तरुण ब्राह्मण म्हणाला, ''तिला ताप तर मुळींच नाहीं, अन्न चांगलें खपतें. एवढेंच नव्हें तर रोज नवीन नवीन पक्वान्नें तिला फार आवडतात ! तिचा रोग म्हटला म्हणजे तिचें पोट दुखतें. मी घरांत असेपर्यंत कोणतेंहि काम तिच्यानें करवत नाहीं. मी बाहेर जातों तेव्हां ती इकडून तिकडे फिरत असते असें माझ्या ऐकण्यांत आलें आहे. कदाचित बिछान्यांत पडून कंटाळा आल्यामुळें ती तसें करीत असेल ! कांही असो तिच्या या पोटदुखीनें माझे हाल होत आहेत एवढें खरें.''

बोधिसत्त्वानें बाईला कोणता रोग झाला असावा हें तेव्हांच ताडलें ! व तो त्याला म्हणाला, ''मी एक या रोगावर उत्तम औषध तयार करून देतों, पण तुझी बायको तें खुषीनें घेईल असें वाटत नाहीं. तिच्यावर जबरदस्ती करावी लागेल. प्रसंग आला तर तिच्यावर चाबकाचे चार तडाखे ओढण्याची तुझी तयारी आहे काय ?'' तो म्हणाला, ''गुरुजी, आपण हें काय विचारितां ? आपली आज्ञा मला सर्वथैव वंद्य आहे. तिचा रोग बरा होत असला तर चार सोडून दहा फटके मारले तर त्यांत दोष कोणता ?''

बोधिसत्त्वानें गोमुत्रांतून चिराईत वगैरे कडू औषधें उकळून त्यांचा काढा बनविला, व कांहीं वेळपर्यंत तो तांब्यांच्या नव्या भांड्यांत ओतून ठेविला. दुसर्‍या दिवशीं त्या तरुण ब्राह्मणाला बोलावून आणून बोधिसत्त्व म्हणाला, ''हा काढा घेऊन जा व तुझ्या बायकोला पाज. बरोबर एक चाबूक घेऊन जाण्यास विसरूं नकोस.''

त्यानें तो काढा आपल्या बायकोला नेऊन दिला. तेव्हां ती त्यावर फार संतापली, व म्हणाली, ''मला हें तुमचें भिकारडें औषध पाहिजे कशाला ? तुपालोण्यानें जर माझा रोग बरा होत आहे, व मला गुण पडत आहे तर मग विनाकारण काढयांत पैसे कां घालवा ?''

तो म्हणाला, ''पण आजपर्यंत तुपालोण्यावर पुष्कळ पैसे खर्चण्यांत आले. परंतु त्यापासून तुझा रोग साफ बरा झाला नाहीं. आज चांगलें पक्वान्न खावें आणि दुसर्‍या दिवशीं पुनः पोटदुखीला सुरवात व्हावी. आतां आमच्या गुरूनें तयार करून दिलेला काढा घेतल्यांवाचून तुझा रोग बरा होण्याचा संभवच नाहीं.''

त्या खाष्ट बाईनें निरनिराळ्या मार्गानें नवर्‍याची समजूत घालण्याचा बराच प्रयत्‍न केला. पण त्यानें साफ सांगितलें कीं, ''काढा घेतला नाहीं तर चाबकाचा प्रयोक करून तो घेणें भाग पडावें लागेल.'' निकरावर गोष्ट आली, तेव्हां निरूपायानें तिनें त्या काढ्याचा एक घुटका घेतला. पण त्यायोगें तिचें तोंड वाकडें तिकडें होऊन तिला घेरी आली. थोड्या वेळानें सावध झाल्यावर ती नवर्‍याला म्हणाली, ''मला हा काढा घ्यावयास लावूं नका. आजच्या दिवसाची मुदत द्याल, तर माझा रोग आपोआप बरा होईल असें वाटतें.''

तो म्हणाला, ''हा काढा असाच ठेऊन देतों व तुझा रोग एक दोन दिवसांत साफ बरा झाला नाहीं तर त्याचा तुझ्यावर पुनः प्रयोग करण्यांत येईल.''

बाईचा रोग तात्काळ बरा झाला ! आपल्या नवर्‍याच्या गुरूसमोर आपले डावपेंच चालावयाचे नाहींत असें जाणून पूर्वीचा सर्व खोडसाळपणा तिनें टाकून दिला; व आपल्या नवर्‍याची ती अनन्यभावें सेवा करूं लागली.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel