धाड् धाड् खाड् खाड्

चाले माझी रेलगाडी

झपाटयाने मागे जाती

रानेवने खेडीपाडी ॥

वेग आता मंदावला

आला डोंगराचा घाट

शीळ घुमे पहाडात

शिरे बोगदयात वाट ॥

काळोख हा चहूकडे

नका कोणी भिऊ पण

गाडी धावे धिटाईने

शांत रहा सारेजण ॥

सरे बोगदयाची वाट

गाडी उजेडात येई

दिसे दर्‍यांतील पुन्हा

जंगलाची हिरवाई ॥

धपाधपा चाले गाडी

रेलतळ आता आला

सिग्नलाचा लाल हात

हवे इथे थांबायाला ॥

याच गावी जायचे ना ?

गाडी लागे फलाटास

झाला नाही कोणास ना

प्रवासाचा काही त्रास ॥

सावकाश उतरावे

नका करु घाई फार

पुन्हा भेटू केव्हा तरी

नमस्कार नमस्कार ॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel