सकाळी भगवान् सूर्यनारायण अंगणात येऊन उभे राहतात. त्यांना का गलिच्छ अंगणात उभे करावयाचे ? सूर्याच्या किरणांचे स्वच्छ अंगण स्वागत करील. किती सुरेख कल्पना व पवित्र भावना :
सकाळी उइून काम सडा-सारवण
दाराशी उभे राहती देव सूर्यनारायण ॥
दळण-कांडण, दुरून पाणी आणणे, मसाला कुटणे, सारी कामे ती करते. तिला कंटाळा नाही. आईच्या तालमीत ती तयार झालेली :
दळण सडण नित्य माझे ग खेळणं
माझ्या मायेनें वळण लावीयेलें ॥
सासरी कसे वागावे ते आईने शिकविलेले असते. आई गुरू :
मला शिकवीलें माय त्या माउलीनें
परक्याच्या साउलीनें जाऊं नये ॥
मी ग शिकलेली बयाबाईच्या शाळेला
काम आपुलें करावें सदां वेळेच्या वेळेला ॥
सार्याच ठिकाणी सासुरवास असतो असे नाही. काही सासवा आयांसारख्या असतात :
घराची घरस्थिती काय पाहशी परक्या
लेकी-सुना त्या सारख्या माझ्या घरी ॥
अशी प्रेमळ सासू सुनेचे लाड करते. बांगडया भरणारे कासार आले तर बांगडया भरविते, पटवेकरी आले तर सुनेचे बाजूबंद पटविते :
आले आले ते पटवेकरी पटवाया काय देऊं
बाजूबंद गोंडे लावूं सूनबाईच्या ॥
आले हो वैराळ बसूं घालावी घोंगडी
चूडा भर नागमोडी सूनबाई ॥
सासू सूनबाईला नटवते. सूनही सजते. परंतु कुणी म्हणते :
किती तूं नटशील एवढें नटून काय होतें
रूप सुंदर कुठें जातें उषाताई ॥
सूनबाईलाही ते समजते. मुख्य अलंकार म्हणजे शेवटी स्वत:चे सौभाग्य हे ती ओळखते :
सासूबाई तुम्हीं एक हो बरें केलें
कपाळीचें कुंकू रत्न माझ्या हातीं दिलें ॥
पतीला आनंद व्हावा म्हणून ती झटते. सारे दु:ख गिळून पतीसमोर हसते. पती सुखी असला म्हणजे पत्नीला सारे मिळाले :
सासूचा सासुरवास सारा मनांत गिळिते
कंथाशी हांसती उषाताई ॥
होवो माझें कांही नाहीं मला त्याचें दु:ख
माझ्या कुंकवाला मिळूं दे ग परी सुख ॥