माहेराला आसावलेली सासुरवाशीण शेजीला म्हणजे :
शेजारिणी बाई माझी वेणी ही घालावी
आईच्या हातांची आठवण मज द्यावी ॥
“आई केस तडतडू न देता हलक्या हाताने वेणी घाली. तशी तुम्ही घाला.” असे प्रेमार्थ भुकेलेली ती म्हणते. परंतु शेजी नेहमीच चांगली वागत्ये असे नाही :
शेजीच्या घरी गेल्यें शेजी बोलली रागानें
कोवळें मन माझे नेत्र भरले पाण्यानें ॥
गर्विष्ठ शेजीला ती म्हणते :
शेजारिणी बाई नको करूं गर्व फार
रोज ग बघत्यें दिव्याखाली अंध:कार ॥
केळीची पाने मऊ असतात. ती फाटत नाही. परंतु ती कठोर टरटरीत झाली की वार्याने फाटतात. शेजीबाई मृदू स्वभावाची रहा, ताठ नको होऊ:
शेजारिण बाई गर्वाने दाटली
पानें केळीचीं फाटली वारियानें ॥
शेजारच्या बायका कधी प्रेमाने भाजी वगैरे देतात. परंतु भांडण झाले म्हणजे ते सारे काढतात :
शेजीनें दिली भाजी दिली अंगणांत
काढी भांडणांत वारंवार ॥
परंतु नेहमी शेजीच चुकत्ये असे नाही. स्वत:चीही चूक असते. शेवटी भांडणे मिटतात. पुन्हा एक होतात :
तीळ घे गुळ घे विसर मागील भांडण
शेजी आता हं अंगण तुझे माझे ॥
शेजारिणी बाई एका दारी दोघी वागूं
माझी मैना तुझा राघू खेळतील ॥
आपली दोघींची मुले एकत्र खेळतील. प्रेमाने नांदू.
शेजीच्या ओव्यांहून मैत्रिणीसंबंधीच्या ओव्या अधिकच सुंदर आहेत. लहानपणाच्या मैत्रिणी एकदा लग्न झाले म्हणजे थोड्याच पुन्हा भेटणार ? पत्र कोण लिहिणार ? आधी त्या वेळेस लिहिता येत नसे, आणि लिहिता येत असले तरी लिहिण्याची चोरी :
आपण मैत्रीणी जाऊं ग वारा वाटे
जसे नशिबाचे फांटे फुटतील ॥
आपण मैत्रिणी पुन्हा भेटूं कधीं
आठवू मनामधी एकमेकी ॥
वारियाच्या संगे आपण पाठवूं निरोप
पोचतील आपोआप मैत्रिणीला ॥