(ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे .प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा)
आपण केलेला प्रत्येक वार इष्ट साध्य साधत नाही .
अजय गंभीर जखमी होत नाही .
अजय मरत नाही .
त्याला फास लावूनच मारावा असा विचार संजयने केला.
अजयची वर्तणूक त्याच्या आई वडिलांना विचित्र वाटत होती .तो मधून मधून संजय बद्दल तक्रारी करीत असे.तक्रारींचे स्वरूप गंभीर होते .त्याने केलेल्या तक्रारीवरून संजय त्याला गंभीर दुखापत करू इच्छितो असे वाटत होते .त्याच्या आई वडिलांच्या म्हणण्यानुसार संजय तसे करणे शक्यच नव्हते.अजयला भास होत असावे अशी त्याच्या आईवडिलांची खात्री होती .हल्ली अजयच्या तक्रारींचे प्रमाण जरी कमी झाले असले तरीही ते त्याला मनोविकार तज्ज्ञाकडे घेऊन गेले .डॉक्टरांनी अजयच्या आई वडिलांकडून प्रश्नोत्तरांमार्फत सर्व माहिती जाणून घेतली.डॉक्टरना आणखी काही माहिती हवी होती .त्यानी अजयला घेऊन त्याच्या आईला बाहेर बसण्यास सांगितले . दोघेही बाहेर गेल्यावर डॉक्टर वडिलांजवळ म्हणाले.
संजयबद्दल तक्रारी आहेत .संजय अजयला दुखापती करू इच्छितो असे अजयला वाटते .म्हणजेच संजयलाही काहीतरी मानसिक असमतोल असावा असे वाटते.तुम्ही अजयसोबत संजयला कां घेऊन आला नाही ? समुपदेशनाची जास्त गरज संजयला आहे असे मला वाटते.
त्यावर अजयचे वडील डॉक्टरना म्हणाले.~*संजय आता या जगात नाही त्याचा मृत्यू झाला आहे .*~हे सांगताना वडिलांचे डोळे पाणावले होते . ते पुढे म्हणाले, क्रिकेट खेळताना बॉल ग्राउंडबाहेर रस्त्यावर गेला .बॉल आणण्यासाठी संजय त्यामागे धावत गेला .त्याचवेळी आलेल्या एका मोटारखाली तो सापडला.अजयला ही गोष्ट माहीत आहे .या गोष्टीला सहा महिने झाले .असे असूनही संजय त्याला दुखापत करण्याचा प्रयत्न करतो असे भास कां होतात म्हणून आम्ही त्याला येथे घेऊन आलो आहोत.
हे ऐकून डॉक्टरांचा चेहरा गंभीर झाला .ते म्हणाले तुम्ही बाहेर थांबा आणि अजयला आत पाठवा .तुम्ही कोणीही येथे हजर असाल तर कदाचित त्यांच्यावर प्रेशर येईल .माझ्या पद्धतीने मी त्याला बोलता करीन.त्याला तणावरहित करीन.
अजय आत गेला जवळजवळ अर्धा पाऊण तास डॉक्टर त्याच्या जवळ बोलत होते.त्यानंतर त्यांनी वडिलांना पुन्हा आत बोलावले .अजय व त्याची आई बाहेर थांबले होते.
डॉक्टर वडिलांना म्हणाले . मी माझ्या पद्धतीने अजयचे समाधान केले आहे.त्याने माझ्याजवळ त्याच्या दृष्टिकोनातून सर्व हकिगत व्यवस्थित सांगितली.अजयने केलेल्या कुरापतीबद्दल, दुखापतीबद्दल,तो तुम्हाला सुरुवातीला सांगत असे .जेव्हा तुम्ही त्याच्यावर अविश्वास दाखवता, उलट त्यालाच रागावता, त्याने संजयचा विषय काढला तरी तुमच्या डोळ्यात पाणी येते ,तुम्हाला दुःख होते ,असे त्याच्या लक्षात आले तेव्हापासून तो तुमच्या जवळ संजयच्या तक्रारी करण्याचे थांबला . संजय त्याला अजूनही त्रास देत आहे .तो त्याला ठार मारू पाहात आहे .निदान अशी अजयची कल्पना झाली आहे.
मी माझ्या पातळीवर त्याला समुपदेशन करून त्याच्या मनातील ही भीती दूर करण्याचा प्रयत्न करीनच.रोज अर्धा तास याप्रमाणे मी त्याच्यावर उपाय करीन. दहा पंधरा दिवसात तो ताणरहित होईल . त्याला होणारे सर्व भास नाहीसे होतील. संजय त्याला पुन्हा दिसणार नाही .
पण त्याला संजय दिसतो हा जर भास असेल तरच तो नाहीसा होईल. परंतु मला आणखी एक शंका येते .त्याला संजय खरेच दिसत असला तर ?म्हणजेच भास नसून वस्तुस्थिती असली तर?
तेव्हां आणखी एका पातळीवर प्रयत्न झाला पाहिजे असे मला वाटते .
आमच्या शास्त्राप्रमाणे भूत पिशाच्च इ. अस्तित्वात नाही.मी नाही म्हणतो ,म्हणून वस्तुस्थिती बदलत नाही.कारण कोणतेही असो , संजयच्या मनात अजयबद्दल अढी निर्माण झाली होती असे तुमच्या व त्याच्या बोलण्यावरून लक्षात येते . मृत्यूनंतर जर जीवन असेल तर भूतही असू शकेल .आणि जर भूत असेल तर संजय भूत होऊन अजयला त्रास देत नसेल कशावरून ?या दृष्टिकोनातूनही विचार केला पाहिजे .असे असेल तर संजयच्या भुताचा बंदोबस्त केला पाहिजे.त्याच्यापासून अजयला धोका संभवतो.संजयला मोकळा सोडणे म्हणजे अजयच्या मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे आहे. हा बंदोबस्त कसा करायचा ते मला माहित नाही.आमच्या शास्त्रात हे सर्व भास असेच आम्ही समजतो . संजय खरेच असेल तर त्यावरील उपाययोजना तुम्हालाच शोधून काढावी लागेल .
संजय भूत झाला असेल हे ऐकून त्याच्या वडिलांच्या हृदयाचे पाणी पाणी झाले. अजयला हे सर्व भास होतात असेच त्याना वाटत होते .डॉक्टरांच्या बोलण्यावरून वाटते त्यापेक्षा हे प्रकरण जास्त गंभीर व खोल आहे. हे सर्व एेकून अजय व संजयच्या आईला काय वाटेल असा प्रश्न त्यांच्या मनात निर्माण झाला .कोणत्या आईला आपला मुलगा भूत योनीत गेला आहे असे ऐकून जिवंत रहावे असे वाटेल?
अजयला पूर्णपणे बरा करायचा असेल,डॉक्टर सुचवितात त्याप्रमाणे खरेच संजय भूत झाला असेल आणि त्याच्यापासून अजयला वाचवायचे असेल तर त्याच्या आईला हे सर्व सांगणे जरुरीचे होते .त्याचप्रमाणे संजय असा भूत योनींमध्ये अडकून पडणे इष्ट नव्हते .तो पुढच्या गतीला जाणे जरूर होते .अजय व संजय दोघांच्याही हिताच्या दृष्टीने काही तरी करणे आवश्यक होते .त्याबद्दल कुणाला विचारावे अश्या विचारात संतोष पडला होता.
घरी जाताना अजयच्या आईने डॉक्टर काय म्हणाले म्हणून विचारले .अजयच्या वडिलांनी उद्यापासून अजयला डॉक्टरांकडे रोज अर्धा तास समुपदेशनासाठी जायचे आहे एवढेच सांगितले .उरलेला अर्धा भाग त्यांनी सांगितला नाही .डॉक्टरांनी ती एक संभाव्य शक्यता सांगितली होती .डॉक्टरनाही त्याबद्दल खात्री नव्हती.ती शक्यता हळुवारपणे त्याच्या आईजवळ बोलणे आवश्यक होते.मुख्य म्हणजे अजयला यातील काहीही कळणे योग्य नव्हते.
संजय भूत झाला असेल आणि डॉक्टर सुचवितात त्याप्रमाणे तो अंजयच्या जिवावर उठला असेल तर काय करावे तेच अजयच्या वडिलांना कळत नव्हते .अज्ञात प्रांताबद्दलचा तज्ञ कोण ते कुणाकडून जाणून घ्यावे हे त्यांच्या लक्षात येत नव्हते .
संजयने आज शेवटचा डाव टाकण्याचे ठरविले होते. अजयबद्दलचा राग, अजयबद्दलचे किल्मिष, या भूतयोनीमध्ये जास्तच तीव्र झाले होते.या योनीनुसार त्याच्या शक्तीही तुलनात्मक ,अमर्याद होत्या.वाढत्या रात्री बरोबर त्याचा रागही वाढत होता .संजयने माळ्यावर पडलेला एक दोर घेतला.त्याचा फास तयार केला. तो झोपलेल्या अजयच्या गळ्यात अडकविला .फास आवळला असता कि सर्व काही संपले असते.अजय अजूनही गाढ झोपलेला होता . एवढ्यात संजयला आईबाबांच्या खोलीत आई रडताना ऐकू आली .
संजयचा जरी आई बाबांवर राग असला तरी त्याचे त्यांच्यावर तेवढेच प्रेमही होते .हातातील काम अर्धवट टाकून संजय आई का रडते ते पाहायला तिकडे गेला.
रात्र झाली. अजय झोपी गेला.संतोषला आपल्याजवळ काहीतरी महत्त्वाचे बोलायचे आहे हे सीमाच्या लक्षात आले होते. संतोषला कुठून सुरुवात करावी ते कळत नव्हते . तो पहिलेच वाक्य बोलून गेला.आपला संजय पुढे गतीला गेला नाही.तो भूत योनीत अडकून पडला आहे .हे वाक्य ऐकल्याबरोबर संजयची आई रडू लागली होती.आणि ते रडणे ऐकून संजय हातातील काम अर्धवट टाकून त्यांच्या खोलीत आला होता.संजय वडिलांचे बोलणे ऐकू लागला.
आपण संजय व अजय दोघांवरही जिवापाड प्रेम केले.आपल्या मनात दोघांबद्दल सारखाच प्रेमभाव होता .संजय आपला सख्खा मुलगा असल्यामुळे त्यांच्याबद्दल जरा जास्तच आपुलकी व प्रेम होते. अजयला आपण मूल होत नाही म्हणून दत्तक घेतले होते .स्वत:ला मूल झाल्यावर अजयकडे दुर्लक्ष झाले असे होऊ नये म्हणून आपण अजयकडे जास्त लक्ष देत होतो.त्याचा विपरीत परिणाम संजयवर होईल हे आपल्या कधीच लक्षात आले नाही.
अजयला आपण पायगुणाचा समजत होतो.त्याच्यामुळे आपल्याला प्रमोशन मिळाले.डॉक्टरी व दैवी प्रयत्न करीत असूनही आपल्याला मूल होत नव्हते .अजयमुळे आपल्याला संजय झाला असे आपल्याला वाटत होते.
आपली मध्यमवर्गीय आर्थिक परिस्थिती होती.त्यामुळे अापण संजयला सर्व नवीन वस्तू आणून देऊ शकत नव्हतो.अजयचे कपडे खेळणी तशी नव्यासारखीच होती. तरीही आपण संजयला अधून मधून नवीन कपडे नवीन खेळणी आणून देत होतो.
आपल्या वागणुकीचा संजयवर अनिष्ट परिणाम होईल असे आपल्याला कधीच वाटले नाही.परंतु दुर्दैवाने त्याच्यावर अनिष्ट परिणाम होत होता .संजय सख्खा असूनही , संजय लाडका असूनही,दुर्दैवाने त्याला तसे वाटत नव्हते.केवळ आपल्या वागणुकीमुळे त्याला अजयवर सूड घ्यावा असे वाटू लागले होते .संजयचे बालमन आपल्याला कळू शकले नाही.त्यात त्याचा दुर्दैवी अपघाती मृत्यू झाला . अजयवर सूड उगवावा असे कुठे तरी संजयच्या मनात होते.त्यामुळे तो पुढच्या गतीला गेला नाही .उलट तो या भूतयोनीमध्ये राहून अजयला दगाफटका करण्याचे प्रयत्न करीत आहे .एक दिवस तो त्यात सफल होईलही . आपण आपल्याला सुदैवी समजत होतो परंतु आपण दुर्दैवी आहोत.आपला आवडता प्राणाहून प्रिय असा एक मुलगा तर गेलाच आणि त्याच्यामुळे दुसऱ्या मुलाचाही प्राण धोक्यात आहे .
संजयला कसे समजून सांगावे तेच मला कळत नाही.तो त्याच्या भावाच्या जिवावर उठला आहे .असे म्हणून संजयचे बाबा रडू लागले होते.संजय अदृश्य स्वरूपात त्यांच्यापुढे उभा होता.तो सर्व ऐकत होता .पुढे जावून आई बाबांचे अश्रू पुसावे असे त्याला वाटत होते .मी अजयला त्रास देणार नाही असेही त्याला सांगायचे होते.परंतु तो हतबल होता. त्याला यातील कांहीच करता येत नव्हते. आई बाबा आपल्यावर प्रेम करतात, करत होते, आणि अजूनही ते आपल्यासाठी काळजीत आहेत ,ही गोष्ट त्यांच्या लक्षात आली .
अजयला दुखापत करण्यासाठी त्याला संपविण्यासाठी आपण जे जे काही केले ती सर्व मोठी चूक होती असे त्याच्या लक्षात आले. तो मुळात वाईट मुलगा नव्हता .
तो तत्काळ अजयच्या खोलीत आला.
त्याने अजयच्या गळ्याभोवतीचा फास काढून घेतला .
दोरी माळ्यावर टाकून दिली .
तेथील एक कागद घेऊन त्यावर त्याने त्यावर पुढील मजकूर लिहिला .
"आई बाबा मला क्षमा करा. मी अजयचा दु:स्वास करीत होतो.अजयचे माझ्यावर असलेले प्रेम मला कळलेच नाही."
"यापुढे मी कुणालाही त्रास देणार नाही ."
" मी निघून जात आहे."
"संजय"
अकस्मात जोरात वारा सुटला . खिडक्या दरवाजे धडधड वाजू लागले.दिव्यांची तिनदा उघडझाप झाली.दुसऱ्याच क्षणी सर्व काही शांत स्तब्ध नॉर्मल नेहमीसारखे झाले.
अजयच्या खोलीतील खिडक्या पाहण्यासाठी त्याची आई खोलीत आली .
तिला टेबलावर ठेवलेला एक कागद दिसला .
तिने संजयचे हस्ताक्षर ओळखले.
मजकूर वाचून तिच्या तोंडातून शब्द फुटत नव्हता.
*ओक्साबोक्शी रडत तिने तो कागद संतोषच्या हातात दिला .*
*अजय त्याच्यावर घोंघावणाऱ्या संकटातून सुटला होता .*
* आता संजय त्याला कधीच दिसणार नव्हता. *
*अजय केवढ्या मोठ्या संकटातून वाचला ते कधीच कुणालाच कळणार नव्हते.*
(समाप्त)
२१/४/२०२०©प्रभाकर पटवर्धन