(ही कथा काल्पनिक आहे कुठेही  साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा)

दहा वाजून पंधरा मिनिटे झाली होती .युवराजांचे ऑफिस नेहमीप्रमाणे सुरू झाले होते.आज कुठलीही केस नसल्यामुळे युवराज निवांत होते.अशा वेळी युवराज निरनिराळ्या  वर्तमानपत्रातील घात अपघात विषयक बातम्या किंवा कोर्ट केसीस वाचत.त्यातून त्यांना निरनिराळ्या कल्पना सुचत असत .त्याच प्रंमाणे कॉनन डायल अॅगथा ख्रिस्ती यांसारख्या रहस्यकथा लेखकांच्या कथाही ते वाचीत असत. 

विजया स्वागत कक्षात आपले नेहमीचे काम करीत होती .एवढ्यात एका चाळीशीच्या स्त्रीने ऑफिसमध्ये प्रवेश केला .ती अजूनही सुंदर व तरुण दिसत होती .ती हेल्थ कॉन्शस दिसत होती.ती बहुधा नियमितपणे जीममध्ये जात असावी.तिच्या वयाचा अंदाज करणे कठीण होते. ऐन विशी पंचवीशीत ती फारच देखणी दिसत असली पाहिजे.तिच्या चेहऱ्यावर चिंता काळजी राग दिसत होता .तिचे काहीतरी बिनसलेले असले पाहिजे हे सहज लक्षात येत होते.तिने आल्याआल्या युवराज आहेत का मला त्यांना भेटायचे आहे म्हणून सांगितले.

विजयाने तिला आपल्याला कोणत्या संदर्भात भेटायचे आहे असे विचारले.त्यावर तिने संभाव्य खुनाच्या संदर्भात एवढेच त्रोटक उत्तर दिले.विजयाने इंटरकॉमवर एक बाई आपला भेटू इच्छिते म्हणून सांगितले .युवराजांनी कोणत्या संदर्भात असे विचारता संभाव्य खुनाच्या संदर्भात याशिवाय त्या काही बोलत नाहीत असे सांगितले.युवराजानी आत पाठवून दे म्हणून सांगितले .

ती बाई आत येताच युवराजानी तिला पुढ्यातील खुर्चीवर बसण्याचा निर्देश केला.तिच्या चेहऱ्यावर चिंता काळजी राग सर्व छटा दिसत होत्या .युवराजांनी तिला बोला म्हणून सांगितले .तिचा ताण दूर करण्यासाठी चहापाणी पाठविण्यास विजयाला सांगितले .

तिने आपली हकिगत सांगण्यास सुरुवात केली .माझे नाव निर्मला .मी व माझे यजमान येथे मुंबईत राहतो.आमचे इथे फाइव्ह स्टार हॉटेल आहे.माझ्या सासूबाईंच्या नावावर त्यांच्या यजमानांनी दोन कोटी रुपये ठेवले होते. त्याशिवाय आम्ही राहतो तो अलिशान फ्लॅटही त्यांच्या नावावर आहे.आता सासूबाई नाहीत ही सर्व इस्टेट माझ्या पतीच्या नावे आहे .पंधरा वर्षांपूर्वी माझा निरंजनशी प्रेमविवाह झाला.यांच्या फॅमिलीबद्दल मला विशेष काही माहिती त्यावेळी नव्हती . निरंजनशी ओळख झाली तो मला आवडला आणि आम्ही लग्न केले.नंतर मला हळूहळू अनेक गोष्टी कळत गेल्या.माझ्या सासूबाई या विदर्भातील प्रसिद्ध पुढारी भगवंतराव यांच्या पत्नी .त्यांचा कायदेशीर विवाह झालेला नव्हता .मला या गोष्टींचा विशेष फरक पडत नाही .

विदर्भात अमरावतीजवळ माझ्या पतीच्या वडिलानी कित्येक एकर जमीन विकत घेतली होती.विदर्भात उद्योग वाढीच्या दृष्टीने शासन प्रयत्नशील होते आणि आहे .बहुराष्ट्रीय कंपन्यांनी तिथे उद्योग सुरु करावे म्हणून प्रयत्न चालले होते.आज ना उद्या एखादी बहुराष्ट्रीय कंपनी तिथे उद्योग सुरू करील व जमिनीला सोन्याचा भाव येईल अशी भगवंतरावांची कल्पना होती  .आणि तसेच झाले .परंतु हे दिवस पाहण्यासाठी भगवंतराव जिवंत नव्हते .त्यांना त्यांच्या लग्नाच्या पत्नीपासून दोन मुले वसंतराव व मोहनराव.हे दोघेही दोन निरनिराळ्या राजकीय पक्षात काम करीत असतात .आज ना उद्या ते आमदार व मंत्री होतील .त्यांच्या पाठीराख्यांचे विस्तृत जाळे आहे .काही पुढार्‍यांचे पाठीराखे कशा प्रकारचे असतात याची तुम्हाला कल्पना आहेच .

तर भगवंतरावानी कोणे एकेकाळी घेतलेल्या त्या जमिनीला आता सहा कोटी रुपये किंमत येत आहे .स्वाभाविक ती जमीन विकून येणारे पैसे वसंतराव व मोहनराव आपसात वाटून घेणार आहेत .ही बातमी माझ्या मिस्टरांना कळल्यावर आपल्यालाही त्या जमिनीत वाटा मिळाला पाहिजे असे त्यांना वाटले .त्यांचे त्यांच्या दोन्ही सावत्र भावांशी फोनवर बोलणे झाले.निरंजनने ते स्वतः  भगवंतरावांचे चिरंजीव आहेत आणि त्यांना त्या इस्टेटीत वाटा मिळाला पाहिजे वगैरे गोष्टी सांगितल्या .प्रथम त्या दोघांनी निरंजनला  ओळखण्यास इन्कार केला.त्यावर यांनी तुम्ही मला माझा वाटा  न देता व्यवहार करण्याचा प्रयत्न केला तर मी तुम्हाला कायदेशीर नोटीस देईन. व्यवहार होऊ देणार नाही.  मी कोर्टात जाईन म्हणून सांगितले . डीएनए टेस्टमध्ये मी भगवंतरावांचा  मुलगा आहे हे सिद्ध होईल.आणि तुम्हाला मला दोन कोटी रुपये द्यावे लागतील .हे सर्व ऐकल्यानंतर त्या दोघांनी यांना तुम्ही स्वतः इकडे या आपण तुमचा हिशेब सेटल करू असे सांगितले .कोर्टात जाऊन कितीतरी वेळ व पैसा खर्च  करण्यापेक्षा जरी एक दीड कोटी रुपये मिळाले तरी खूप झाले असे निरंजनच्या बोलण्यात आले .

आपल्याला देवाने भरपूर दिले आहे .तुमच्या वडिलांनी तुमच्यासाठीही पुष्कळ ठेवले आहे.सहज मिळत असेल तर आपला त्या जमिनीतील वाटा आपण घेतलाच पाहिजे.परंतु उगीचच जास्त धोका स्वीकारून तो घेण्यात मतलब नाही.अति लालच बरी नव्हे असेही मी निरंजनला  सांगण्याचा प्रयत्न केला.परंतु तो ऐकायला तयार नव्हता वाटेल ते करून माझा वाटा मिळवणारच असे त्याचे म्हणणे होते. 

चार दिवसांपूर्वी हे अमरावतीला त्यांच्या स्वतःच्या कारने गेले.एखाद्या वकिलामार्फत त्यांच्याशी बोलणे करून आपला मुद्दा त्यांना पटवून देऊ असे निरंजन म्हणत होता. उगीच कोर्टात जाऊन वेळ व पैसा खर्च करणे योग्य नाही.तोपर्यंत जमिनीला आलेले चांगले गिर्‍हाईकही निघून जाईल.त्यापेक्षा परस्पर संमतीने सेटलमेंट करणे जास्त योग्य होय.तसे झाल्यास मी जमिनीवरचा हक्क कायदेशीररित्या सोडून देईन.असे निरंजन म्हणत होता. त्याच उद्देशाने बोलणी करण्यासाठी तो अमरावतीला गेला आहे.

तू अमरावतीला जाऊ नकोस म्हणून मी त्याला सांगत होते .अापण एखाद्या वकिलामार्फत त्यांच्याशी बोलणी करू असे माझे म्हणणे होते.अमरावतीला त्यांच्याशी बोलणी करण्यासाठी जाणे धोक्याचे आहे असे माझे मत होते .परंतु ते मला काय करणार आहेत मी योग्य ती काळजी घेईल असे निरंजनचे म्हणणे होते.मी म्हटले त्याप्रमाणेच झाले आहे त्यांनी निरंजनला कुठेतरी गायब केले आहे .

निरंजन गेल्यावर त्याचा रोज रात्री नेमाने फोन येत होता .गेले दोन दिवस मात्र त्याचा फोन किंवा मेसेज काहीही नाही .मीही त्याला फोन करून पाहिला परंतु फोन स्वीच ऑफ येतो . निरंजन ज्या हॉटेलमध्ये उतरला त्या हॉटेललाही मी फोन करून विचारले तर त्यांनी अश्या नावाचा कुणीही मनुष्य आमच्याकडे उतरलेला नाही असे सांगितले . मी वसंतराव व मोहनराव दोघांनाही फोन करून निरंजन तिकडे आल्याचे कळविले .तो तुम्हाला भेटला का ?म्हणून त्यांना विचारले .तो कुठल्या हॉटेलमध्ये उतरला आहे तेही त्यांना सांगितले.त्यावर दोघांनीही आम्हाला अजून निरंजन भेटला नाही म्हणून सांगितले . या सर्वच गोष्टी मला संशयास्पद वाटतात.गेले दोन दिवस मी निरंजनच्या फोनची वाट पाहत आहे .मला काही तरी गडबड आहे असे वाटत आहे .  

पैशासाठी मनुष्य कोणत्या थराला जाईल ते सांगता येत नाही .दोन कोटी ही काही लहानसहान रक्कम नव्हे.एकदा स्वतः तिथे जाऊन निरंजनचा तपास करावा असे मला वाटत होते .परंतु विचार करता त्यात बरेच धोके आहेत असे मला आढळून आले .मी तुमचे नाव ऐकलेले आहे .तुमच्या केसेसही वाचलेल्या आहेत .तेव्हा या केसमध्ये  तुम्हाला वकीलपत्र देण्यासाठी मी येथे आले आहे .

वसंतराव व मोहनराव यांच्याकडून त्या जमिनीतील योग्य वाटा आम्हाला कायद्याप्रमाणे मिळेल का?त्याचप्रमाणे हा वाटा आम्हाला मिळवून देण्यासाठी जे जे करावे लागेल ते ते तुम्ही करावे अशी माझी तुम्हाला विनंती आहे .त्यासाठी कितीही पैसा खर्च करण्याला मी तयार आहे .

त्याहूनही महत्त्वाची गोष्ट म्हणजे निरंजन कुठे आहेत त्यांचा तपास लावणे व कुठल्या संकटात सापडले असतील तर त्यांची सुटका करणे हे जास्त महत्त्वाचे काम तुम्हीच करू शकाल असा माझा विश्वास आहे . तुम्ही मागाल ती फी देण्यासाठी मी तयार आहे.

युवराजानी सर्व हकिगत ऐकल्यावर निर्मलाला थोडक्यात पुढील प्रमाणे सांगितले .

निरंजन हा भगवंतरावांचा अनौरस पुत्र आहे .तो त्यांचा पुत्र आहे हे जीवशास्त्रीयदृष्ट्या सिद्ध करणे शक्य आहे .कायद्याप्रमाणे त्यालाही इस्टेटीत वाटा मिळाला पाहिजे .हा निरंजनचा व तुमचा मुद्दा मला मान्य आहे.केस केवळ कोर्टात लढायची नसून तिला वेगळा कोन आहे .निरंजनला काहीतरी धोका झाला असेल असे तुम्हाला वाटते .त्याला शोधून काढणे हेही महत्त्वाचे काम आहे.निरंजनचा तपास व इस्टेटीतील योग्य वाटा अशी दोन्ही कामे मला करायची आहेत.ठीक आहे मला आव्हान असणारी कामे आवडतात. या तुमच्या केसमध्ये निश्चित आव्हान आहे 

युवराजांनी विजयाला हाक मारली व कायदेशीर वकीलपत्र तयार करण्यास सांगितले.निर्मलाने एक कोरा चेक युवराजांना दिला .त्यावर योग्य ती रक्कम तुम्ही भरा म्हणून सांगितले. त्यावर एक रक्कम टाकून ती निर्मलाला दाखवून अॅडव्हान्स म्हणून तिला पावती देण्यास विजयाला सांगितले  

निर्मलाकडून त्यांनी अमरावतीच्या  हॉटेलचे नाव,फोन नंबर, त्याचप्रमाणे वसंतराव व मोहनराव यांचा पत्ता व  नंबर घेतले.जी जमीन बहुराष्ट्रीय कंपनी विकत घेणार होती त्यासंबंधी जर काही कागदपत्र असतील तर त्यांच्या प्रतीही देण्यास सांगितले .  निर्मलाला त्यांनी जशी प्रगती होईल त्याप्रमाणे तुम्हाला वेळोवेळी कळवीत जाऊ म्हणून सांगितले .  

निर्मला गेल्यावर त्यांनी संदेशला बोलवून घेतले .सर्व केस व्यवस्थित समजून सांगितली .अमरावतीला जाऊन प्रथम निरंजनचा तपास करायचा आहे .त्याच्या जिवाला धोका संभवतो .पैशासाठी मंडळी काय करतील ते सांगता येत नाही .बहुधा  अमरावतीला त्याच्या जीवाला धोका पोचणार नाही . परंतु निश्चित काही सांगणे मोठे कठीण आहे . त्याच्या जिवाला काही धोका पोहोचल्यास  प्रथम संशय वसंतराव व मोहनराव यांच्यावर जाईल .याचा अर्थ त्यांच्या जिवाला धोका नाही असे नाही परंतु तो ते येथे आल्यावर संभवेल. असा माझा एक अंदाज आहे .म्हणजे अमरावतीकरांवर लगेच संशय जाणार नाही .

तुला ज्याप्रमाणे निरंजनचा तपास करायचा आहे,त्यांच्या जिवाला काही धोका पोचला नाही ना हेही पाहायचे आहे ,आणि निरंजनच्या जिवाला तिथे किंवा इथे कुठेही धोका पोचणार नाही याची काळजी घ्यायची आहे ,त्याचप्रमाणे  जमिनीबद्दलही माहिती गोळा करायची आहे .तसेच वसंतराव व मोहनराव यांचे त्यांच्या पक्षातील स्थान, त्यांचा स्वभाव ,ते कोणत्या थरापर्यंत जाऊ शकतील त्याचा अंदाज ,त्यांच्या सभोवतालील मंडळी, त्यांना पाठिंबा देणारे लोक,यांचीही माहिती गोळा करावयाची आहे .

हे सर्व काम शक्य तितक्या  लवकर झाले पाहिजे. नेहमीप्रमाणे एक एक मिनिट महत्त्वाचे आहे हे विसरू नकोस .त्यासाठी वाटेल तेवढी मंडळी कामाला लाव.पैशाकडे पाहू नकोस. आपल्याला निरंजनचा जीव जास्त महत्त्वाचा आहे .त्या येणार्‍या  पैशातील योग्य वाटाही त्याला मिळाला पाहिजे.अमरावतीकर जमीन विकत घेणाऱ्या पार्टीला अंधारात ठेवून व्यवहार करण्याचा संभव आहे. तरी तसा व्यवहार होणार नाही हेही पाहिले पाहिजे.त्यासाठी निरंजनने अजूनपर्यंत दिली नसल्यास एक कायदेशीर नोटीस अमरावतीकरांना दिली पाहिजे .

नेहमीप्रमाणे वेळोवेळी मला फोन करीत जा आणि तिकडील हकीगत कळवीत राहा.असे सांगून त्याला निरोप दिला .

संदेश जाता जाता म्हणाला मी आजच माझ्या टीमसह अमरावतीला जात आहे. तेथे गेल्यावर तुम्हाला कळवितो. असे म्हणून त्याने युवराजांचा निरोप घेतला .

(क्रमशः)

१७/७/२०१९©प्रभाकर  पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel