हात भरले अंगठीनें कान भरले कुडक्यांनीं
शृंगार केला चुलत्यांनीं उषाताईला ३०१
मागील दारी आंबा पुढील दारी चिंच
माडी बांधा उंच दादाराया ३०२
दादाराया घर बांधी वैनीबाई ती बोलेना
तेथे उपाय चालेना काहीं केल्या ३०३
दादाराया घर बांधी आपुल्या हिंमती
वाडा शोभतो श्रीमंती थाटमाटें ३०४
दादाराया घर बांधी आपुल्या हिंमती
किती पारवे घुमती माडीवरी ३०५
माडीवरती माडी माडीला दहा दारें
बैसुनी घेती वारे वैनीबाई ३०६
माडीवरती माडी माडीला चंदनशिडी
पुतळी केस झाडी उषाताई ३०७
माडीवरती माडी माडीला तक्तपोशी
तबकी तुझी ठुशी उषाताई ३०८
मामाराया माडी बांधी सुतारांना दिला चहा
माडीचा बेत पहा वैनीबाई ३०९
हौशानें हौस केली जाई लावल्या जिन्यामध्यें
फुले पडती मेण्यामध्ये देवाजीच्या ३१०
हौशानें हौस केली फुले लाविली जिन्यांत
फुले पडती ताम्हनांत बाप्पाजींच्या ३११
हौशाने हौस केली फुले लाविली दारांत
फुले पडती हातांत उषाताईच्या ३१२
हजारांचा घोडा त्याला पन्नासाची झूल
वर बसणार जणूं गुलाबाचे फूल ३१३
हजाराचा घोडा त्याला विसांचा चाबूक
वर बसणार फुलावाणी नाजूक ३१४
धुणें धुवी रे परीटा लिंबे घे ताजी ताजी
धोतरजोडा अमदाबादी गोपूबाळाचा ३१५
धुणें धुवी रे परीटा धुण्याला काय तोटा
माझ्या ग अप्पारायांचा रुपयांनी भरला लोटा ३१६
धुणें धुवी रे परीटा लिंबू साबण लावी त्याला
नेसणारा भाऊ माझा अप्पाराया ३१७
धुणे धुवी रे परीटा इस्तरीची घडी कर
नेसणारा सावकार गोपूबाळ ३१८
कानीचें कुडूक हालती वार्याने
बोलते तोर्यानें उषाताई ३१९
कानीचे कुडूक हालती लुटू लुटू
बोलते चुटू चुटू उषाताई ३२०