फुलपाखरामागे फिरता
वारा सोबत करतो
गंध फुलांचा सवे आमुच्या
गीत नवीनच गातो.
चिवचिव करुनी खेळायला
चिमणीताई येते
अमुच्यासंगे जेवायाला
मनीमावशी बसते !
बोलबोलवी पिंजर्यातला
पोपट घालुनि शीळ
कधी पारवा आर्त होउनी
मना पाडितो पीळ.
आकाशातिल दिव्य चांदण्या
खुणावती आम्हांला
चंद्र आमुचा सखा, नेतसे
स्वप्नांच्या नगरीला.
दिवसा, रात्री घरात अमुच्या
मोत्या करी पहारा
सर्वच अमुचे सगेसोयरे
करिती प्रेमइशारा !
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.