अशा रीतीने स्वराज्य गेले. स्वराज्य का गेले याची कारणे स्त्रियांना माहीत होती. त्यांच्या मनावर या ऐतिहासिक घडामोडींचा परिणाम होत होता.

सर्वत्र अव्यवस्था माजली. पेंढारी लुटालुट करू लागले. इंग्रजांची तैनाती फौज सर्वत्र आल्यामुळे पूर्वीच्या सैन्याची जरुरी राहिली नाही. ते शिपाई पेंढारी बनले. कोकणातील हर्णेजवळच्या मुरूड गावी पेंढारी आले, त्यांच्या पुष्कळ ओव्या आहेत असे ऐकतो. मुरूडच्या देवीने पेंढार्‍यांचा पाठलाग केला. तिने आपल्या नाकातील मोती खडकाखाली लपवून ठेवले. नंतर ती लढायला गेली. पेंढार्‍यांचे गलबत फुटले. अशा कथा आहेत. मुरूडला जाऊन या ओव्या गोळा केल्या पाहिजेत. मला एक दोन ओव्या मिळाल्या. पेंढारी गुपचूप आले व मुरूड गावचे सोने लुटते झाले :

पेंढारी कीं आले             आले मोनें मोनें
मुरूड गांवचें सोने             लुटीयेलें

मुरूड गावचे त्या वेळचे श्रीमंत बागुल यांच्याकडची धनदौलत सारी लुटली गेली.

इतर लहानमोठे मराठे सरदार लढत होते. इंग्रजांनी हळूहळू सर्वांना जिंकले. त्यांचे किल्ले घेतले. चंदनवंदन, रायरी, अर्गजा वगैरे किल्ल्यांचे उल्लेख आहेत. कुरुंदवाडकरांचे हे किल्ले होते.

स्वराज्य अशा रीतीने गेले. पुण्याला इंग्रजांचा बावटा आला आणि बुधवारवाडा भर दोन प्रहरी जळाला:

जळाला बुधवारवाडा         बाराच्या ठोक्याला
साहेब लोकांला                 वर्दी गेली
जळाला बुधवारवाडा         उडालें कऊल
नेला पुण्याचा डऊल             इंग्रजांनी

आता पूर्वीचे भाग्य गेले. केवळ स्मृती राहिल्या. पुण्यात आता शनिवारवाडा पाहायचा नुसता. तेथें हत्ती चीत्कारत नाहीत, घोडे खिंकाळत नाहीत :

चला जाऊं पाहूं             पुण्यांतले वाडे
जेथें लाखों घोडे             नाचले ग

पुणे पूर्वी कसे होते ?

पुणें शहरांत             छप्पन्न सरदार
भरे ग दरबार                 पेशव्यांचा

परंतु ते सारे वैभव का गेले ? लोकांनी मोठमोठे वाडे बांधले, परंतु राज्यकारभारात ते वेडे ठरले :

पुणें शहरांत             मोठमोठे वाडे
लोक परी वेडे                 कारभारांत

पुणे शहरात सर्वत्र हौद व पुष्करिणी. पाण्याचा सुकाळ झाला. परंतु परस्पर प्रेमभाव नाही, सहकार्य नाही. मत्सर बळावले. राज्य गेले :

पुणे शहरांत             पाण्याचा सुकाळ
परी पुण्याचा दुष्काळ             चोहींकडे

आणि ही एक सिध्दांतस्वरूप ओवी ऐका :

पुणें झालें सुनें             गुणें झालें उणें
देवें नारायणें                 न्याय दिला

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel