रानातील आंब्याच्या कैर्‍या खाव्या असे डोहाळे सुरू होतात. पुढे राम सीतेचा त्याग करितात. वनवासातील हे गरोदर सीतेचे वर्णन करुण असे आहे :

सीता वनवासी             दगडाची केली उशी
अंकुश बाळ कुशी             वाढतसे

दगडावर कशी आली तिला झोप ? पुढे सीता बाळंत होते. बाळबाळंतीण कोठल्या बाजेवर निजत होती ? :

सीता वनवासी             दगडाची केली बाज
अंकुश बाळा नीज             वनामध्यें

पुढे लवांकुश वाढतात. रामाबरोबर त्यांची लढाई होते. रामाचे बाण लवांकुशावर येत होते. जणू ते बाण म्हणजे कमरेला कडदोरा, हातातील कडीतोडे. रामाला का कठोर बाण मारवत नव्हते ? का ते बाण मुलांना फुलाप्रमाणे वाटत होते ? रामाने आपल्या मुलांना इतर बाळलेणे घातले नाही. जे घातले ते या बाणांचे :

बाणामागे बाण             बाण येती मागेंपुढें
रामाच्या बाणांचे             लवांकुशा कडीतोडे
बाणामागे बाण             बाण येती झराझरा
रामाच्या बाणाचा             लवांकुशा कडदोरा

असे हे थोडक्यात जणू ओव्यांत रामायणच आहे. रामायण म्हणजे मारुतीचा पराक्रम. मारुतिरायाच्या वर्णनाच्या ओव्या सुंदर आहेत :

मारुतीला प्रणाम करण्यापूर्वी असा पुत्र प्रसवणार्‍या मातेला आधी नमन केले पाहिजे :

आधी नमन करूं         अंजनीबाईला
मग मारुतिरायाला             तिच्या पुत्रा

कोणताही गाव घेतला तरी मारुतीचे देऊळ आहेच. पुष्कळ वेळा गावाबाहेर ते वेशीजवळ असते. तेथे मंडळी बसतात, उठतात. वाटेचे वाटसरू विसावा घेतात:

माझा ग दयाळु         वेशीच्या बाहेर उभा
मारुतिरायाचा                 शेंदरी लाल झगा

रामाचे वर्णन झाले आणि कृष्णाचे ? वर्णन करता करता कोणाची वाणी थकणार नाही ? यशोदामाईचे केवढे भाग्य !

दैवाची यशोदा             नेसली पिवळें
मांडीये सांवळे                 परब्रह्म

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel