एक दिवस अचानक
पोटामध्ये बी गेलं.
पाहता पाहता माझंच
बहारदार झाड झालं.
खोडासारखे पाय आणि
हातांनाही पानं आली.
डोळे जागीच मिटून गेले
कान दोन्ही हिरवे झाले.
एक कोकिळा खांदयावरती
कुहूऽऽ कुहूऽऽ करु लागली.
एक खार अंगावरती
सरसर फिरु लागली.
डोक्यावरती कावळ्यांनी
काटक्यांचा खोपा केला.
घर समजून एक पोपट
पानांमधे झोपी गेला.
हाका मारुन, हाका मारुन
मी आता थकलो आहे.
झाडासारखं गुपचूप
उभं राहायला शिकलो आहे.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.