कावळ्यांची शाळा
रंग त्यांचा काळा
दंगा करत पहात होती
करुन तिरका डोळा.
इतक्यात तिथे आले
एक चिमणीचे पिल्लू
कावळ्यांची पोरं ओरडली
चालू लाग रे टिल्लू.
पिल्लू घाबरुन गेलं
थरथरत उभं राहिलं.
कावळी होती बाई
माया तिची दूध सायी.
कावळी म्हणे, ’चूप’
हाताची घाला घडी
वाचू लागा घडाघडा
नाहीतर, छडीवर बसेल छडी.
कावळी पिल्लाजवळ आली
पिल्लाला घेई पंखाखाली
माझी पोरं वांड भारी
तू आपला जाई घरी
पिल्लाला घेऊन पंखाखाली
कावळी झाडाजवळ आली.
समोर चिमणा-चिमणी पाहून
पिल्लू आलं पंखाखालून
पिल्लू म्हणे आईला
घरी नेऊ कावळीला.
चिमणीनं उडवलं नाक
चिमण्याचा भडकला ताप
आपण जातीने एवढे मोठे
कावळीचे कूळ किती छोटे
करुन असले चाळे
तोंडाला लावतोस काळे.
पिल्लू झालं व्यथित
काय ही जगाची रीत ?
माया करते कावळी
तिची शोधायची का जातकुळी ?
कसले थोर, कसले नीच
अंतर्यामी एकच बीज.
कावळी आई कावळी आई
दुःखी नको होऊ
मी होईन मोठ्ठा
मग आपण मिळून राहू.