तुझ्या गळा, माझ्या गळा

गुंफू मोत्यांच्या माळा

ताई, आणखि कोणाला ?

चल रे दादा चहाटळा !

तुज कंठी, मज अंगठी !

आणखि गोफ कोणाला ?

वेड लागले दादाला !

मला कुणाचे ? ताईला !

तुज पगडी, मज चिरडी !

आणखि शेला कोणाला ?

दादा, सांगू बाबांला ?

सांग तिकडच्या स्वारीला !

खुसू खुसू, गालि हसू

वरवर अपुले रुसू रुसू

चल निघ, येथे नको बसू

घर तर माझे तसू तसू.

कशी कशी, आज अशी

गंमत ताईची खाशी !

अता कट्टी फू दादाशी

तर मग गट्टी कोणाशी ?

गीत - भा. रा. तांबे

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel