पहा संपला तिमिर सर्व हा

मालवून टाका दिवा

उगवला, दिवस आज हा नवा !

जात्यावरती कुणी जनाई

दळते, गाते मंजुळ ओवी

सुरात भिजतो चिंब तिच्या हा

पहाटचा गारवा

उगवला, दिवस आज हा नवा !

हंबरती गोठयात वासरे

कुक्कूच कू चा रवही पसरे

किलबिल करुनी पक्ष्यांचाही

नभी उडाला थवा

उगवला, दिवस आज हा नवा !

अंगणात ही फुले विकसली

प्राजक्‍ताची उधळण झाली

वातावरणी पहा पसरला

गंधाचा शिरवा

उगवला, दिवस आज हा नवा !

सनई चौघडे मंगल झडती

मंदिरात चालली आरती

प्रसन्न पावन वेळ अशी ही

पर्वकाळ हा नवा

उगवला, दिवस आज हा नवा !

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel