बारीक दळणाच्या सभेमध्ये गेल्या गोष्टी
घराची रीत मोठी मायबाईच्या ४२१
बारीक दळणाची भाकरी चवघडी
आठवण घडीघडी मायबाईची ४२२
मामेयाच्या घरी भाची मी पाहुणी
समया लावुनी थाट केला ४२३
मामा की हो पुसे भाची केवढीशी झाली
चुनाडी रंगावीली कमळाबाईला ४२४
साखरेचा पुडा मुंग्यांनी फोडीला
तुझ्या मामाने धाडीला तान्हेबाळा ४२५
मोगर्या फुलांनी भरले देवघर
पूजीला रघुवीर बाप्पाजींनीं ४२६
गुलाबाची फुलें शंकर बाळाच्या ओंजळीं
त्याची तुला पुष्पांजली गणेराया ४२७
देवाचा देव्हारा फुलांनी भरला
मंत्रांनी पूजीला बाप्पाजींनी ४२८
काशींतले कागद आले लखोट्याने
वाचीले धाकट्याने चंदूबाळाने ४२९
काशींतले कागद आले उडाउडी
वाचीले घोड्यावरी मामारायांनी ४३०
मामेयाचे घरी भाचे कारभारी
शेले जरतारी पांघुरती ४३१
मामेयाचे घरीं भाचे कारकून
वस्त्रें घ्या पारखून मधूबाळाला ४३२
बहिणींचे बाळ मला म्हणे मावशीबाई
उचलून कडे घेई लीलाताई ४३३
शेजारिणीबाई तुझा शेजार चांगला
नाही मला आठवला मायबाप ४३४
शेजारिणीबाई एका दारीं दोघीं वागूं
माझी मैना तुझा राघू खेळतील ४३५
शेजारिणीबाई धन्य तुझ्या शेजारिणी
सय नाही माहेराची बारा वर्स ४३६
शेजारिणीबाई माझी वेणी हो घालावी
आईच्या हातांची आठवण मज द्यावी ४३७
शेजीच्या घरी शेजी बोलली रागानें
कोवळें मन माझें नेत्र भरले पाण्यानें ४३८
शेजीच्या घरी गेल्यें जाऊं नये जाणें झालें
तिच्या बोलण्याने मन माझें दुखवीलें ४३९
शेजीने दिली भाजी दिली अंगणांत
काढी भांडणांत वारंवार ४४०