कपिलवस्तु नांवाच्या शहरांत इ०स० पूर्वीं ६०० वर्षांच्या सुमारास शाक्य नांवाच्या क्षत्रियांचें एक लहानसें १महाजनसत्ताक राज्य होतें,
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
(१ निरनिराळ्या क्षत्रिय घराण्यांतील प्रमुख पुरूषांना महाजन ह्मणजे राजा असें ह्मणत. हे राजे संथागार नांवाच्या नगर मंदिरांत जमून राज्यकारभार पहात असत. आपणांपैकीं एकाला अध्यक्ष निवडीत.त्यास महाराजा असें ह्मणत. या प्रकारचीं आणखीही कांही राष्ट्रें उत्तर हिंदुस्थानांत होती. विशेष माहितीसाठीं प्रो० र्‍हिस डे. व्हिडसचें Buddhist India हें पुस्तक पहावें.)
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
तेथल्या महाजनांना राजे अशी संज्ञा होती. ह्या राजांपैकीं शुध्दोदन नांवाच्या एक राजाला दोन बायका होत्या, पहिलीचें नांव मायादेवी व दुसरीचें नांव महाप्रजापति. ह्या दोघी अंजनशाक्याच्या मुली. मायादेवी प्रसूतीसाठीं माहेरीं जात असतां वाटेंतच लुंबिनि नांवाच्या वनांत प्रसूत होऊन तिला जो मुलगा झाला तो पुढें बुद्ध नांवानें प्रसिध्दीस आला. त्याचें नांव सिद्धार्थ असें ठेविलें होतें असें ह्मणतात. परंतु त्रिपिटाकांत हें नांव माझ्या पाहण्यांत आलें नाहीं; ह्मणून बोधीसत्व- ह्मणजे भावी बुद्ध- या प्रसिद्ध नांवानेच मी येथें त्याचा उल्लेख करितों. बोधिसत्वाच्या जन्मसमयी घडले ह्मणून ह्मणतात अशा अद्भुत चमत्कारांस त्रिपाटक ग्रंथांत आधार सांपडत नाहीं. अर्थात् ह्या गोष्टी बुद्धचरित्रांत मागाहून सामिल केल्या गेल्या असाव्या हें फार संभवनीय दिसतें.

बोधिसत्व जन्मल्यावर त्याला आईसहवर्तमान शुध्दोदन राजानें परत आपल्या घरी नेलें. तेथें असित नांवाच्या ऋषीनें येऊन हा मुलगा जगदुद्धारक होणार आहे, असें भविष्य कथन केल्याची कथा सुत्तपिटकांतील सुत्तनिपात ग्रंथांत आढळते. मायादेवी बोधिसत्वाच्या जन्मानंतर ७ व्या दिवशीं निवर्तली ह्यालाही विनयपिटकांतील चुल्लवग्ग ग्रंथांत आधार सांपडतो.

तदनंतर घडलेल्या बोधिसत्वाच्या विवहसंस्कारादि गोष्टींचा त्रिपिटक ग्रंथांत कोठें उल्लेख सांपडत नाहीं. तथापि २९ व्या वर्षीं जेव्हां बोधिसत्वानें गृहत्याग करून अरण्यवास पत्करला त्या वेळीं त्यास एक राहुल नांवाचा मुलगा होता असें विनयपिटकांतील महावग्ग ग्रंथांत आलेल्या राहुलाच्या गोष्टीवरून दिसून येतें.

बोधिसत्वाच्या १गृहत्यागाचा प्रसंग बुद्धचरित काव्यादि ग्रंथांतून चमत्कारिक रीतीनें वर्णिला आहे. (१ यावा महाभिनिष्कमण अशी संज्ञा आहे.)  ‘त्याच्या बापानें त्याला मोठमोठाले तीन राजवाडे बांधून दिले होते, व तो त्या वाडयांतून बाहेर न पडतां चैनीनें कालक्रमण करी. पुढें अकस्सात् त्याला बाहेर फिरावयास जाण्याची इच्छा उत्पन्न झाली, व तो आपल्या छन्न नांवाच्या सारथ्यासहवर्तमान रथांतून फिरत असतां एक देवता व्याधिग्रस्त, ह्यातारा आणि मृत अशीं रूपें अनुक्रमें धारण करून त्याच्चा समोर आली. छन्न सारथ्याकडून व्याधिजरामरणाचें उग्र स्वरूप त्याला समजलें, व संसाराविषयीं तीव्रवैराग्य त्याच्या मनांत उत्पन्न झालें. इतक्यांत ती देवता भिक्षुरूप धारण करून पुन: त्याचा समोर आली, व तिला पाहून त्यानें गृहत्यागाचा दृढ निश्चय केला, इत्यादि गोष्टी आजकाल झालेल्या बुद्धचरित्रांतून सविस्तर वर्णिलेल्या आहेत; आणि आमच्या श्रोत्यांस त्यांचा बराच परिचय असण्याचा संभव असल्यामुळें त्यां येथें सविस्तर सांगण्याची आवश्यकता नाहीं.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel