( ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे .प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा )
एक दिवस अशाच गप्पा मारीत असताना ती सहज बोलून गेली .अाज तू घातलेला शर्ट तुला फारच खुलून दिसत होता. तुला आकाशी रंग खुलून दिसतो .तुला कोणतेही माइल्ड कलर्स, मंद रंग चांगले दिसतात.या तिच्या बोलण्यावरून तीही याच शहरात राहात होती एवढेच नव्हे तर ती कुठे तरी माझ्या आसपास राहत असावी .किंवा मी जिथे नोकरी करतो तिथे किंवा त्याच्या जवळ कुठे तरी नोकरी करत असावी.असा तर्क मी केला .
एकदा तिला आपण कुठे तरी ठरवून प्रत्यक्ष भेटूया असा प्रस्ताव मी दिला.त्यावर घाई काय आहे केव्हांतरी आपण नक्की भेटणारच आहोत असे उत्तर तिने दिले.ती पुढेही मिश्किलपणे म्हणाली मी कोण आहे ते ओळखून तर काढ.मी तुझ्याजवळ आसपासच आहे . ही तुझी परीक्षाच समज.
मी माझ्या ऑफिसमधील सर्व मुली डोळ्यासमोर आणू लागलो .त्यातील माझ्याशी चॅट करणारी, गप्पा मारणारी, मुलगी कोणती असेल याचा अंदाज बांधू लागलो . तिने तिचे नांव प्रतीक्षा सांगितले होते .फेसबुकवरही तेच नाव होते.मी संगणकावर आमच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या सर्वांचे नाव पहाले. त्यात प्रतीक्षा नाव आढळले नाही.मी तिच्याशी गेले चार महिने मारलेल्या गप्पा आठवीत होतो. त्या गप्पातून ती कोण आहे याचा काही उलगडा होतो का ते माझे मी शोधत होतो. शेवटी ती माझ्या ऑफिसमध्ये नसावी या निष्कर्षावर मी अालो.
आमच्या ऑफिसची बिल्डिंग दहा मजली आहे.आमचे ऑफिस तीन मजल्यावर पसरलेले आहे.उरलेल्या सात मजल्यावर दहा ऑफिस आहेत.ती जर माझ्या ऑफिसमधील नसली तर ती या ऑफिसांमधील कुठच्या तरी ऑफिसमधील असली पाहिजे .रोज एकेक ऑफिसमध्ये जाऊन चौकशी करायची असे मी ठरविले .या प्रतीक्षाला शोधून काढीनच असा निश्चय मी केला होता .मात्र तिने फेसबुकवर आपले खरे नाव दिले असले पाहिजे .खरा फोटो दिला असला पाहिजे .
पुढील काही दिवस मी आळीपाळीने प्रत्येक ऑफिसमध्ये जाऊन प्रतीक्षा नावाच्या मुलीची चौकशी करीत होतो .कुठे ती माझ्या लांबच्या नात्यातली आहे ,कुठे ती माझी मैत्रीण आहे ,कुठे ती माझी चुलत बहीण, आतेबहीण, मामेबहीण आहे, असा बहाणा करीत होतो. मला अाडनाव विचारीत असत.मी प्रतीक्षा सरपोतदार आहेत का ?असे विचारीत असे .माझ्यापुरते मी तिचे आडनाव सरपोतदार ठेवले होते.मला अनेकजण अहो तिला फोन कराना असे सांगत.तिचा फोन नंबर माझ्याकडे नाही असे मला सांगावे लागे. आणि ते खरेच होते. समजा तिचे नाव खरेच प्रतीक्षा असले,आणि ती एखाद्या ऑफिसमध्ये असली तर कुणीतरी म्हणेल प्रतीक्षा अमुक अमुक आहेत सरपोतदार नाहीत.मग मी म्हटले असते चुकून मी सरपोतदार म्हणालो.
मला कुठेही माझी फेसबुक मैत्रिण सापडली नाही .तिचे प्रतीक्षा नाव खोटे असावे किंवा ती माझ्या बिल्डिंगमध्ये कुठेही काम करीत नसावी.
रोज रात्री हितगुज(चॅटिंग) करताना ती मला डिवचीत असे.सापडली का तुझी मैत्रीण? या तिच्या खोचकपणे चौकशी करण्यावरून मी रोज काय करतो यावर तिला लक्ष ठेवता येत होते हेही माझ्या लक्षात आले .रोज गप्पा मारता मारता सहज बोलते असे दाखवून, ती घरातून मी केव्हा निघालो, ऑफिसमधून केव्हां निघालो, माझा पोषाख काय होता,सर्व काही व्यवस्थित सांगत असे .स्वत:ची ओळख मात्र गुप्त ठेवीत असे.जणू काही माझ्या सहनशक्तीचा अंतच पहाण्याचे तिने ठरविले असावे.मीही या प्रतीक्षेला शोधून काढीनच असा मनाशी पण केला होता.
मी आमच्या ऑफिसच्या बिल्डिंगच्या बाहेर मोटारसायकलवर एखाद्या मित्राशी गप्पा मारीत उभा राहात असे.माझे लक्ष मात्र बिल्डिंगमधून बाहेर येणाऱ्या किंवा आत जाणाऱ्या मुलींवर असे.तिने फेसबुकवर जो फोटो टाकला होता त्याच्याशी साधर्म्य दाखविणारी मुलगी मला सापडली नाही.
माझ्या प्रदीर्घ संशोधनानंतर शेवटी मी पुढील निर्णयावर आलो.तिचे नाव बहुधा प्रतीक्षा नाही.तिने बहुधा आपला खरा फोटो फेसबुकवर टाकलेला नाही.ती आमच्या ऑफिसच्या बिल्डिंगमध्ये काम करीत नाही.जरी तिचे नांव प्रतीक्षा असले, जरी तिने आपला खरा फोटो फेसबुकवर टाकला असला,तरी ती आमच्या ऑफिसच्या बिल्डिंगमध्ये किंवा जवळच्या एखाद्या बिल्डिंगमध्ये काम करीत नाही हे नक्की. गोल गोल फिरून शेवटी मी जिथे होतो तिथेच होतो .मला प्रतीक्षा सापडण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत होती.
रोज बरोबर दहा वाजता आमच्या गप्पांना सुरुवात होत असे .कधी तास कधी दीड तास तर कधी दोन अडीच तासांपर्यंत आमच्या गप्पा होत असत .आम्हा दोघांना फेसबुकवर भेटण्याचे गप्पा मारण्याचे व्यसन लागले होते.ही प्रतीक्षा जर मला प्रत्यक्ष भेटली असती तर मी तिच्याशी कितपत सफाईने गप्पा मारू शकलो असतो ते देवच जाणे.सफाईने चतुराईने वाटेल त्या विषयावर गप्पा मारणारा मी प्रत्यक्ष भेटीत नक्कीच गडबडून गेलो असतो .आपल्याशी रोज गप्पा मारणारा, मोकळेपणाने आपले हृदगत सांगणारा हाच का तो सुधांशू असे ती नक्की मनात म्हणाली असती.
मी ऑफिसमध्ये तिचे संशोधन करीत होतो.तिला शोधीत होतो .मी बहुधा चुकीच्या मार्गावर (ट्रॅकवर)असावा ,अशा निर्णयावर मी शेवटी आलो.माझी शोध घेण्याची जागा चुकली होती. मी जिथे राहात होतो ते सात इमारतींचे एक भव्य संकुल (कॉम्प्लेक्स ) होते. प्रत्येक इमारत सात मजली होती .लहान मोठे एकूण शे सवाशे फ्लॅट होते.त्यात निदान प्रतीक्षेच्या वयाच्या, अर्थात मी प्रतीक्षेचे जे वय धरत होतो त्या वयाच्या,पंचवीस तीस मुली असायला हरकत नव्हती.त्यातील एखादी प्रतीक्षा असण्याची शक्यता होती.आमच्या संकुलाला लागून आणखी तीनचार मोठी संकुले होती.यात कुठेही प्रतीक्षा असणे शक्य होते.नाव खरे, फोटो खरा ,मी चुकीच्या जागी तिला शोधत होतो .असे कशावरून नसेल. असा विचार माझ्या मनात आला.
पुन्हा उत्साहात मी तिला शोधायला सुरुवात केली .यावेळी गप्पा मारताना मी हरल्याची कबुली तिला दिली होती .मी तिला शोधून काढू शकत नाही असे सांगितले होते .मी तुझ्यावर प्रेम करतो याचीही कबुली दिली होती.तिनेही तशीच कबुली मला दिली होती .आता तूच मला येऊन भेट असे मी तिला सांगितले होते .त्यावर तिने योग्य वेळ येताच मी तुला भेटेल असे उत्तर दिले होते .योग्य वेळ केव्हा असे विचारता ती फक्त हसली होती .
असे असले तरी मी गुप्तपणे तिला कळू न देता तिचा तपास चालूच ठेवला होता.आणि शेवटी मी तिला शोधून काढण्यात यशस्वी झालो . संध्याकाळी फिरायला निघालो असताना आमच्या संकुलाच्या जवळील एका संकुलामधून बाहेर पडताना मी तिला पाहिले.मी तिचा पाठलाग तिला न कळता सुरूच ठेवला. ती तिथेच राहते असे आढळून आले .पुढे ती काय करते? कुठल्या फ्लॅटमध्ये राहते ?ते शोधून काढणे सोपे होते . परिश्रमातून नव्हे तर केवळ दैवयोगाने मला तिचा पत्ता समजला होता .मी तिच्याबद्दल सर्व माहिती शोधून काढली .
आमच्या संकुलाच्या रस्त्यावर असलेल्या एका संकुलामध्ये ती राहात होती .तिचा म्हणजे तिच्या वडिलांचा फ्लॅट रस्ता मुखी (रोड फेसिंग) होता.ती बँकेत नोकरीला होती. आमच्या ऑफिसच्या जवळच चारपांच इमारती नंतर तिची बँक होती.तरीही ती मला कधी दिसली नव्हती एवढे मात्र खरे! माझ्या येण्या जाण्यावर तिला सहज लक्ष ठेवता येत असे.त्यामुळे मी कोणता पोशाख घातला आहे. केव्हां घरातून निघालो.वगैरे गोष्टी ती व्यवस्थित सांगू शकत असे. आमच्या ऑफिसमध्ये तिची एक मैत्रीण होती .तिच्या मार्फतही तिला मी तिचा कसून शोध घेत आहे हे कळले असावे .
मी तिला शोधून काढल्यावर तिला चकित करायचे ठरविले .ती बँकेतून बाहेर पडून आपली स्कूटर घेत असताना मी तिला पाठीमागून प्रतीक्षा म्हणून हाक मारली.तिने चमकून मागे पाहिले .मी दिसताच तिच्या चेहऱ्यावर स्मित पसरले.आम्ही दोघे गप्पा मारतच कॉफी हाऊसमध्ये शिरलो .तिच्याशी प्रत्यक्ष गप्पा मारताना माझा संकोची स्वभाव कुठच्या कुठे पळून गेला होता.प्रतीक्षाने माझा बुजरा स्वभाव बदलून टाकला होता.मी जसा मुलांमध्ये वाक्पटू होतो तसाच मुलींमध्येही झालो.
*थोड्याच दिवसात आमचा विवाह झाला . *
*सुरवंटातून जसे फुलपाखरू बाहेर यावे तसा माझ्या कोषातून मी बाहेर आलो होतो.*
*जेव्हा बदललेला मी माझे मित्र व नातेवाईक पाहतात तेव्हा ते आश्चर्यचकीत होतात.*
*या किमयेचे श्रेय ते प्रतीक्षाला देवून टाकतात*
(समाप्त)