गेल्या सहा महिन्यांमध्ये छाया नावाच्या एका बाईला श्याम वारंवार फोन करतो असे आढळून आले होते .छाया हिचा पत्ताही मिळाला होता.तिची एकदम जाऊन चौकशी करण्यापेक्षा अगोदर तिची सर्व माहिती बाहेरून काढावी असे ठरविण्यात आले .
संदेशने आपले दोन गुप्तचर त्या कामावर पाठविले .त्यांनी छायाच्या शेजारच्या फ्लॅटमध्ये चौकशी केली.त्याचप्रमाणे बँकेमध्येही चौकशी केली .बँकेतील सूत्रांमार्फत छायाचा पूर्वीचा पत्ताही मिळाला .त्या गावी जाऊनही चौकशी करण्यात आली .ही सर्व माहिती गोळा करण्यामध्ये दोन दिवस गेले .तोपर्यंत घन:श्यामचा काहीच पत्ता लागला नव्हता.चौकशीतून पुढील माहिती मिळाली .
छाया व माया या दोन जुळ्या बहिणी.त्या दिसायला अगदी एकसारख्या होत्या .त्या पूर्वी नगर येथे राहत असत.छाया लग्न झाल्यावर मुंबईला आली.तिचे सासर खूप श्रीमंत होते अक्षरश करोडोपती. मायाने लग्न केले नाही.ती नगरला एका शाळेत शिक्षिका म्हणून काम करीत होती .छाया कधी मुंबईला रहात असे तर कधी नगरला बहिणीजवळ रहात असे.मायाही सुटीमध्ये छाया जवळ मुंबईला येऊन रहात असे. वर्षभरापूर्वी ट्रेनने दोघी मुंबईला येत असताना त्या ट्रेनला खंडाळा घाटात अपघात झाला .त्या अपघातात माया मरण पावली .तिच्या प्रेताचा अपघातात चेंदामेंदा झाला होता. तिचे प्रेत ओळखण्यापलीकडे गेले होते. सुदैवाने थोड्याश्या मुक्या मारावर व जखमांवर छाया निभावली.तेव्हापासून छाया नगरला गेलेली नाही .ती येथेच मुंबईला रहाते.
ही सर्व माहिती ऐकून युवराज यांचे डोळे चमकले .ते म्हणाले इथे काहीसे सिनेमातील घटनांप्रमाणेच झालेले दिसते.ही छायाच आहे का याबद्दल मला दाट संशय आहे.दोघी जुळ्या बहिणी दिसायला एकसारख्या .एक मृत्यू पावली परंतु ती अपघातात ओळख पटविण्यापलीकडे गेली होती.मेली ती माया कशावरून ?प्रत्यक्षात छाया मेली आणि मायाने श्रीमंत होण्याची ही संधी सोडली नाही.तिने मीच छाया म्हणून सांगितले .छायाबद्दल तिला संपूर्ण माहिती होतीच .मुंबईला येऊन ती छाया म्हणून राहू लागली .
आता पुढील चौकशी करावी त्यावरून मी म्हणतो ते बरोबर आहे की नाही ते स्पष्ट होईल .
एक ~त्या अपघातानंतर जेव्हा छाया मुंबईला आली तेव्हा तिने आल्यावर थोड्याच काळात आपला सर्व नोकरवर्ग हळूहळू बदलून टाकला का?
दोन~ बँकेत पैसे काढताना किंवा इतर आर्थिक व्यवहारांमध्ये तिला काही अडचण आली का?तिने आपली सही बदलली का?अपघातात हाताला मार बसल्यामुळे पूर्वीसारखी नीट सही करता येत नाही असा बनाव करून तिने नवी सही केली असेल .दोघी बहिणी सारख्याच दिसत असल्यामुळे कुणाला काही संशयही आला नसेल .
जर मी म्हणतो त्याप्रमाणे झाले असेल तर त्याचा अर्थ उघड आहे.आपली खरी ओळख नोकरवर्गाला उघड होऊ नये म्हणून नोकरवर्गच बदलण्यात आला.
बँकेमध्ये हाताला बसलेला मार व त्यांमुळे बदललेली सही ही सहज पटण्यासारखी गोष्ट आहे .कोट्यावधी रुपये मालकीचा ग्राहक बँक हातातून जाऊ देणे शक्य नव्हते .
जर मी म्हणतो त्याप्रमाणे झाले असेल तर जुना नोकरवर्ग शोधून काढून त्यांची मुलाखत घेणे व त्यांना काही संशय आला होता का याची माहिती करून घेणे आवश्यक आहे .
