“लवकरच आळार कालामाचें तत्त्वज्ञान मी शिकलों. वादविवाद करण्यांत मी पटु झालों, ती सारी पोपंटपंची होती. दुसरेही कलामाचे शिष्य माझ्याप्रमाणेंच पोपंटपंचीत प्रवीण होते. ह्या पोपटपंचीनें माझें समाधान झालें नाहीं. मी माझ्या मनाशीं असा विचार केला कीं, केवळ श्रद्धा ठेवल्यानें कालामाला अनुभवज्ञान झालें नसावें, त्याला ह्या तत्त्वज्ञानाचा पूर्ण अनुभव मिळाला असला पाहिजे. तेव्हां मी कालामाजवळ गेलों आणि त्याला असा प्रश्न केला कीं, “भो कालाम, ह्या तत्त्वज्ञानाचा तुला साक्षात्कार कसा झाला?” तेव्हां कालामानें मला आकिंचन्यायतन१ नांवाची समाधि शिकविली. तेव्हां मी माझ्याशींच ह्मटलें कीं, कालामाला जशी श्रद्धा आहे तशीच ती मलाही आहे. कालामाला जसा उत्साह आहे तसाच तो मलाही आहे. कालामाला जसा विवेक (स्मृती) आहे तसाच तो मलाही आहे. कालामाला जशी एकाग्रताशक्ति (समाधि) आहे तशीच ती मलाहि आहे. कालामाला जशी प्रज्ञा आहे, तशीच ती मलाहि आहे. तर मग आळारकालामाप्रमाणें मींही साक्षात्कार कां करून घेऊं नये? असा विचार करून, हे आग्गिवेस्सन, थोडक्याच अवकाशांत मीं आकिंचन्य समाधि साध्य केली. हे वर्तमान जेव्हां मी कालामाला कळविलें, तेव्हां तो मला ह्मणाला ‘ज्या समाधीचा मला साक्षात्कार झाला त्या समाधीचा तुलाहि साक्षात्कार झाला आहे. जें मी जाणत आहें तेंच तूंही जाणत आहेस. माझी आणि तुझी योग्यता आतां सारखीच आहे, तेव्हां आजपासून तूं आणि मी मिळून ह्या पंथाचे मुख्य होऊं या, व या शिष्यांस शिकवूं या; याप्रमाणें कालामाने माझा बहुमान केलाय तो आचार्य व मी शिष्य असें असतां आपल्या योग्यतेलाच त्यानें मला चढविलें. हे आग्गिवेस्सन, ह्या थोरवीनें माझें समाधानं झालें नाहीं. हा कालामाचा धर्म कांहीं निर्वाणप्राप्तीला उपयोगीं पडणार नाहीं, याची आकिंचन्यायतन समाधिपर्यंतच काय ती गति आहे असें मला वाटूं लागलें, व त्या कालामाच्या पंथातून मी बाहेर निघालों.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
(१- या समाधीनें मन वृत्तिशून्य होतें.)
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
तदनंतर मी उद्दक रामपुत्र याजपाशीं गेलों. त्यानें मला नैवसंज्ञानासंज्ञायतन१ नांवाची समाधि शिकविली.  अल्पावकाशानेंच ही समाधि मला साध्य झाली. हें वर्तमान जेव्हां मीं रामपुत्राला कळविलें तेव्हां त्यानें माझा कालामाप्रमाणेंच सत्कार केला. तो आचार्य आणि मी शिष्य अशी स्थिति असतां त्यानें मला आपल्या योग्यतेस चढविलें. परंतु एवढयानें माझी तृप्ति झाली नाहीं. ह्या रामपुत्राच्या धर्मानें कांही निर्वाणप्राप्ति होणार नाहीं, याची गति नैवसज्ञानासंज्ञायतन समाधिपर्यंतच कायती आहे असें मला वाटलें, व रामपुत्राला सोडून मी निघालों.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
(१ ही समाधीची शेवटची पायरी.)
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
“हे अग्गिवेस्सन, याप्रमाणें मी परमसुखाचा, परमशांतीचा, निर्वाणाचा शोध करीत करीत मगध देशांत फिरत असतां उरूवेलेला येऊन पोंहचलों. तेथील प्रदेश अत्यंत रमणीय होता, वनशोभा फारच चांगली होती, नदी मंद मंद वाहत होती, आसमंतात् कांही अंतरावर गांव वसले होते, ह्या ठिकाणी हे अग्गिवेस्सन, मी माझे श्वासोच्छास कोंडून घेत असें श्वासोच्छास कोंडल्यानंतर माझ्या मस्तकांत भयंकर वेदना उठत असत, पोटांतही अशाच वेदना उठत असत, व सगळ्या अंगाचा अत्यंत दाह होत असे. परंतु माझा उत्साह दृढ होता, जागृति कायम होती, देह मात्र दुर्बल झाला होता. इतक्या दु:खकारक वेदना होत होत्या तरी त्यांचा माझ्या चित्तावर परिणाम होत नसे.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel