एक होता राजा आणि एक होती राणी
एक होता विदूषक-त्यांचीच ही कहाणी
विदूषक होता जाडजूड लठ्ठ,
होता फार चतुर, दिसायला मठ्ठ
विदूषक होता तसा फार विद्वान
राजा आणि राणीचाही होता जीवप्राण
एके दिनी जाऊनिया बसे गादीवरती
राजाराणी दरबारात प्रवेश करिती
विनवतो राजा आणि विनवते राणी
विदूषक उठेना तो आपुल्याच स्थानी
उद्धटता पाहून ही संतापला राजा
शिपायांना बोलवून त्याने केली सजा
’विदूषक झाला आहे फार हा उदंड
उदया पहाटेच्या पूर्वी दयावा मृत्युदंड’
सजा ऐकुनिया झाली राणी ती सचिंत
विदूषक होता तिचा बंधुभावे मित्र.
कसेही करुन मी वाचवीन याला
यास एक संधी मात्र हवी दयावयाला
राणी राजाला म्हणाली, "मृत्युदंड दयावा
याला पुसावे परंतु मृत्यु कशाने असावा ?"
राजा म्हणे "ठीक आहे, विदूषका बोल
म्रृत्यु तुला कसा हवा-फाशी किंवा शूल ?
तुला हवा शिरच्छेद ? विष ? कडेलोट ?
झोपशील भिंतीमध्ये किंवा कडेकोट ?
मानियला आहे माझ्या राणीचा मी बोल
बोल विदूषका, बोल-चातुर्याला मोल !"
विदूषक म्हणे, "राजा मृत्यु तू असा दे
अतिवृद्ध झाल्यामुळे-ईश्वरी प्रसादे..."
ऐकुनिया उत्तर ते राणी आनंदली
राजाही हसला आणि शिक्षाही संपली.