संदेशकडे पाहून त्यांनी त्याला त्याने काय केले पाहिजे ते सुचविले.
संदेश स्वत:च बँकेमध्ये गेला .युवराजांचा अंदाज तंतोतंत खरा ठरला.अपघाताचे कारण देऊन सही बदलण्यात आली होती .
छायाकडील जुन्या नोकरांची मुलाखत संदेशने घेतली.त्यांनी छाया व माया या दोघांनाही बघितलेले असल्यामुळे त्यांना संशय आला होता.परंतु खात्रीलायक काही सांगता येत नव्हते
युवराजांचा अंदाज तंतोतंत खरा ठरला होता .आता घन:श्यामला छाया ही माया आहे हे कुठून कळले हे शोधणे शिल्लक राहीले होते.या केसमध्ये ते फार महत्त्वाचे नव्हते . कोणत्या ना कोणत्या मार्गाने घन:श्यामला ही माहिती कळली.या माहितीचा उपयोग करून आपल्याला भरपूर पैसे मिळविता येईल याचा अंदाज घन:श्यामला आला .वेळोवेळी फोन करून तो छाया कडून म्हणजेच पूर्वाश्रमीच्या मायाकडून पैसे मिळवीत असणार .गेल्या सहा महिन्यात त्याच्या झालेल्या आर्थिक उन्नतीचे दुसरे स्पष्टीकरण देता येणार नाही.सुरवातीला मायाने त्याच्या मागण्या पूर्ण केल्या.परंतु मागण्या फार वाढत चालल्यावर त्याचा बंदोबस्त करणे तिला भाग पडले.
ही सर्व साखळी बरोबर जुळत आहे .परंतु घन:श्यामचे काय झाले ते अजून कळत नाही .तो जिवंत किंवा मृत आतापर्यंत सापडणे जरुरीचे होते .
शेवटी युवराजानी शामरावांना बरोबर घेऊन छायाकडे जाण्याचे ठरविले.तिथेच छाया ही माया आहे की नाही याचा उलगडा होईल आणि त्याचप्रमाणे घन:श्यामचे काय झाले तेही कळेल असा त्यांचा अंदाज होता .
हे त्रिकूट अकस्मात छायाच्या फ्लॅटवर पोहोचले .विमा पॉलिसी विकण्याच्या बहाण्याने हे तेथे गेले होते.छायाने अत्यंत सभ्यपणे त्यांना मला अजून पॉलिसी घ्यायची नाही मी अगोदरच भरपूर मूल्याची पॉलिसी घेतलेली आहे असे सांगितले.बोलता बोलता त्यांनी छायाचा उल्लेख माया म्हणून केला .त्यावर ती चमकलेली दिसली.तिच्या चेहऱ्यावर थोडी अभ्रे दाटून आलेली दिसली .तिला यांचा संशय आला असे वाटले .तिने त्यांना निरोप देण्याचा प्रयत्न केला .
आता मात्र शामरावानी आपले खरे स्वरूप प्रगट केले.ती छाया नाही माया आहे वगैरे सर्व युवराजांची थेअरी तिला सांगितली .तिने नोकर बदलले. तिने बँकेतील सही बदलली. वगैरे सर्व गोष्टी आम्हाला माहीत आहेत म्हणून सांगितले.तू मुकाटय़ाने सर्व कबूल करतेस की तुला आम्ही अटक करू म्हणून विचारले.माया असताना छाया म्हणून वावरणे हा मोठा गुन्हा आहे हेही तिला स्पष्ट करण्यात अाले. त्याचप्रमाणे घन:श्याम तुझ्याकडून वारंवार पैसे घेत होता हेही आम्हाला माहित आहे असे सांगितले .घनश्याम सापडत नाही. तो बेपत्ता आहे. त्याचे तू काय केलेस म्हणून विचारले.त्याला मारण्याच्या आरोपाखाली आम्ही तुला अटक करू म्हणून दम दिला .
प्रथम तिने आपण निष्पाप असल्याचा अभिनय केला . परंतू शामरावांच्या व युवराजांच्या माऱ्यापुढे ती फारवेळ टिकू शकली नाही.तिने सर्वकाही कबूल केले.घन:श्यामला तिने गुंगीचे औषध देऊन एका खोलीत बंद करून ठेवले होते.त्याला तो जरासा शुद्धीवर आल्यावर ती पुन्हा गुंगीचे औषध देत असे.काही दिवसांनी तो सर्व विसरल्यावर किंवा वेडा झाल्यावर ती त्याला सोडून देणार होती.
घन:श्यामची अर्थातच सुटका झाली.सुनीताला तिचा घन:श्याम परत मिळाला.
छायाच्या नवऱ्याचे जवळचे नातेवाईक नसल्यामुळे मायाला छाया होणे विशेष जड गेले नाही.
प्रत्यक्षात छायाने आपले मृत्यूपत्र केले होते .सर्व इस्टेट मायाच्याच नावे ठेवलेली होती.मायाला छाया बनण्याचे काहीही कारण नव्हते.परंतु ही गोष्ट मायाला माहीत नव्हती .माया छाया होऊन आल्यावर कागदपत्र पाहताना तिला ही गोष्ट कळली.परंतु आता ते कळून काही उपयोग नव्हता.मी माया आहे छाया नाही असे उघड करणे धोक्याचे ठरले असते.तिने छाया म्हणूनच राहण्याचे ठरविले .एवढ्यात हा घन:श्याम तिला ब्लॅकमेल करू लागला.कोट्यवधी रुपयांच्या इस्टेटीची ती मालकिण होती .वेळोवेळी ती त्याला सढळ हाताने पैसे देत असे.परंतु दिवसेंदिवस त्याची हाव वाढतच चालली होती .
त्या दिवशी तो पैसे घेण्यासाठी आल्यावर तिने त्याला सरबतातून गुंगीचे औषध दिले.नंतर एका खोलीत बंद करून ठेवले .ड्रगच्या मार्यामुळे त्याचा स्मृतीभ्रंश झाल्यावर ती त्याला सोडून देणार होती.
तिने सर्व स्पष्ट कबुली दिली व शामरावानी तिच्याविरुद्ध काही कायदेशीर इलाज करू नये म्हणून त्यांना विनंती केली .
तिघांनी थोडावेळ आपसात चर्चा केली.शेवटी तिला सोडून देण्याचे ठरविले .जर छायाने मायाच्या नावे मृत्यूपत्र केलेले नसते, जर छायाला नवऱ्याकडून कुणी जवळचे नातेवाईक असते,जर मायाने घन:श्यामला ठार मारले असते,तर शामरावानी तिच्याविरुद्ध नक्कीच कडक कारवाई केली असती .तिचा गुन्हा कायदेशीरदृष्टय़ा तसा गंभीर होता .आपण दुसरीच व्यक्ती आहोत असा व्यवहारात आभास निर्माण करणे, त्याप्रमाणे वर्तणूक करणे,दुसऱ्या व्यक्तीच्या नावे आपणच ती व्यक्ती आहोत असे भासवून मोठाले आर्थिक व्यवहार करणे,आर्थिक किंवा अन्य लाभ उठविणे निश्चितच कायदेशीर गंभीर गुन्हा आहे .
परंतु या विशिष्ट केसमधील रचना पाहून तिघानीही मायाला माफ करण्याचे ठरविले.
घन:श्याम आजारी आहे असे सांगून त्याला सुनीताच्या ताब्यात दिले.तो रस्त्यावर भ्रमिष्टासारखा फिरताना आढळला एवढेच तिला सांगितले.तो पूर्ण बरा झाल्यावर त्याने पुन्हा ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करू नये असा बंदोबस्त केला .
त्याने बरा झाल्यावर त्याला ही माहिती कुठून कळली ते सांगितले असते परंतु आता ती गोष्ट काही महत्त्वाची नव्हती
या सर्व गोष्टी बेकायदेशीर होत्या हे खरे आहे.परंतु कायदा नेहमीच बरोबर असतो असे नाही .
मोठा अपघात झाल्यावर त्यात आपली बहिण मृत्यू पावल्यावर एकूणच त्या परिस्थितीमध्ये मायाला छाया व्हावेसे वाटले .हा गुन्हा जरूर आहे परंतु त्यामध्ये कुणाचेही नुकसान झाले नव्हते .तिला जर मृत्युपत्राची माहिती असती तर तिने हे पाऊल नक्कीच उचलले नसते .कोट्यावधी रुपयांची इस्टेट लांबच्या एखाद्या नातेवाईकाकडे जाण्यापेक्षा ती सख्ख्या बहिणीकडे जाण्यात काहीच गैर नव्हते. अर्थातच तशी वेळ आलीच नसती कारण छायाने मृत्यूपत्र मायाच्याच नावे केले होते.असा विचार त्या तिघांनी केला .आणि तिला माफ केले .
(समाप्त)
१६/७/२०१९©प्रभाकर पटवर्धन