रामाच्या नांवाने शिळा सिंधूंत तरती
आणि शिवाशंकराच्या विषवेदना थांबती १२१
रामाच्या नांवाने शिळा सागरीं तरती
संसारी त्याच्या नांवे जडमूढ उध्दरती १२२
राम चाले वाटे लक्षुमण झाडी वाळू
रामाचे बाण हळू लंकेवरी १२३
हस्ती झाले मस्त गगनी उडे राख
रामाचे बाण लाख लंकेवरी १२४
हस्ती झाले मस्त गगनीं उडे वाळू
रामाचे बाण हळू लंकेवरी १२५
हस्ती झाले मस्त गगनी उडती दगड
रामाचे बाण रगड लंकेवरी १२६
हस्ती झाले मस्त गगनी उडे रेती
रामाचे बाण येती लंकेवरी १२७
हस्ती झाले मस्त गगनीं उडे चुना
रामाचे बाण पुन्हा लंकेवरी १२८
हस्ती झाले मस्त गगनी उडे गोळा
रामाचे बाण सोळा लंकेवरी १२९
हस्ती झाले मस्त गगनी उडे सूप
रामाचे बाण खूप लंकेवरी १३०
हस्ती झाले मस्त आकाशी काळोख
रामाचे बाण लाख लंकेवरी १३१
हस्ती झाले मस्त गगनी अंधार
रामाची बाणधार लंकेवरी १३२
हस्ती झाले मस्त गगनी उडे माती
रामाचे बाण येती लंकेवरी १३३
इंद्रजीत मारी लक्ष्मण ब्रह्मचारी
रडते त्याची नारी सुलोचना १३४
बारा वर्ष राही निराहार ब्रह्मचारी
म्हणून सौमित्र रावणाच्या पुत्रा मारी १३५
मारिला इंद्रजित दिली दऊत लेखणी
लक्षुमणें घात केला भुजा दाखवी लिहूनी १३६
रामाचे हृदय कठिण वज्राचें
अग्नींत सीतेचे सत्त्व पाही १३७
रामाचे हृदय जणूं कठिण पाषाण
फूल आगींत घालून बघतसे १३८
पुष्पक विमानी रामाच्या जवळी
शोभली सांवळी सीताबाई १३९
शोभली जानकी रामरायाच्या मांडीवरी
सीतेच्या तोंडावरी प्रसन्नता १४०