दरीत वसले गाव चिमुकले

भवती सारे हिरवेगार

श्यामल काळे तसे रुपेरी

ढग माथ्यावर अपरंपार

मध्ये उजळता ऊन जरासे

लखलख कातळ काळेशार

तृणपुष्पांचे रंग ओलसर

झाडे उडवित बसलि तुषार

डोंगरातुनी उतरे खाली

शुभ्र दुधासम झरझर धार

पानांमधुनी रुणुझुणु वारा

सुरेल होऊन जाई दुपार !

परिघावरचे तटस्थ डोंगर

जणू गावाचे राखणदार

शांततेवरी वर्तुळ रेखित

पंख पसरुनि उडते घार.

प्रकाश येता गाव दिसतसे

लपते, निळसर पुन्हा धुक्यात

उघडमिटीचा खेळ मनोहर

सतत चालला असे मनात !

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel