रसपरिचय
हे शेवटचे प्रकरण. या प्रकरणात उरल्यासुरल्या ओव्या एकत्र दिल्या आहेत. एकाच विषयासंबंधीच्या ओव्या या प्रकरणात नाहीत. या प्रकरणात खिचडी आहे आणि खिचडी फार छान लागते नाही ? भाताला भाजीबिजीची जरुरी; परंतु खिचडीस निराळे तोंडी लावणे लागतच नाही.
या संकीर्ण प्रकरणात तुम्हाला मजामजा मिळेल. बोरीबंदरावर आगगाडी सुरू झाली. मुड्डम तेथे दिसली; साहेबांच्या बायका म्हणजे आमच्या बायकांना मोठे कुतूहल. बोरीबंदरावर सारे पदार्थ मड्डमीणबाईला या ओव्यांतून खायला दिले आहेत. इंग्रजांनी गाडी आणली. ही बिनबैलाची गाडी ढकलू लागला. एका महाराष्ट्र शाहिराने :
साहेबाचा पोरगा मोठा अकली रे
बिन बैलाने गाडी कशी ढकली
हे गाणे केलेले अनेकांना माहीत असेल. मागील सत्याग्रह-संग्रामात हे गाणे महाराष्ट्रभर पसरले होते; परंतु स्त्रियांनीही आपल्या ओव्यांत तोच भाव प्रकट केला आहे पाहा :
आगीनगाडी बिगिनगाडी गाडीला डबे डबे
बैलाविण चाले निघे रूळावरी
आणि ही गमतीची ओवी वाचा :
बोरीबंदरावर मड्डम खाते बिस्कुट
आगगाडीचें फिरलें मुस्कुट रूळावरी
दळणाच्या पुष्कळ ओव्या या प्रकरणात दिल्या आहेत. दळण व कांडण पूर्वी घरोघरी चाले. दळण तर चालेच चाले. दळणाचे श्रम ओव्या म्हणताना बायका विसरत. श्रमातून हे वाड्.मय निर्माण झाले. मुंबईला एखादा मोठा दगड उचलताना कामगार गाणे म्हणतात. या दळणाच्या ओव्या हृद्य आहेत. अनेक भावना त्यातून आहेत. दळण संपत यावे. सुपाच्या कोपर्यात आता चिमुटभर दाणे राहिले आहेत; श्रमणार्या त्या बायांना आनंद होतो. देव आठवतो :
सरले दळण राहीलें सुपाकोनी
विठठल रखुमाई गायीली रत्ने दोन्ही
महाराष्ट्राची विठोबा-रखुमाई ही आवडती दैवते.
नेहमी शुभ बोलावे. दळण सरले असे कधी म्हणू नये. दळण तर रोज उठून हवे, सासरी-माहेरी किती तरी मंडळी. भरलेली घरे. एक स्त्री सांगते :
सरलें दळण सरलें म्हणूं नये
सासर-माहेर नांदतें माझें सये
दळता दळता हात दुखू लागतात. कष्ट होतात. परंतु पोक्त बाई तरुण मुलीला म्हणते :
सरलें दळण दळून दमलीस
सीतेलाही होई संवसारी वनवास