नमो मायभूमी, नमो पुण्यमाता
मनी हर्ष होई, तुझे गीत गाता ॥
तुझ्या कृपाछत्रे, आम्ही वाढलो गे
तुझ्या नभछाये, आम्ही खेळलो गे
तुझ्या अन्न-वायुवरी पोसलो गे
उधाणी हृद्लहरी, यशोगीत गाता ॥
उदरी तुझ्या गे बहु रत्नराशी
धरणे-सरिता ही नवी तीर्थकाशी
विपत्काल येता, तमा तूच नाशी
कंठातुनी कोटी, स्मरे पुण्यगाथा ॥
जडो सत्कर्मी, मना स्फूर्तिदात्री
महामानवांची जननी तू धात्री
’मानव्य पसरो’ सकळांत मैत्री
पुन्हा जन्म लाभो, याच भूमीत माते !
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.