(ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे .प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा)

विटीदांडूचा खेळ जोरात चालला होता .अजय व संजय दोघे भाऊ खेळत होते . त्यांनी शेजारच्या मुलांना खेळायला बोलाविले होते .परंतु आता दुपारच्या उन्हात खेळण्यासाठी  कुणीच आले नव्हते. खेळण्याची कल्पना संजयने काढली होती .यावेळी आणखी कुणी खेळायला येणार नाही अशा कल्पनेनेच त्याने बहुधा आता खेळायला जाऊ या असे म्हटले असावे .संजय तसा कावेबाज होता. अजय मोठा होता तर संजय लहान होता .दोघांच्या वयात फक्त दोन वर्षांचे अंतर होते .संजयने विटी कोलविली.ती अजयच्या डोळ्याला जोरात लागली.त्याचा डोळा कदाचित फुटला असता.परंतु सुदैवाने ती विटी डोळ्याच्या किंचित  वर भिवयीला लागली.  अजयचा डोळा फुटता फुटता वाचला .अजय बेसावध असताना संजयने मुद्दाम जोरात विटी मारली  असा आरोप करीत अजय रडत रडत घरी आला .तो पुन्हा पुन्हा संजयनेच विटी मुद्दाम मारली असे कळवळून सांगत होता.त्याची आई काही ऐकून घ्यायला तयारच नव्हती.  संजय असे करणार नाही असे आईचे ठाम मत होते .तिचा एकच धोशा होता. संजय असे करणारच नाही. तो असे कसे काय करू शकेल?  दुसऱ्या कुणीतरी विटी जोरात मारली असेल आणि हा मात्र बिचाऱ्या संजयचे नाव घेतो असे दोघांनाही वाटत होते . 

हल्ली कोण जाणे अजय व संजय यांच्यात सारखी भांडणे होत असत.मुले मुले भांडत असतात .आता भांडतात नंतर लगेच एकत्र येतात.त्यांच्याकडे विशेष लक्ष द्यायचे नसते . हे जरी खरे असले तरी अजयच्या संजयबद्दलच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढू लागल्या होत्या . त्याच्या तक्रारीचे स्वरूप गंभीर होते.त्यांची नुसती भांडणे नव्हती .संजयच्या मनात अजयला गंभीर दुखापत व्हावी .तो लंगडा लुळा व्हावा.अजय मेला तर फारच उत्तम असे काहीतरी असावे असे अजयच्या तक्रारी ऐकून वाटत होते .कां कोण जाणे पण संजय अजयच्या जिवावर उठला होता. 

संजयबद्दल अजयने तक्रार केली की हल्ली आईच्या डोळ्यात लगेच पाणी उभे रहात असे .आईच्या डोळ्यात पाणी आले की अजय कावराबावरा होत असे . अजयचे आईवर खूप प्रेम होते .संजयची तक्रार करायची नाही असे दर वेळी अजय म्हणत असे.पूर्वी संजय एवढा त्रास देत नसे  .हल्ली संजयचे त्रास देण्याचे प्रमाण वाढले होते .

संजयबद्दल तक्रार केली की आई वडिलांना काळजी वाटे.संजय असा का वागतो याबद्दल काळजी वाटण्याऐवजी त्यांना अजयबद्दल काळजी वाटे .अजयला डॉक्टरांकडे नेले पाहिजे अशी दोघांमध्ये चर्चा होत असे .एखादा चांगला मनोविकारतज्ञ ते शोधत होते.त्याच्या उपाययोजनेने अजयचे हे तक्रार करणे थांबेल असे त्यांचे मत होते.संजय  विचित्र वागतो, अजयच्या तक्रारीवरून तो खुनशी वाटतो, त्याबद्दल त्यांना काळजी वाटताना दिसत नव्हती .

संजय त्रास देइलच कसा असे दोघे म्हणत असत .अजयने तक्रार केली की दोघांनाही अजयबद्दलच काळजी वाटत असे.संजयचे नाव निघाले की आईच्या डोळ्यात पाणी उभे राही.

दोन दिवसांनंतरचीच गोष्ट अजय तलावाजवळ  उभा होता .अजयला पोहता येत नव्हते.तो काठावर उभा राहून पोहणाऱ्या मुलांकडे पाहत होता.तलावाच्या पलीकडच्या  काठाजवळ दोन मुले पोहत होती .संजय हळूच पाठीमागून आला .त्याने अजयला धक्का देत पाण्यात ढकलून दिले .अजयला पोहता येत नाही हे संजयला पक्के माहित होते .तरीही त्याने त्याला धक्का देवून पाण्यात लोटले होते.संजयचा सरळसरळ हेतू अजय मरावा हा होता.अजय पाण्यात गटांगळ्या खावू लागला.संजय पटकन पळून गेला . सुदैवाने पोहणाऱ्या मुलांचे लक्ष तिकडे गेले .त्यांनी अजयला वाचविले.अन्यथा अजय बुडाला असता .अजय मेला नाही याचे संजयला निश्चितच वाईट वाटले . संजयने ढकलल्याबद्दलची तक्रार अजयने आईबाबांकडे केली नाही .तक्रार करून काही उपयोग नाही हे त्यांच्या लक्षात आले होते .आई बाबा आपल्यावर अविश्वास दाखवणार हे त्याला माहीत होते .*~संजय असे करूच शकत नाही यावर ते ठाम होते~* 

आणखी चार दिवसांनंतरची गोष्ट.अजयला कैऱ्या खूप आवडत असत.तिखट मीठ लावून कैऱ्या खाण्यात त्याला आनंद मिळत असे . आजारी पडशील, ताप खोकला येईल, असे कितीही आईने सांगितले तरी तो संधी मिळाली की  कैऱ्या खाण्याचे सोडत नसे.अजयला झाडावर कैर्‍यांचे घड लटकताना दिसले. त्याच्या तोंडाला पाणी सुटले.अगोदर दगड मारून कैऱ्या पाडण्याचा त्याने प्रयत्न केला.कैऱ्या खूप उंचीवर असल्यामुळे दगड तिथपर्यंत पोचत नव्हते. आई रागवेल याचा विचार न करता तो कैर्‍या काढण्यासाठी  झाडावर चढला. संजय अकस्मात येईल आपल्याला झाडावरून ढकलून देईल याची भीती त्याला होती .झाडावर चढताना जवळपास संजय कुठेही नाही हे त्याने काळजीपूर्वक पाहिले होते.नंतरच तो झाडावर चढला होता .कसा कोण जाणे संजय झाडाच्या फांदीवर पाठीमागून हळूच आला.त्याने अजयला झाडावरून ढकलून दिले.जर डोक्यावर अजय आपटला असता तर काहीही होऊ शकले असते.सुदैवाने खरचटण्यावर व मुका मार बसण्यावर निभावले.झाडावर कशाला चढलास म्हणून त्याला आईची दाट खावी लागली . आई रडेल आईच्या डोळ्यात पाणी येईल म्हणून अजयला  संजयने ढकलल्यामुळे मी खाली पडलो ही खरी गोष्ट  आईला  सांगता येत नव्हती.

क्रिकेटचा डाव रंगात आला होता .मुले  रबराच्या साध्या बॉलने न  खेळता  क्रिकेटच्या कडक बॉलने खेळत होते .संजयने जोरात तो बॉल अजयला मारला .अजयच्या डोक्याला खोक पडली .तो बेशुद्ध झाला .त्याला ड्रेसिंगसाठी डॉक्टरकडे न्यावे लागले .नशीब मेंदूला काही धक्का पोचला नाही.इतर खेळणाऱ्या मुलांनी संजयने मुद्दाम बॉल अजयला मारला असे सांगितले.

आई बाबांचा मुलांनी सांगितलेल्या गोष्टींवर विश्वास बसत नव्हता .अजय कळवळून सांगत होता ,मुले सांगत होती ,परंतु संजय असे काही करू शकेलच कसा यावर दोघेही ठाम होती.त्यांना संजय बद्दल इतका ठाम विश्वास कसा काय वाटत होता देव जाणे.अजय त्यांचा पहिला मुलगा होता .अजय पायगुणांचा ठरला होता .तरीही अजय खोटे बोलतो .संजय असे करू शकणार नाह। यावर दोघेही ठाम होती.

एकंदरीत संजय खुनशी झाला होता.त्याच्या हालचाली अजय मरावा अशा होत्या.अजयला ठार मारावे,त्याला गंभीर जखम व्हावी असे त्याला कां वाटत होते कोण जाणे?तो अजयच्या जिवावर उठला होता असे दिसत होते.

संतोष व सीमा याना लग्न झाल्यावर बरेच दिवस मूल होत नव्हते.त्यांनी डॉक्टरी उपाय करून बघितले होते .देवादिकांना नवस करुनही झाले होते.आपल्या नशिबात मूल नाही तेव्हा एखादे लहान काही महिन्यांचे मूल दत्तक म्हणून घरी आणावे असा त्यांनी विचार केला .अजयला सहा महिन्यांचा असतानाच दत्तक घेतला होता .तेवढ्यात त्यांची बदली झाली. सांगलीहून ते एकदम मराठवाड्यात औरंगाबादला आले.अजय दत्तक मुलगा आहे हे कुणालाच माहीत नव्हते .

काही दिवसातच सीमाला दिवस गेले.तो हा संजय.  अजय दत्तक मुलगा होता .संजय अौरस सख्खा मुलगा होता.वस्तुतः संजयवर त्यांचे जास्त प्रेम असणे स्वाभाविक होते .परंतु प्रत्यक्षात उलटे झाले होते .अजयमुळे संजय झाला. अजय भाग्याचा आहे. चांगल्या पायगुणाचा आहे. या कल्पनेने दोघांच्याही मनात घर केले होते .अजय फार लाघवी  मुलगा होता .त्याच्यावर दोघांचीही जास्त पाखर असे .संजयच्या ही गोष्ट लहानपणीच लक्षात आली.खेळणी कपडे पुस्तक अजयला आणले जात असे.  संजयला त्याची खेळणी, त्याचे कपडे, त्याची पुस्तके, वापरावी लागत.संजयलाही कौतुकाने वस्तू आणल्या जात.परंतु त्याचे प्रमाण अल्प असे.

मुले भरभर मोठी होत जातात .कपडे अपरे होतात. स्वाभाविक धाकट्या भावाला ते वापरायला दिले जातात . खेळण्यांचीही तीच परिस्थिती होते .या गोष्टी सहज होतात.काही वेळा एखाद्या मुलाच्या मनावर त्याचा खोल परिणाम होतो .संजय तसाच काहीसा मुलगा होता. प्रत्येक नवीन गोष्ट अजयला दिली जाते.त्याची जुनी वस्तू आपल्याला वापरावी लागते.आई बाबा अजयवर जास्त प्रेम करतात .तो आवडता आहे .आई बाबांचे आपल्यावर प्रेम नाही .आपण नावडते आहोत .अशी दृढ समजूत त्याने करून घेतली होती.त्याला अजयचे कपडे खेळणी कां दिली जातात ते लक्षात येण्याचे त्याचे वयही नव्हते . दादाबद्दल लहान भावाला प्रेम असते .इथे उलट परिस्थिती होती.  कसे कोण जाणे, अनिष्ट विचार त्याच्या मनात खोलवर रुजले होते. लहानपणापासून त्याच्या मनात अजयबद्दल अढी  होती.अजयसाठी केलेल्या प्रत्येक गोष्टीकडे तो त्या दृष्टीने पहात असे.

आई बाबांचा दृष्टिकोन थोडा वेगळा होता .अजय चांगल्या पाय गुणाचा आहे .तो आल्यावर संजय झाला .बाबांना प्रमोशन मिळाली .पगार वाढला सुबत्ता आली .अजय पोरका होता.पुढे मागे त्याला तो दत्तक घेतलेला आहे हे कळेल किंवा सांगावे लागेल .संजय झाल्यावर आपल्याकडे दुर्लक्ष केले असे त्याला त्यावेळी वाटू नये अशी भावना कुठेतरी दोघांच्याही मनात खोलवर  असावी. त्यामुळे त्यांचे अजयकडे जरा जास्तच लक्ष असे. अजयकडे जास्त ओढा आहे. त्याचे जास्त लाड केले जातात. अश्या विचारांचा खोल परिणाम नकळत संजयच्या बालमनावर  होत होता.  

*अजयच्या विरुद्ध आपण जे जे करतो  त्याचा उपयोग होत नाही.*

*अजय गंभीर जखमी होत नाही .*

*अजय मरत नाही .*

*त्याला फास लावूनच मारावा असा विचार संजयने केला.

(क्रमशः)

२०/४/२०२०©प्रभाकर  पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel