(ही कथा काल्पनिक आहे साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा )
तरीही तिला त्याचे विशेष काही वाटत नव्हते .पाचवीत गेल्यावर मात्र बाबा नको तिथे आपल्याला हात लावतात असे तिच्या लक्षात येऊ लागले.
बाबा कुशीत घेऊ लागले कुरवाळू लागले कि ती अंग चोरत असे.काही ना काही निमित्त काढून तिच्या मैत्रिणीकडे जाऊन अभ्यास करीत असे .
परंतु असे बाबांपासून किती वेळ दूर राहणार ?शेवटी तिला घरी येणे राहणे भागच होते .आई दिवसभर घराबाहेर .वडिलांची रात्रपाळी असली की वडील घरातच .धाकटा भाऊ बाहेर खेळात दंग .रविवारी ,सुट्टीच्या दिवशी, शाळेतून आल्यावर, ती वडिलांच्या तडाख्यात सापडे.तिने कितीही टाळण्याचा प्रयत्न केला तरी तिला वडिलांना टाळता येत नसे.
त्यांच्या चाळ्यांना मुकाटय़ाने तोंड द्यावे लागे.केव्हा धाकाने केव्हा प्रेमाने केव्हा जबरदस्तीने वडील त्यांचे चाळे चालूच ठेवत. तिला या गोष्टींचा फार त्रास होऊ लागला .त्रास मानसिक तसेच शारीरिकही होता .ती हळूहळू वयात येऊ लागली होती.झोपडपट्टीमध्ये, लहान जागेमध्ये, मुलांना समज लवकर येते.लहान जागेमध्ये लहान मुलांना नको त्या गोष्टी लहान वयात लक्षात येतात.
मालतीने तिला होणारा त्रास तिच्या बाबांचे तिला कुशीत घेणे मुके घेणे कुरवाळणे वगैरे गोष्टी आईजवळ सविस्तर सांगितल्या . परंतु आई यातील काही ऐकून घ्यायला तयार नव्हती .बाबा ते प्रेमाने करतात .त्यात गैर काय आहे .त्यांचे तुझ्यावर फार प्रेम आहे .त्यांना मुलीची आवड होती .तुझ्या जन्माच्या वेळी त्यांना खूप आनंद झाला होता .इत्यादी हकीगती तिची आई सांगत बसे .
त्यांचा स्पर्श नको त्या जागी वारंवार होतो तो स्पर्श मुद्दाम होतो ते तिच्या आईला पटतच नसे.उलट मुलगी बाबांच्या प्रेमाचा गैर वाईट अर्थ काढते असे तिला वाटत होते.शेवटी मालतीने घरातून पळून जाण्याचे ठरविले .घरातून काही कपडे व काही पैसे तिने हळूहळू एका बोचक्यात बांधून ठेविले .योग्य संधी पाहून ती घरातून निघाली व स्टेशनवर आली .नंतर गाडीत बसून ती दादर स्टेशनवर उतरली.माणसांची एवढी गर्दी बघून ती गांगरून गेली .कुठे जावे काय करावे तिला काहीच कळत नव्हते .परत घरी जायला तिचे मन घेत नव्हते.ती अंगाची जुडी करून बाकावर बसलेली असताना टवाळ पोरांचे टोळके तेथे आले.त्यांचे बोलणे ऐकून,नंतर शेजारी तो मुलगा येऊन बसल्यावर ती पूर्ण घाबरून गेली होती.ती कदाचित स्टेशनमधून पळून बाहेर आली असती .आणि या माणसांच्या जंगलात आणखीच संकटात सापडली असती .एखादवेळ पुन्हा गाडीत बसून कुठे गेली असती माहीत नाही.एखाद वेळी नेमकी तिच्या घरीही गेली असती .परंतु तिच्या दैवात काही निराळेच लिहिलेले होते.
सुदैवाने शामराव तिथे पोहोचले .त्या भेदरलेल्या मुलीचा त्यांना अंदाज आला.आणि आता ती येथे आहे .कोणत्याही परिस्थितीत ती आपल्या घरी जायला तयार नाही .आपणही तिला बळाने घरी पोहोचविले तरी ती कदाचित पुन्हा पळून जाईल .आपण तिला तिच्या घरी पोचवावे असे मला वाटत नाही .कायदेशीररित्या योग्य प्रक्रिया करून तिची कोणत्या तरी स्त्रियांच्या आश्रमामध्ये व्यवस्था करावी असे मला वाटते .तिला पुढे खूप शिकण्याची इच्छा आहे .तिची अभ्यासात ती सांगते त्यावरून प्रगतीही चांगली आहे .आता तुम्ही काय करायचे ते ठरवा असे म्हणून विजया बोलण्याची थांबली .
प्रत्यक्षात मालती गाढ झोपली नव्हती.विजया बोलत असताना ती आतून ऐकत होती.तिला आता हे लोक आपले काय करणार याबद्दल चिंता होती .विजयाच्या बोलण्यावरून तिला ही मंडळी सज्जन आहेत ते काही तरी चांगला आपल्या हिताचा निर्णय घेतील हे लक्षात आले .आणि ती पुन्हा आपल्या जागी जाऊन गाढ झोपली . घरातून पळाल्यापासूनच्या सर्व प्रसंगांनी ती खूप थकली होती .
दुसर्या दिवशी युवराजांनी तिची व्यवस्था वनिता मुक्ती आश्रमामध्ये केली.पुण्यातील पोलिसांमार्फत तिच्या आई वडिलांना कळवून सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली. पोलिसी हिसक्यापुढे तिच्या आई वडिलांचे काहीही चालले नाही .तिचे शिक्षण पुढे चालू ठेवले.तिच्या शिक्षणाचा सर्व खर्च युवराज करत होते .युवराजांच्या घराच्या पायऱ्या चढत असताना तिला या सर्व गोष्टींची आठवण होत होती .
युवराजांच्या घरी शामराव आलेले होते.विजयाही ऑफिसमध्ये होतीच.तिने प्रत्येकाच्या पायाला हात लावून नमस्कार करीत दोन दोन पेढे सर्वांच्या हातावर ठेवले.पेढ्यांची पुडी टीपॉयवर ठेवली.मालती पहिल्या शंभरमध्ये आली. यशस्वीपणे दहावी उत्तीर्ण झाली.म्हणून युवराजानी तिला आज आपल्या घरी पार्टी ठेवली होती .वनिता आधार आश्रमामध्येही सर्वांना गोडासहित जेवण देण्याची व्यवस्था केली होती .
शामरावांनी तिला पुढे काय करण्याची इच्छा आहे असे विचारले.त्यावर तिने मला तुमच्यासारखे इन्स्पेक्टर व्हायचे आहे असे सांगितले .शामरावांनी त्यावर तुला प्रथम पदवी घ्यावी लागेल. त्यानंतर तुझी निवड झाली पाहिजे .मग पीटीसी मध्ये ट्रेनिंग घ्यावे लागेल .इत्यादी गोष्टी सांगितल्या .तिची त्या सर्व गोष्टींना तयारी होती .
*तूर्त ती अकरावीच्या वर्गात आहे .तिचे होसले तर बुलंद आहेत.*
*युवराज विजया व शामराव तिच्या पाठीमागे पहाडासारखे उभे आहेत .*
*तिची इच्छापूर्ती होण्यामध्ये काहीही अडचण दिसत नाही .*
* जर त्या दिवशी शामराव नेमके त्या वेळी स्टेशनमध्ये गेले नसते, त्यांना ती दिसली नसती,तर तिच्या पुढे भविष्यात काय वाढून ठेवले असते ते देवालाच माहीत .*
*माणसांचे जंगल लांडगे व कोल्हे यांनी भरलेले आहे .*
*क्वचितच त्यात वाघ सिंहही असतात.*
*कुणाच्या वाट्याला काय येईल ते सांगता येत नाही .*
*सर्वच मुली मालतीसारख्या सुदैवी नसतात*
(समाप्त)
२/७/२०१९©प्रभाकर पटवर्धन