यमापासून योगिनी सावित्रीने पती परत आणिला, त्या सावित्रीचा महिमा किती गावा ? पतिप्रेमामुळे एक अबला यमाहून बळी झाली :

सावित्रीचा महिमा         अमर भूमंडळी
अबला झाली बळी             यमाहून

पातिव्रत्याच्या प्रभावाने प्रत्यक्ष काळही मनी दचकतो :

सतीच्या प्रभावे             काळहि मनी खचें
नांव घ्या सावित्रीचे             संसारात

अशा या सावित्रीचे नुसते नाव घेतले तरी अक्षय सौभाग्य लाभेल :

सावित्री सावित्री             जरी म्हणतील नारी
त्यांचे या संवसारी             वज्रचुडे

सावित्री आठवताच सीताही आठवते :

रामाची ग सीता         लक्ष्मणाची वयनी
दशरथाची पहिली             ज्येष्ठ सून

लग्नामध्ये राम पाच वर्षांचेच होते व सीता अडीचच वर्षांची होती असे म्हटले आहे. कारण सर्वत्र बालविवाह होत होते. अडीच वर्षांच्या सीतेने माळ कशी घातली, पाच वर्षांच्या रामाने धनुष्य कसे मोडले त्याची आपणाला का उठाठेव ?

दुष्ट कैकेयीने रामासारखा भ्रतार सीतेला भोगू दिला नाही. ती सारी वनात गेली. परंतु भरत ! त्याचे किती प्रेम ! राम वनात गेले म्हणून तो नंदिग्रामी वनस्थ व व्रतस्थ होऊन राहिला :

जटाधारी झाला             निजतो सुखे भुई
भरत जणूं होई                 वनवासी
धन्य रे भरता             धन्य रे तूं भाऊ
तुझी कीर्ति राहू             चिरंजीव

समृध्द असे राज्य तृणप्राय तो मानतो. भरताची ही भक्ती पाहून डोळे भरून येतात.

धन्य रे भरता             धन्य रे तुझें मन
तुण्या स्मरणें लोचन             भरून येती

भरताची अशी भक्ती, आणि तो लक्ष्मण ! तो राम जवळ नसेल तर राहूच शकत नव्हता, जगूच शकत नव्हता. राम म्हणजे त्याचे जीवन. राम व सीता वनात चालत असता लक्ष्मण पुढे चालत असे. तो दगडधोंडे, काटे दूर करत असे. किती सहृदय वर्णन आहे ते वाचा :

राम चाले वाटे             लक्ष्मण झाडी खडे
असे बंधू झाले थोडे             पृथ्वीवरी
राम चाले वाटे             लक्ष्मण झाडी कांटे
असे बंधु नाही कोठें             संसारात

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel