( हीकथा संपूर्णपणे काल्पनिक आहे .प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा )

त्यावर मंद स्मित करीत सुनंदा म्हणाली इतकी लांबलचक प्रस्तावना करण्याचे कारण नाही .

तुम्ही एखादा व्यक्तिगत ऑफिसबाह्य प्रश्न विचारला तरी माझी हरकत नाही.तुमच्या कोणत्याही प्रश्नाला उत्तर द्यायला मला आवडेल.मला आनंद होईल.

ऑफिसमध्ये आपण अगदी औपचारिकच असले पाहिजे असे नाही .अधूनमधून अनौपचारिकता सकस संबंधांसाठी( हेल्दी रिलेशनसाठी) चांगली असते . 

त्यावर नचिकेत  म्हणाला तुम्ही रोज पांढरा शुभ्र पोशाख करून येता .अर्थात तो पोषाख तुम्हाला खुलून दिसतो हा भाग निराळा.(त्यावर सुनंदा छानपैकी लाजली.)तो पुढे म्हणाला याचे काही विशेष कारण आहे का?

असा काही प्रश्न तो विचारील याची सुनंदाला तीळमात्र कल्पना नव्हती.या अकस्मात आलेल्या,कल्पना नसलेल्या प्रश्नाने ती गोंधळून गेली.तिला काय उत्तर द्यावे ते सुचत नव्हते .आपल्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती ,गरिबी, पूर्वीचा शिक्षिकेचा व्यवसाय,नवीन कपडे घेण्यामधील असमर्थतता इत्यादी गोष्टी सांगणे तिला योग्य वाटले नाही.त्या वेळी जे सुचले ते उत्तर तिने दिले .

ती म्हणाली. माझ्या वडिलांचा नुकताच मृत्यू झाला आहे.अति जवळच्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर महिनाभर पांढरा शुभ्र पोषाख घालावा अशी आमच्यात प्रथा आहे .या उत्तरावर असे होय ठीक ठीक मी तुमच्या भावना दुखावल्या .तुम्हाला तुमच्या वडिलांच्या मृत्यूची आठवण करून देवून तुम्हाला क्लेश दिले याबद्दल माफ करा असे तो म्हणाला.

त्यावर काहीच न बोलता खाली मान घालून ती केबिन बाहेर आली .आपल्या जागेवर येऊन बसल्यावर तिला आपण हे काय बोलून गेलो याबद्दल मन खाऊ लागले.आपण असत्य बोललो.ती सर्वसाधारणपणे नेहमी सत्य बोलत असे.आपण आपल्या प्रिय वडिलांना ठार मारले असेच तिला वाटू लागले.बोलता बोलता तिच्या हातून दोन चुका झाल्या होत्या .त्या रात्री तिला नीट झोपही लागली नाही .दुसऱ्या दिवशी ऑफिसात तिचे पाणीदार डोळे तारवटलेले, ओढलेले, म्लान  दिसत होते.ती इतकी आजारी वाटत होती की नचिकेतने तिला तुम्हाला बरे वाटत नाही काय?वाटल्यास तुम्ही लवकर घरी जाऊ शकता असे सांगितले . त्यावर तिने नको मी ठीक आहे असे उत्तर दिले.

ऑफिस सुटल्यावर ती घरी जाण्यासाठी निघाली .ऑफिस व जय मल्हार टॉवर रेल्वे स्टेशनपासून दूर असल्यामुळे, बसने ऑफिसला येणे  जाणे तिला ठीक वाटत असे .ती बसस्टॉपवर उभी होती.आपली मोटार घेऊन नचिकेत निघाला होता .तिला बसस्टॉपवर पाहून त्याने तिला तुम्हाला कुठे जायचे आहे असे विचारले .ती नको नको म्हणत असताना त्याने दरवाजा उघडून तिला बसण्यास सांगितले.वाद घालत न बसता ती मुकाट्याने आज्ञाधारकपणे फ्रंटसीटवर येऊन बसली .मनोमनी ती सुखावली होती. 

मी अंधेरीला जाणार आहे.तुम्हाला कुठे सोडू असे त्याने विचारले.  

त्यावर तिने मीही  अंधेरीलाच राहते असे त्रोटक उत्तर दिले .

अंधेरीला येईपर्यंत त्याने तिला ती पूर्वी कुठे नोकरी करीत होती?तिचे घर कुठे आहे? तिचे कुटुंबीय  येथेच असतात का?घरी कोण कोण असतात ?या स्वरूपाचे कांही प्रश्न विचारून तिचा संकोच दूर करण्याचा प्रयत्न केला.तिचा संकोच तर दूर व्हावा परंतू आपण जास्त व्यक्तिगत प्रश्न विचारीत आहेत असे होऊ नये असा त्याचा प्रयत्न होता. ती मुंबईची नाही.ती चिपळूणची आहे असे कळल्यावर तिला मुंबईची गर्दी, हवा, वातावरण संस्कृती कशी वाटते?ती येथे केव्हां आली?अशा स्वरूपाचे सर्वसाधारण प्रश्न त्याने विचारले. नचिकेतचा मुख्य उद्देश तिचा संकोच दूर व्हावा हा होता.प्रश्न विचारता विचारता, तिला बोलती करता करता, त्याने खुबीने तिची माहितीही जाणून घेतली होती.

अंधेरीला आल्यावर त्याने तुम्हाला कुठे सोडू म्हणून विचारले.त्यावर तिने तिचा पत्ता सांगितला व तुम्हाला सोयीस्कर असेल तिथे सोडून द्या असे सांगितले .त्यावर तो आश्चर्यचकित होऊन म्हणाला मीही त्याच जयमल्हार टॉवरमध्ये तुमच्याच विभागात दहाव्या मजल्यावर राहतो.इतक्या दिवसात आपली भेट कशी झाली नाही आश्चर्य आहे .मुंबईत कुणाचे कुणाकडे लक्ष नसते.जो तो आपल्या गर्दीत व नादात असतो हेच खरे. अशी पुस्तीही वर जोडली.

तिला टॉवरखाली सोडता सोडता तो म्हणाला, तुमची हरकत नसेल तर, तुम्हाला संकोच वाटणारा नसेल तर ,तुम्ही माझ्याबरोबर रोज ऑफिसला येवू शकता. त्यावर ती होकारार्थी किंवा नकारार्थी काहीही न बोलता त्याचा निरोप घेऊन लिफ्टकडे गेली.दुसऱ्या दिवशी सकाळी ती ऑफिसला जायला निघाली तेव्हा तो मोटार घेऊन फाटकाजवळ तिची वाट पाहत होता .ती आल्यावर त्याने काही न बोलता दरवाजा उघडला.तीही मुकाट्याने आत बसली.नचिकेत बरोबर ती रोज ऑफिसला येऊ जाऊ लागली . 

असेच आणखी आठ दहा दिवस गेले .सुनंदा साहेबांबरोबर रोज ऑफिसमध्ये येते व त्यांच्याबरोबरच जाते हे सर्वांना माहीत झाले होते.या बावळट सुनंदामध्ये साहेबांनी काय पाहिले अशीही चर्चा रंगत होती. सुनंदा नचिकेतला पाहिल्याबरोबर त्याच्या प्रेमात पडली होती .चांगले रंगीबेरंगी फॅशनेबल कपडे घालावे असे तिला वाटत होते.हे सर्व नचिकेतवर आपले इंप्रेशन पडावे यासाठी होते.नचिकेतचे लक्ष वेधून घ्यावे त्यासाठी तिला तसे वाटत होते.परंतु  तिचा पोशाख साधा सामन्य असूनही नचिकेत तिच्या त्या साधेपणावर प्रेम करू लागला होता.प्रत्यक्षात नचिकेत पोशाखावर नव्हे तर तिच्यावर प्रेम करीत होता .जेव्हा नचिकेतने सहज तिला विचारले होते की सदैव तुमचा पांढराशुभ्र एकच पोषाख कां असतो ?त्यावेळी ती गांगरून गेली होती.त्यावेळी सुचले ते उत्तर तिने दिले होते.

आता ती गंभीरपणे विचार करू लागली होती .महिना पूर्ण होण्याच्या आत  तिला निदान दोन तीन तरी रंगीबिरंगी पोषाख  विकत घेणे आवश्यक होते .अत्यंत जवळील नातेवाईकाच्या मृत्यूनंतर एक महिना पांढरा शुभ्र पोषाख  घालण्याची आमची पद्धत आहे असे ती बोलून बसली होती . तिची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता पहिला पगार झाल्याशिवाय पोषाख  खरेदी करणे तिला शक्य नव्हते.

तिची मैत्रीण दीपिकाने तिला मालतीकाकूंचे डिपॉझिटचे पैसे देण्यासाठी अगोदरच पैसे दिले होते .तिच्याजवळ आणखी पैसे मागण्यासाठी तिला संकोच वाटत होता .सुनंदा रोज घडलेल्या महत्त्वाच्या सर्व गोष्टी दीपिकाला सांगत असे .नचिकेत व त्यांच्याशी झालेले संवाद काही प्रमाणात तिने दीपिकाला सांगितले होते .जवळची व्यक्ती मृत्यू पावल्यावर एक महिना शुभ्र पोषाख परिधान करण्याची आमच्या  प्रथा आहे हेही तिने सांगितले होते. ती गोष्ट दीपिकाला आठवत होती .दीपिकाने तिला महिना संपल्यावर तू काय करणार आहेस म्हणून विचारले .त्यावर सुनंदा कसनुसे हसली.तिची अडचण ओळखून दीपिकाने पाच हजार रुपये तिच्या हातात ठेवले.त्यातून तिने तिला शोभतील असे आवडलेले दोन सलवार कमीज विकत आणले .तिचा  पांढरा शुभ्र पोशाख पाहून ऑफिसातील इतरांनीही तिला त्याबद्दल विचारले होते .त्यांनाही तिने नचिकेतला दिलेले उत्तर दिले होते.एकदा पांढऱ्या शुभ्र पोशाखाच्या जाळ्यात अडकल्यावर तिला तिच्याजवळ  असलेले दोनतीन रंगीत ड्रेस व साड्याही  वापरता आल्या नव्हत्या.

आता तिला दुसऱ्या एका प्रश्नाने छळायला सुरुवात केली .नचिकेत आपल्याला आवडतो ही गोष्ट तिने तिच्या मनात केव्हांच अगदी सुरुवातीला त्याला बघितला तेव्हां कबूल केली होती.आपण त्याला आवडतो हेही तिच्या लक्षात आले होते.आज ना उद्या आपले वडील तिला भेटणार.आपण तर त्या दिवशी गांगरल्यामुळे त्यांच्या मृत्यूबद्दल  त्याच्याजवळ बोलून गेलो.पांढऱ्या शुभ्र पोषाखाचे कारणही ठोकून दिले.आता काय करावे .

एक असत्य दुसऱ्या असत्याला जन्म देते .आपणच निर्माण केलेल्या धाग्यात स्वतःच गुरफटत जावे त्याप्रमाणे आपण निर्माण केलेल्या असत्यात खोलखोल रुतत जातो.त्यातून बाहेर पडणे कठीण होत जाते .

तेव्हा वेळीच सर्व सत्य नचिकेतला सांगून टाकावे असे तिने ठरविले.ती ऑफिसात रुजू झाल्याला पंचवीस दिवस झाले होते.अजूनही ऑफिस, मोटरीतून येणे जाणे, दोन वेळा त्याच्या निमंत्रणाला मान देऊन त्याच्या फ्लॅटवर  जाणे एवढ्यापुरतेच त्यांचे संबंध राहिले होते. एक दिवस ऑफिसातून परत येताना तिने मला तुमच्याजवळ काहीतरी महत्त्वाचे बोलायचे आहे असे सांगितले .त्याने आज आपण  बाहेर जेवायला जाऊ म्हणून तिला निमंत्रण दिले. तिने ते निमंत्रण आनंदाने स्वीकारले .दोघे बाहेर एका नामांकित रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेली.

निरनिराळ्या विषयांवर गप्पा मारीत असताना नचिकेतने तिच्या वडिलांचा विषय काढला .ते काय करीत असत? त्यांचा मृत्यू कशाने झाला? अशी सर्वसाधारण चौकशी तो करीत होता.त्याच विषयावर तिला नचिकेतजवळ बोलायचे होते.परंतु ही जागा तिला योग्य वाटत नव्हती .तिने दुसरा कोणतातरी विषय काढला .तिने हेतुपुरस्सर तिच्या वडिलांचा विषय टाळलेला नचिकेतच्या लक्षात आला. जरा वेळाने त्याने पुन्हा तोच विषय आडवळणाने काढला.ते नोकरी करीत होते की त्यांचा स्वतंत्र व्यवसाय होता असे त्याने विचारले होते .तिने पुन्हा तो विषय टाळला .

तिला त्या विषयावर बोलायचे नाही हे त्याने ओळखले . तुला काहीतरी महत्त्वाचे बोलायचे आहे असे तू म्हणालीस .विषयाला सुरुवात केव्हा करणार असे त्याने थोडे गंभीरपणे थोडे मिश्किलपणे विचारले .घरी गेल्यावर सांगेन एवढे बोलून ती  दुसऱ्या विषयाकडे वळली .त्याने पुन्हा तो विषय काढला नाही .तिला जेव्हा वाटेल तेव्हा ती आपणहून सांगेल याची त्याला मनोमन  खात्री होती.जेवण संपल्यावर दोघेही टॉवरवर घरी परतली .

आज उशिरा घरी येण्याची परवानगी तिने काढली होती .ते जेऊन येईपर्यंतच साडेदहा वाजले होते.दोघेही दहाव्या मजल्यावरील नचिकेतच्या फ्लॅटवर आली.

विषयाला सुरुवात कशी करावी ते तिला समजत नव्हते .ती विचारात पडली आहे.ती गोंधळून गेली आहे. हे नचिकेतच्या लक्षात आले. तिला तिचा वेळ घेऊ द्यावा म्हणून तो शांतपणे बसून राहिला .थोड्या वेळाने तिने बोलण्याला सुरुवात केली.

कसे सांगू ते मला कळत नाही . तुम्हाला माझ्याबद्दल काय वाटेल यामुळे मी तो विषय टाळत होते .तरीही तुम्हाला सर्व काही सांगून टाकावे मग जे काही होईल ते होईल असा विचार मी केला .परंतु प्रत्यक्ष वेळ येई तेव्हा मला काहीही सुचत नव्हते .आपली प्रस्तावना फारच लांबत आहे हे तिच्या लक्षात आले.ती पटकन बोलून गेली मी खोटारडी आहे .माझ्याकडे बहुतेक सर्व साड्या पांढऱ्याच आहेत .त्याचे कारणही तिने सांगितले . कुटुंबाची जबाबदारी,गरिबी , शाळेत केवळ पांढर्‍याशुभ्र  साड्या नेसण्याची गणवेश सक्ती ,या सर्वामुळे माझ्याजवळ दुसऱ्या  साड्या फारशा नाहीत.आर्थिक परिस्थितीमुळे मी ड्रेस साड्या खरेदी करू शकत नव्हते. काकूंकडे जागा मिळण्यासाठी  मला जी रक्कम भरावी लागली तीच कर्जाऊ घ्यावी लागली.काकूनी मला थोडी सवलत दिली आहे.

त्यादिवशी तुम्ही सहज शुभ्र साड्यांबद्दल विचारल्यावर त्या अनपेक्षित प्रश्नाने मी गोंधळून गेले.आणि मी तुम्हाला माझे वडील मृत्यू पावल्याचे आमच्याकडे शुभ्र वस्त्र  एक महिना परिधान करण्याचा परिपाठ असल्याचे खोटेच सांगितले.एकदा बोलून गेल्यावर मी कांहीच करू शकत नव्हते.तुमच्या डोळ्यांसमोर मी नीटनेटके  आकर्षक स्वरूपात असावे असे मला वाटत होते.स्पष्टच बोलायचे तर तुम्हाला पाहिल्याबरोबर तुमच्या प्रेमात मी पडले होते. गोंधळलेली मी वडील मृत्यू पावल्याचे बोलून गेले.

ज्यांच्यावर माझे अपरंपार प्रेम आहे ते माझे वडील मेल्याचे मी चटकन बोलून गेले .मला तुमच्या जवळ खोटे बोलल्याबद्दल  आणि वडिलांचा मृत्यू शब्दाने का होईना केल्याबद्दल अत्यंत वाईट वाटत आहे.

तुम्ही कदाचित माझा तिरस्कार करीत असाल .असत्य भाषण करणारी, वडिलांचा शब्दाने का होईना मृत्यू करणारी, वाईट मुलगी समजत असाल .तुम्ही जी शिक्षा कराल ती मला मान्य आहे.एवढे बोलून ती खाली मान घालून स्तब्ध बसून राहिली.

थोडा वेळ कुणीच काही बोलत नव्हते .नचिकेत काही बोलेल म्हणून सुनंदा वाट पाहात होती.ज्याअर्थी नचिकेत काही बोलत नाही त्याअर्थी आता सर्व काही संपले असे तिला वाटले.थोड्या वेळाने ती उठून उभी राहिली .बरे आहे मी येते असे म्हणून ती चालू लागली.सर्व काही बोलून टाकल्यामुळे तिचा चेहरा तणावरहित झाला होता.ती गेले काही आठवडे दडपणाखाली वावरत होती .आता तिला मोकळे मोकळे वाटत होते .

नचिकेतने तिला थांबविले. तू त्यावेळी मी विचारल्यानंतर गोंधळून गेली होतीस .माझ्या नजरेसमोर तुझी गरिबी उघडी पडू नये असे तुला वाटत होते.कोणत्याही परिस्थितीत तुला मला गमवायचे नव्हते.माझ्यावरील प्रथमदर्शनी प्रेमामुळे तू तसे वर्तन केले होतेस.तुझी त्यावेळची मन:स्थिती मी समजू शकतो.तुझे मन तुला खात होते.ही गोष्टच तुझा चांगुलपणा दाखवते.

तू आहेस तशीच मला आवडतेस.तुला शुभ्र साडी शोभून दिसते .

*मी तुझ्यासाठी एक रेशमी साडी आणली आहे.असे म्हणून त्याने टेबलावरील खोक्यातून एक उंची रेशमी पांढरी शुभ्र साडी बाहेर काढली .*

*ती साडी उलगडून तिच्या अंगावर टाकली.*

*तिला अलगद कवेत घेतले.*

*तीही डोळे पुसत पुसत एखाद्या लहान मुलीसारखी त्याच्या कुशीत शिरली .*

(समाप्त)

१५/१०/२०२०©प्रभाकर  पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel