतीत करीत असताना एका भल्या गृहस्थाना त्यांना आपल्या घरी आणून ठेवावेसे वाटले.काही वर्षे ते त्यांच्याकडे राहत होते .

हळूहळू त्यांचे अनुग्रहित वाढत चालले .चंदनाचा सुवास जसा सर्वत्र पसरतो तसा त्यांचा बोलबाला सर्वत्र हळूहळू झाला . त्यांच्या  शिष्यगणानी एकत्र येवून मठाची स्थापना केली.मठ स्थापन करण्यामध्ये ज्या भल्या गृहस्थांकडे ते राहत होते त्यांचा मोठा वाटा होता.

* वयोमानानुसार स्वामी नित्यानंदांनी  देहत्याग केला .त्यांची समाधी बांधण्यात आली आहे .*

*समाधी मंदिराला भाविक व इतर पर्यटकही मोठ्या संख्येने भेट देत असतात .*

*सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे अजूनही सकाळ संध्याकाळ प्रार्थना होत असते.*

*पूर्वी दोन अासने मोकळी ठेवलेली असत. आता तीन आसने मोकळी ठेवलेली असतात.*

* पहिले ,जिथे स्वामी नेहमी ध्यानाला बसत ते,

*दुसरे,  डावीकडचे आसन शोभनासाठी,ती कुठेही असली तरीही ती त्या आसनावर प्रार्थनेच्या वेळी आहे असा स्वामींचा दृढ विश्वास होता .*

*प्रार्थनेचे फळ तिला तिथे मिळत असणार यात काहीच शंका नाही .*

*तिसरे ,उजवीकडचे  आसन स्वामींचे एक जिवश्च  कंठश्च  मित्र होते. त्यांच्यासाठी हे आसन मोकळे ठेवलेले असते.तुम्ही मुक्त झाल्याशिवाय मी मुक्त होणार नाही असे स्वामीनी त्यांना वचन दिले होते असे म्हणतात *

(समाप्त)

२२/१/२०२०©प्रभाकर  पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel