कशासाठी ? पोटासाठी ?
देशासाठी ! देशासाठी !
भारताच्या पूजेसाठी
भारताच्या प्रीतीसाठी.
गंगा आणि गोदेसाठी
कृष्णा कोयनेच्यासाठी
उभा आहे सातपुडा
आणि सहयाद्रीच्यासाठी.
तुला व्हायचे प्रचंड
तन मनाने उदंड
बुद्धिमत्तेने प्रकांड
तुझ्या भारताच्यासाठी
भारताच्या भाग्यासाठी.
व्हावयाचे कीर्तिवंत
धनवंत, प्रज्ञावंत
व्हावयाचे उदारधी
रंजल्या गांजल्यांसाठी
भारताच्या शुभासाठी
भारताच्या शोभेसाठी.
तुझे बळ गरिबांसाठी
तुझे धन सर्वांसाठी
बुद्धि भारताच्यासाठी
श्रेय भारताच्यासाठी.
भारताचा मानदंड
बाळ आहे तुझ्यासाठी
कन्याकुमारी समोर
दोन्ही हाताला सागर
भय तुला कशासाठी
भोवताली जगजेठी
कशासाठी ? देशासाठी ?
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.