शेजारिणीबाई गर्वानें दाटली
पानें केळींची फाटली वारीयानें ४४१
शेजारिणीबाई नकों करूं गर्व फार
रोज ग बघत्यें दिव्याखाली अंधकार ४४२
शेजारिणीबाई चल जाऊं नदीवर
धुण्याची धुऊं मोट करूं मोकळे अंतर ४४३
शेजारिणीबाई तुमचे झाले उपकार
कसें फेडूं सांगा मनीं ठेवावा आभार ४४४
शेजारिणीबाई घरीं का आज सुने
दूर ग देशा गेलें माझे सौभाग्याचे सोनें ४४५
शेजारिणीबाई आज कसली केली भाजी
आज कसली भाजी स्वारी गेली स्वारीमाजी ४४६
शेजीच्या घरी गेल्यें तिला आला होता ताठा
दु:खाचा माझा वांटा दैव माझें ४४७
शेजीच्या घरी गेल्यें शेजीला झाला गर्व
पराङमुख होती सर्व अभागिया ४४८
शेजारिणीबाई नको हो मला हंसू
येतील तुझ्या आंसू लोचनांना ४४९
शेजारिणीबाई गर्वाचें घर खाली
गोष्ट ही कधीं काळीं विसरूं नको ४५०
शेजीचे बोलणें सदा उफराटे
बोंचती माझ्या काटें काळजाला ४५१
शेजीचें बोलणे झोंबले हृदया
शेजीला दयामाया नाही ठावीं ४५२
शेजारिणीबाई मनीं अढीं धरूं नका
पुन्हां गोड होऊं एकमेकां देऊं सुखा ४५३
शेजारिणीबाई माझेंच चुकलें
आता धरिते पाऊले सोड राग ४५४
संक्रांतीचा तीळगुळ चला देऊं घेऊं
शेजी आतां हे अंगण तुझें माझें ४५६
तीळ घे गुळ घे आपण विसरूं मागचें
शेजी नवीन प्रीतीचें नातें जोडू ४५७
तीळ घे गुळ घे आतां विसर मागील
शेजी प्रेमाचें पाऊल दोघी टाकू ४५८
माझ्या अंगणांत शेजीचे पांच पुत्र
त्यांत तुझें मंगळसूत्र वैनीबाई ४५९
प्रेमाचा ओलावा पाहून जवळ गेली
तहान नाही हो भागली शेजीबाई ४६०