मज्झिमनिकायांतील अरियपरियेसनसुत्तांत बुद्ध भगवंतानीं आपल्या गृहत्यागाची हकीकत येणेंप्रमाणें कथन केली आहे:-

“भिक्षूहो, मी सुद्धां संबोधिज्ञान होण्यापूर्वीं बोधिसत्वावस्थेंत, स्वत: जन्मधर्मी असतांना, जन्माच्या फेर्‍यांत सांपडलेल्या वस्तूंच्या (पुत्र, दारा, दासी, दास इत्यादिकांच्या) मागें लागलों होतों.” (ह्मणजे माझें सुख त्यांजवर अवलंबून आहे असें मला वाटे.) “स्वत: जराधर्मी असतांना, व्याधिधर्मी असतांना, मरणधर्मी असतांना, शोकधर्मी असतांना, जरा, व्याधि, मरण, शोक, यांच्या फेर्‍यांत पडलेल्या वस्तूंच्याच मार्गे लागलों होतों. तेव्हां माझ्या मनांत असा विचार आला कीं, मी स्वत: जन्म, जरा, मरण, व्याधि व शोक यांनी संबद्ध असतां त्यांनींच संबद्ध जे पुत्रदारादिक त्यांच्या मागें लागलों आहें, हें ठीक नव्हे; तर मग मी ह्या जन्मजरादिकांनी होणारी हानि पाहून अजात, अजर, अव्याधि, अमर आणि अशोक असें जें परम श्रेष्ठ निर्वाणपद त्याचा शोध करावा हें योग्य आहे.

भिक्षूहो, असा विचार करित असतां कांही कालानें जरी मी त्या वेळीं तरूण होतों, माझा एकही केंस पिकला नव्हता, भरज्वानींत होतों आणि माझे आईबाप मला परवानगी देत नव्हते, डोळ्यांतून निघाणार्‍या अश्रुप्रवाहानें त्यांचीं मुखें भिजलीं होतीं, ते सारखे रडत होते, तरी मी (त्या सगळ्यांची परवा न करितां) शिरोमुंडन करून, काषाय वस्त्रांनी देह आच्छादून घरांतून बाहेर १पडलों. (मी संन्यासी झालों.)
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
(१ या उतार्‍याचें शब्दश भाषांतर केलें नाहीं. पुनरूक्ति गाळून तात्पर्य सांगण्याचा प्रयत्न केला आहे. येथें आईंबाप असा उल्लेख आहे. बोधिसत्वाची आई सातव्या दिवशींच परलोकवासी झाली होती तरी तिच्या निधनानंतर महाप्रजापतीनें बोधिसत्वाचें पुत्रवत् पालन केल्याचा उल्लेख चुल्लवग्गांत सांपडतो. शिवाय महाप्रजापति बोधिसत्वाची मावशी असून सावत्र आई होती, असें वर सांगितलेंच आहे. तेव्हां येथें महाप्रजापतीलाच आई ह्मटलें आहे, हे उघड आहे.)
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
बोधिसत्वानें या प्रमाणें गृहत्याग केल्यावर तो राजगृह नगरास गेला तेथें त्या काली बिंबिसार नांवाचा राजा राज्य करीत होता. त्यानें बोधिसत्वास भिक्षेसाठीं फिरत असतांना पहिलें. हा कोणी तरी अद्वितीय पुरूष असावा असें त्यास वाटलें ब तो जेथें बोधिसत्व रहात होता, त्या पांडव नांवाच्या पर्वतावर स्वत: गेला. तेथें बोधिसत्वाची भेट घेऊन त्यानें त्यास संन्यास सोडून क्षत्रियधर्म स्वीकरण्यासाठीं बराच आग्रह केला. परंतु बोधिसत्वाच्या निर्वाण प्राप्त करून घेण्याच्या दृढनिश्चयापुढें त्याचें कांही चाललें नाहीं. ही कथा सुत्तनिपातांतील पब्बज्जासुत्तांत वर्णिली आहे.

यापुढील बोधिसत्वाचें वृत्त मज्झिमनिकायांतील महासच्चक सुत्तांत सांपाडते. त्याचें शब्दश: भाषांतर न देतां सारांश येथें देतों. सच्चक नांवाचा एक जैन (निर्ग्रन्थ) पंडित वैशाली नगरींत राहत असें. त्याला अग्गिवेस्सन असेंही ह्मणत, त्याला उद्देशून बुद्ध ह्मणतात:-

“हे अग्गिवेस्सन, याप्रमाणें प्रव्रज्या धारण करून मी घरांतून बाहेर पडलें. परम सुखावह गोष्ट कोणती याचा मी शोध करीत होतों. अनुत्तर श्रेष्ठ सान्तिस्थानाचा पत्ता लावण्यासाठीं मी फिरत होतों. आशा समय़ीं आळार कालमाजवळ जाऊन त्याला मीं ह्मटलें कीं, भो कालाम, तुझ्या ह्या धर्मपंथांत प्रवेश करण्याची मी इच्छा करितों. तेव्हां कालम ह्मणाला
‘आयुष्मन्, तूं या मताप्रमाणें वाग. विद्वान् मनुष्य या मताप्रमाणें वागला तर तो आमचें तत्त्व काय आहे हें लवकर जाणूं शकेल.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel